Home » वरळी – माहीममध्ये ठाकरेपुत्रांचा विजय होणार का?

वरळी – माहीममध्ये ठाकरेपुत्रांचा विजय होणार का?

by Team Gajawaja
0 comment
Vidhansabha Election
Share

विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राजकीय नेते आपापल्या पक्षाचा आणि उमेदवारांचा प्रचार करत आहेत. यंदाच्या निवडणुकीची लढत ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती एवढ्यापूर्ती मर्यादित नाहीये. मनसे, जरांगे पाटील आणि परिवर्तन महाशक्ती असे अनेक जण सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे जनतेकडे कोणाला मत द्यावं यासाठी भरपूर ऑप्शनस आहेत. या सर्वांमध्ये मनसेने ११० उमेदवारांची नावं घोषित केली आहेत. मात्र सर्वांचं लक्ष एकाच गोष्टीकडे आहे, ते म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्याकडे ! अमित हे दुसरे ठाकरेपुत्र आहेत, जे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ते माहीममधून विधानसभेच्या लढ्यात उतरत आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे पुन्हा एकदा वरळीतून आपलं नशीब आजमावून पाहणार आहेत. पण या दोन्ही जागांचं गणित काय आणि दोघांचा वरळी-माहीममधून विजय होईल का ? जाणून घेऊया. (Vidhansabha Election)

सर्वात पहिलं आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघाबद्दल जाणून घेऊया ! तसं पाहायला गेलं तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला कारण इथून सर्वाधिक शिवसेना ६ वेळा विजयी झाली आहे. सध्या शिवसेनेत फुट पडल्यामुळे काही लोकं शिंदे गटात तर काही ठाकरे गटात असले, तरी वरळीत सर्वाधिक वजन ठाकरे गटाचच आहे. आदित्य ठाकरे यांच्यापुर्वी शिवसेनेचे सुनील शिंदे इथून निवडून आले. त्यानंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि माजी मंत्री सचिन अहिर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. महत्त्वाचं म्हणजे शिंदे आणि अहिर हे दोघेही ठाकरे गटातच आहेत. पण आदित्य ठाकरे यांच्यासमोरचा मोठा पेच म्हणजे, त्यांच्यासमोर उभे असलेले तगडे उमेदवार आणि ते म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे. (Political Updates)

मिलिंद देवरा हे दोन टर्म खासदार राहिले आहेत, यासोबतच माजी केंद्रीय मंत्री आणि सध्याचे राज्यसभा खासदार आहेत. कॉँग्रेसमध्ये असताना दक्षिण मुंबईमध्ये त्यांचा चांगलाच दरारा होता. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अरविन्द सावंत यांच्याकडून त्यांना मात खावी लागली. पण तरीही वोट बँकच्या बाबतीत त्यांची चांगली पकड आहे, एवढं नक्की दुसरीकडे मनसेचे संदीप देशपांडे हे स्ट्रॉंग नेते आहेत. राजकारणाची सुरुवातच त्यांनी शिवसेनेपासून केली आहे. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि त्यांचा विजयी झाला. ते शिवसेनेत आल्यापासून राज ठाकरे यांच्याबरोबर आहेत आणि मनसे तयार झाल्यानंतर त्यांनी राज यांच्याकडेच जाणं ठरवलं. २०१९ ला ते माहिममधून उभे होते. मात्र शिवसेनेच्या सदा सरवणकर यांनी त्यांची जवळपास १८ हजार मतांनी मात केली. मात्र देशपांडे यांना ४० हजार पार मतं पडली होती. (Vidhansabha Election)

आदित्य ठाकरेंना २०१९ साली वरळीतून ८९२४८ मते पडली होती. त्यांच्यासमोर उभे असलेल्या राष्ट्रवादीच्या सुरेश माने यांना २१ हजार मतं पडली होती. मात्र पाच वर्षात महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदललं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन संभाव्य उमेदवार सचिन अहिर यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश केला होता. ठाकरे घराण्यातील पहिला व्यक्ती विधानसभा निवडणूक लढवणार असल्याने वरळीच्या जागेवर आदित्य ठाकरे यांची बिनविरोध निवड व्हावी, असे प्रयत्न करण्यात आले होते. त्यासाठी मनसेला देखील विनंती करण्यात आली होती. म्हणून राज यांनी उमेदवार दिला नाही. त्यावेळी शिवसेना, भाजपाकडून या मतदारसंघात जास्त ताकद आणि फिल्डिंग लावण्यात आल्याने आदित्य ठाकरे सहज जिंकून आले होते. मात्र यावेळी चित्र पालटलं आहे. त्यामुळे वरळी मतदारसंघात कांटे की टक्कर होईल, हेच दिसतंय. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनिर्वाचित उमेदवार असलेल्या अमित ठाकरे यांच्याबाबत जाणून घेऊया. मनसेचा राजकीय इतिहास पाहता २००९ साली मनसेने जो चमत्कार घडवला होता, तो पुन्हा एकदा घडेल, असं अनेकांना वाटत आहे. त्यातच अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्यांच्याकडे लागलं आहे. पण त्यांच्यासमोरही मोठं तगडं आव्हान आहे, ते म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि दुसरे म्हणजे ठाकरे गटाचे महेश सावंत. (Political Updates)

====

हे देखील वाचा :  नव्याची आशा !

====

सदा सरवणकर यांच्याबाबत सांगायचं झालं तर ते तीन टर्म माहीममधून शिवसेनेचे आमदार राहिले आहेत. २००४ सालीसुद्धा या मतदारसंघातून जिंकून आले होते. त्यामुळे माहीममध्ये एक वजनदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तर महेश सावंत १९९० पासून शिवसेनेत सक्रीय आहेत. सावंत यांची ओळख सदा सरवणकर यांचे कट्टर समर्थक अशी होती. २००९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी सरवणकर यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, त्यावेळी महेश सावंत यांनी देखील त्यांच्यासोबत पक्ष सोडला होता. मात्र, महेश सावंत पुन्हा शिवसेनेत दाखल झाले आणि आता ठाकरे गटाकडून त्यांच्याच विरोधात लढणार आहेत. २०२३ साली गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत प्रभादेवीमध्ये सावंत आणि सरवणकर यांच्यात राडा झाला होता. त्यामुळे दोघेही वेगळे झाले. आता माहीमचेच दोन शक्तिशाली उमेदवार असलेल्या महेश सावंत आणि सदा सरवणकर यांच्यासमोर अमित ठाकरे यांचा निभाव लागेल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पण राज ठाकरे यांचे पुत्र अशी ख्याती असल्यामुळे केवळ माहीममधूनच नाही, तर संपूर्ण राज्यामधून त्यांना समर्थन मिळत आहे. यासोबतच मनसे त्यांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने पुढे आली आहे. आता उद्धव ठाकरे पुत्र आदित्य आणि राज ठाकरे पुत्र अमित या दोघांचीही मोठी परीक्षा या निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे आता कोण पास होतंय आणि कोण फेल, हे माहीम आणि वरळीची जनताच ठरवेल. (Vidhansabha Election)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.