Home » मुंबई कोणाची? आघाडीच्या भागीदारांची !

मुंबई कोणाची? आघाडीच्या भागीदारांची !

by Team Gajawaja
0 comment
Vidhansabha Election 2024
Share

‘इंतजार का फल मीठा होता है’ अशी एक हिंदी म्हण आहे. ज्याच्याकडे संयम जास्त त्याचा लाभ जास्त, असा त्याचा सर्वसाधारण अर्थ. एरवी सर्वसामान्य लोकांना चांगलीच माहीत असलेली ही म्हण राजकारण्यांना अधिक चांगली माहीत असते. आपला संयम कायम ठेवून प्रतिस्पर्ध्याचा संयम जोखण्याचे तंत्र ज्याला अवगत असते, त्याला राजकारणात यश हमखास मिळते. आधी 1991 ते 1993 आणि नंतर 1999 ते आतापर्यंत असे दिल्लीत वास्तव्य करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार हे तर या खेळात भलतेच तरबेज आहेत, असे मानले जाते. नव्हे, ते संयमाच्या या खेळाचे कुलगुरुच म्हणावे लागतील. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुतण्याने बंड पुकारले तर शांत राहून ज्या खंबीरपणे त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा किल्ला लढविला, तो या संयमाच्या कौशल्यानेच. या बाबतीत कॉंग्रेस सुद्धा तोडीस तोड आहे. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या बाबतीत पूर्वीपासूनच वेगळी पडते आणि त्यामुळेच महाविकास आघाडीतल्या जागावाटपासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कमीपणा घ्यावा लागलाय. एकेकाळी मुंबई कोणाची? शिवसेनेची! असं म्हटलं जायचं पण आज याच्या उलट चित्र आहे. ते काय आहे जाणून घेऊया. (Vidhansabha Election 2024)

याच संयमाच्या बळावर त्यांनी 1999 ते 2014 अशी पंधरा वर्षे काँग्रेसच्या नेतृत्वाला महाराष्ट्रात आणि दिल्लीत खेळविले. परंतु दिल्लीच्या दरबारी राजकारणात मुरलेले कॉंग्रेसचे नेतेही त्यांना शेरास सव्वाशेर होते. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी या म्हणीप्रमाणे तेही समोरच्या संयमाच्या अंत पाहणारेच होते. त्यांच्या या कौशल्यामुळेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीचे भविष्य अनेकदा टांगणीला लागले होते. अगदी 1999 च्या निवडणुकीनंतर पहिल्यांदा ही युती झाली तेव्हा, 2004 मध्ये राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या तेव्हा आणि 2009 मध्ये तिसऱ्यांदा ही युती झाली तेव्हाही. (Latest Political News)

आता हाच संयमाचा खेळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पुन्हा खेळत आहेत. मात्र या सगळ्या निवडणुकांपेक्षा वेगळा घटक या निवडणुकीत आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना. शिवसेना, मग ते अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील असली तरी, आणि संयम या दोन शब्दांची सांगड कधीही पडली नाही. आली अंगावर, घेतली शिंगावर असा शिवसेनेचा सुरुवातीपासूनचा खाक्या राहिला आहे. त्यामुळे या दोन निबर सहयोगी पक्षांसमोर शिवसेनेचा कितपत पाड लागेल, ही शंका राजकीय निरीक्षकांना आधीपासून होती. विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या निमित्ताने ही शंका साधार ठरत असल्याचे दिसत आहे. अगदी उद्धव ठाकरे यांच्यापासून शिवसेनेचे सर्वसामान्य कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार या जागावाटपाच्या निर्णयासाठी घायकुतीला आले असले, तरी दोन्ही काँग्रेसची वरिष्ठ नेतेमंडळी ताकाला तूर लागू द्यायला तयार नाहीत. “वाजली तर पुंगी, नाही तर गाजर,” हे सूत्र डोळ्यांसमोर ठेवून जणू काँग्रेस वाटचाल करत आहे. या डावपेचांनी उबाठा सेनेच्या नेतृत्वाचा एवढा त्रागा झाला, की भर बैठकीतून संजय राऊत रागारागाने बाहेर पडले. (Vidhansabha Election 2024)

लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित यशाची लॉटरी लागलेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांनी लगोलग स्वबळाची भाषा सुरू केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यात आघाडीवर होते. विशेष म्हणजे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वानेही पटोले आणि चव्हाण यांना रोखले नाही. पृथ्वीराज चव्हाण यांची काँग्रेस श्रेष्ठींशी जवळीक लक्षात घेतली तर त्यांच्या वक्तव्यांमागे बोलविता धनी कोण होता, हे लक्षात येते. कदाचित हरियाणात काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे सत्ता मिळाली असती, तर एव्हाना काँग्रेसने शिवसेनेला एक ओझे म्हणून महाविकास आघाडीतून बाजूलाही काढले असते. उद्धव ठाकरे यांच्या सुदैवाने तसेच झाले, किंबहुना हरियाणा काँग्रेसला आलेल्या अपयशामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आनंदच झाला असावा. जागावाटपात आता काँग्रेसची हडेलहप्पी चालणार नाही, याची खात्री त्या निकालांनी दिली होती. परंतु मुरलेल्या काँग्रेस नेत्यांनी आपला हट्ट सोडला नाही आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दृष्टीने कसोटीची वेळ आली. (Latest Political News)

या सर्व पार्श्वभूमीवर, प्रदीर्घ वाद आणि सार्वजनिक बोलाचालीनंतर, होईल-न होईल अशा शक्यतांच्या चढउतारांनंतर अखेर महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर एकमत झाल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले. काँग्रेस 105 जागा, उबाठा सेना 95 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 84 जागा लढवणार असल्याचे बहुतेक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांमध्ये म्हटले आहे. त्यासाठी सूत्रांचा हवाला देण्यात आल्यामुळे अर्थातच ते अजूनही अंतिम म्हणता येणार नाही. उर्वरित चार जागा आघाडीतील लहान मित्रपक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत. वर म्हटल्याप्रमाणे नाना पटोले यांनी उबाठा सेनेच्या संयमाचा अंत पाहिल्यामुळे पटोले असतील तर आम्ही चर्चेला येणार नाहीत, असा निर्वाणीचा इशारा देण्यापर्यंत सेनेची मजल गेली होती. त्यानुसार काँग्रेसने पटोले यांच्या जागी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली. (Vidhansabha Election 2024)

थोरात यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर जागावाटपाची चर्चा सोमवारी तिन्ही पक्षांमध्ये पुन्हा सुरू झाली. मात्र पटोले यांच्याप्रमाणे सार्वजनिक शरसंधान केले नसले, तरी थोरात यांनी आपली कामगिरी व्यवस्थित बजावल्याचे या फॉर्मुल्यावरून दिसते. जे पटोले यांना हवे होते, तेच थोरातांनी साध्य केले आहे. म्हणजेच लोकसभेत सर्वाधिक जागा लढविणाऱ्या शिवसेनेला काँग्रेसपेक्षा दुय्यम भूमिका घ्यावी लागली आहे. राज्यात आम्हीच मोठा भाऊ असे एकेकाळी अभिमानाने सांगणाऱ्या शिवसेनेसाठी ही जर नामुष्की नसेल, तर आणखी काय असणार? साधारण 1988 ते 2014 पर्यंत एकसंध शिवसेना आणि भाजपची युती होती तेव्हा छोटा भाऊ-मोठा भाऊ ही शब्दावली खूप प्रचलित होती. (Latest Political News)

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांकडून नेतृत्वाचा वारसा घेतला तसाच या शब्दाचाही वारसा घेतला. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव यांनी सातत्याने या शब्दांचा उच्चार करून भाजपला कमी लेखायचा प्रयत्न केला. बाळासाहेबांच्या वेळेस ठरलेल्या सूत्रानुसार, लोकसभा निवडणुकीत भाजपला जास्त जागा तर शिवसेनेला कमी जागा असायच्या कारण ती निवडणूक राष्ट्रीय पातळीची होती आणि भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. विधानसभेत मात्र शिवसेना 171 जागा लढवायची तर भाजप 117 जागा लढवत असे. यात तिसरा आणखी एखादा छोटा पक्ष असेल तर हे दोन्ही पक्ष आपापल्या वाट्यातील काही जागा त्या पक्षाला देत असत. या जागा वाटपातही मुंबई आणि कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे त्यातील सर्वाधिक जागा शिवसेनेला स्वाभाविकपणे मिळत. विशेषतः मुंबईतील 36 जागा हा शिवसेनेचा प्राण होता. (Vidhansabha Election 2024)

महाविकास आघाडीसोबत गेलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नशिबी यंदा मात्र वेगळेच वाढून ठेवलेले आहे. तीन पक्षांसोबत जागा वाटल्या गेल्यामुळे आधीच कमी जागा आल्या. आकड्यांमध्ये सांगायचे तर गेल्या वेळेपेक्षा सुमारे 30 ते 35 जागा त्यांच्या कमी होणार आहेत. इतकेच नाही तर शिवसेनेचा आत्मा असलेल्या मुंबई प्रदेशातसुद्धा शिवसेनेला कमीपणा घ्यावा लागणार आहे. आता, ‘मुंबईत महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा ठाकरे गट लढवणार असून उबाठा सेनाच मोठा भाऊ असेल,’ असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात गेल्या वेळेपेक्षा ती हानीच आहे. आता समोर आलेल्या सूत्रानुसार, मुंबईत उबाठा सेनेला 18 जागा मिळतील, तर काँग्रेस 14 जागा लढणार आहे. यांपैकी 11 जागा निश्चित झाल्या असून, दोन जागांवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 2 जागा मिळणार आहेत. शिवाय वर्सोवा, भायखळा आणि वांद्रे पुर्व या तीन जागांवरून उबाठा सेना आणि काँग्रेस अजूनही एकमेकांसमोर उभ्या आहेत, अशीही चर्चा आहे. (Latest Political News)

======

हे देखील वाचा :  पक्षांच्या चिन्हांमुळे मतदारांचा गोंधळ ?

======

त्या तुलनेत गेल्या निवडणुकीत, म्हणजे विधानसभा 2019 मध्ये, मुंबईत शिवसेनेच्या वाट्याला 19 जागा आल्या होत्या. शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने 17 जागांवर समाधान मानले होते. याचा अर्थ किमान एक जागा शिवसेना यंदा कमी लढवणार आहे. त्यातील निवडून येणाऱ्या जागा वेगळ्या. ‘आव्वाज कुणाचा? शिवसेनेचा!’, ‘मुंबई कोणाची? शिवसेनेची!’ या एकेकाळी शिवसेनेच्या लोकप्रिय घोषणा होत्या. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर केवळ बारा वर्षांच्या आत या घोषणांची पूर्ण रया घालवून टाकण्याचे काम शिवसेनेच्या सध्याच्या नेतृत्वाने केले आहे. ‘मुंबई कोणाची? आघाडीच्या भागीदारांची!’ अशी आज या घोषणांची गत झाली आहे. केवळ भाजपला विरोध करायचा म्हणून आणि आणखी स्पष्ट सांगायचे तर नरेंद्र मोदी यांना विरोध करायचा म्हणून शिवसेनेने केलेला हा आत्मघात आहे. याला दुसरे नाव नाही. (Vidhansabha Election 2024)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.