आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्यांचं पाहायचं वाकून ही म्हण सर्वांना परिचित आहे. आपल्या त्रुटी आणि दोष लपवून ठेवायचे आणि दुसऱ्यांच्या वर्मावर मात्र बोट ठेवायचं, असा या म्हणीचा अर्थ आहे. अन्य कुठल्या क्षेत्रात ही म्हण लागू होवो अथवा न होवो, राजकारणात मात्र तिचा वारंवार किंबहुना नियमितपणे प्रत्यय येतो. प्रत्येक राजकीय पक्षाच्या काही कमकुवत बाजू असतात, त्या झाकून ठेवायच्या आणि प्रतिस्पर्ध्याच्या मात्र प्रत्येक बारीक-सारीक उणिवा दाखवत आपले टीमकी वाजवायची, हा या पक्षांचा खाक्या असतो. महाविकास आघाडीच्या वतीने रविवारी झालेली संयुक्त पत्रकार परिषद ही या म्हणीचे सर्वात ताजे आणि सर्वथा योग्य उदाहरण म्हणावं लागेल. विधानसभा निवडणुकांआधी महाविकास आघाडीत सुरु असलेली ही रणनीती काय आहे आणि ती या म्हणीला का साजेशी आहे? हे जाणून घेऊया या. (Vidhansabha Election)
मविआची ही संयुक्त पत्रकार परिषद वांद्र्याच्या हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘मूळ संस्थापक’ आणि आता शरद पवार गटाची मालकी असलेले शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे तसेच जवळपास पाच वर्षांपासून मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्नात असलेले नाना पटोले हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. त्यांच्या जोडीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, सुप्रिया सुळे, अनिल देसाई, आदित्य ठाकरे अशी मातब्बर मंडळी उपस्थित होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विशेषतः हरियाणातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वेगवेगळ्या दिशांना तोंड करून बसलेल्या या पक्षांनी अशा रीतीने एकत्रित येणे, त्यांच्या समर्थकांना हरखून टाकणारं होतं. (Political Updates)
खासकरून नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या खासदार संजय राऊत यांच्यातील शब्दयुद्ध अजून चालूच असताना त्यांनी एकत्र येणे विशेष म्हणावे लागेल. आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे महायुती सरकारच्या कारभाराची चीरफाड करणाऱ्या ‘गद्दारांचा पंचनामा’ या पुस्तिकेचं प्रकाशन या नेत्यांच्या हस्ते करण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या राज्यातील सरकारच्या कारभाराला या पुस्तिकेच्या माध्यमातून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं आहे. मात्र माध्यमात ज्या बातम्या आल्या त्यावरून या पुस्तिकेचे स्वरूप ‘बडा घर पोकळ वासा” असंच आहे की काय, अशी शंका येते. (Vidhansabha Election)
या पुस्तिकेत ज्या मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आले आहे, त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणे, राजर्षी शाहू, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणे, महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होणे, शेतमालाला हमीभाव आणि पिक विमाही न मिळणे, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळून युवकांचा रोजगार हिरावून घेणे, प्रत्येक कामात ३० टक्के कमिशन घेणे,जाती-धर्मात भांडण लावून दंगली घडवणे, महायुती सरकारमध्ये आमदार ५० कोटी, नगरसेवक १ कोटी, वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली १ कोटी, जिल्हा शल्यचिकित्सकांची बदली २५ लाख असे विविध दर असणे इत्यादी आरोप ठेवण्यात आले आहेत. परंतु यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्याची दुर्दैवी घटना सोडली तर एकही मुद्दा ठोस नाही हे लक्षात येते. आमदारांना पैशांचे खोके वाटण्याचा आरोप तर शिंदे सरकार आल्या दिवसापासून उद्धव ठाकरे गट करत आला आहे. परंतु हा आरोप ठाकरे यांना अजूनही सिद्ध करता आलेला नाही. बाकी सर्व आरोप हे कोणत्याही सरकारच्या काळात होऊ शकतात. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी हेच आरोप केले होते, हे येथे लक्षात घ्यायला पाहिजे. (Political Updates)
परंतु खरी गंमत ती नाही. खरी गंमत उद्धव ठाकरे यांनी केलेला घुमजाव आणि महाविकास आघाडीने घेतलेली भूमिका ही आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, यासाठी उद्धव ठाकरे उतावीळ आहेत. संधी मिळेल तिथे त्यांनी तो लकडा लावलेला आहे. त्यासाठी दिल्लीवारी करून ते आले, परंतु त्यांच्या हातात काही पडले नाही. अगदी गेल्या आठवड्यातही त्यांनी पुन्हा तीच मागणी केली. काहीही करून आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावं, ही त्यांची इच्छा असल्याचे एव्हाना सर्वांना कळून चुकले आहे. त्यांच्या या मागणीला महाविकास आघाडीतील अन्य पक्षांनी अर्थातच वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत. (Vidhansabha Election)
म्हणूनच रविवारच्या पत्रकार परिषदेत त्यांना या संबंधात प्रश्न केले जातील, हे अपेक्षितच होते. त्यावर ठाकरे यांनी वेगळी भूमिका मांडली. महायुतीने आधी आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, मग आम्ही आमचा चेहरा जाहीर करतो, असे त्यांनी सांगितले. ही एक गंमतच आहे. हे म्हणजे ‘दिवार’ चित्रपटात विजय झालेल्या अमिताभ बच्चनने ‘जाओ, पहले उनसे साइन लेके आओ,’ असे पोलीस इन्स्पेक्टर झालेल्या शशी कपूर यांना सुनावण्यासारखं होतं. ठाकरे यांच्या या वक्तव्याला शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही दुजोरा दिला. त्यांना काय, कोणत्याही निमित्ताने का होईना ठाकरे यांचा लकडा कमी होणं त्यांच्या पथ्यावरच पडणारं आहे. (Political Updates)
वास्तविक, मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करावे, यासाठी अडून बसलेले उद्धव ठाकरे. आपल्या सहकारी पक्षांकडे त्यांनी ही मागणी विविध व्यासपीठावर लावून धरली आहे. कुणाचेही नाव जाहीर करा, पण मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, मी लगेच पाठिंबा देतो, अशी भाषा करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. त्यामुळे तुमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हा प्रश्न महाविकास आघाडीलाच केला जाणार आहे. महायुतीच्या बाजूने हा प्रश्न फारसा उद्भवतच नाही. याला कारण, एकनाथ शिंदे हे सध्या मुख्यमंत्री आहेतच. सध्या तरी निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील हे नक्की आहे. शिवाय महायुतीत जागावाटप कसेही झाले तरी आणि महायुतीला बहुमत मिळाले तर मुख्यमंत्री भाजप किंवा शिवसेनेचाच असणार हे नक्की आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद जाईल, एवढ्या जागा त्यांना मुदलातच मिळणार नाहीत. त्यामुळे महायुतीत तो प्रश्न उद्भवत नाही. शिंदे आणि फडणवीस हेच महायुतीचा चेहरा असतील. (Vidhansabha Election)
प्रश्न आहे तो महाविकास आघाडीचा. एकनाथ शिंदेंचे सरकार आले ते उद्धव ठाकरे यांच्या सत्तेला उलथवून. शिवाय शिंदे हे ठाकरे यांचे स्वपक्षीय. त्यामुळे मुख्यमंत्रीपद हा आपला जन्मजात अधिकार आहे आणि त्याला सुरुंग लावणारे शिंदे हे गद्दार आहेत, हा ठाकरे यांचा दावा आहे. म्हणून महायुती गद्दारांच्या नेतृत्वात निवडणुका लढविणार का, हे जाहीर करावे, असे उद्धव म्हणाले. परंतु महाविकास आघाडीत काय स्थिती आहे? वर म्हटल्याप्रमाणे आपण मुख्यमंत्रीपदाचे नैसर्गिक दावेदार आहोत, हा उद्धव ठाकरे यांचा समज आहे. उलट, लोकसभा निवडणुकीत आपले बळ वाढल्यामुळे मुख्यमंत्रीपदावर आपला आपोआप दावा निर्माण होतो, हा नाना पटोले यांचा समज आहे. (Political Updates)
लोकसभेच्या निकालानंतर पटोले आणि काँग्रेस यांच्या सर्व चाली त्याच दिशेने पडत आहेत. तिसऱ्या बाजूला, जे कोणाच्याही मनात नसते ते घडवून आणून नवीनच काहीतरी निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध असलेले शरद पवार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे भाजपशी काडीमोड घेतील आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून सरकार स्थापन करतील, हे कोणाच्या गावीही नव्हतं. परंतु शरद पवारांनी ते साध्य करून दाखवलं. तशीच काहीशी जादू याही निवडणुकीनंतर ते करू शकतात. अर्थात महाविकास आघाडीला बहुमत मिळाले किंवा ती सत्तेच्या जवळपास गेली तर. (Vidhansabha Election)
======
हे देखील वाचा : परळीत मुंडेंना पर्याय नाही?
======
अगदी वरपांगी पाहिलं तरी मुख्यमंत्रीपदावरून तसेच लहान भाऊ आणि मोठा भाऊ अशा शब्दावरून गेले काही दिवस जे वादावादी सुरू आहे ती महाविकास आघाडीतच आहे. संजय राऊत आणि नाना पटोले हे त्यासाठीच एकमेकांवर तोंडसुख घेत आहेत. जो काही खडखडाट होत आहे तो अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने. त्या परिस्थितीत आणि ऐन जागावाटपाच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखविण्यास शिंदे आणि फडणवीस कमी करणार नाहीत. तेवढी जोखीम ते घेऊ शकतात. म्हणूनच मग महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण, हा प्रश्न आघाडीच्या नेत्यांनी विचारणे म्हणजे निव्वळ नस्ती उठाठेव म्हणावी लागेल. यालाच म्हणतात आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्यांचं पहावं वाकून. (Political Updates)