Home » या निवडणुकांनी गृहयुद्धच उभे केले !

या निवडणुकांनी गृहयुद्धच उभे केले !

by Team Gajawaja
0 comment
Vidhansabha Election 2024
Share

निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव असं म्हटलं जातं. लोकशाहीतील निवडणुकीत विचारसरणींची लढाई होते तेव्हा ते खरं होतं. परंतु विचारसरणी पातळ होऊन फक्त एकमेकांवर वर्चस्व गाजवायचे, याला प्राधान्य मिळू लागलं. तेव्हा हळूहळू निवडणुका म्हणजे एक प्रकारची लढाई, असं स्वरूप आलं. त्यानंतर निवडणुका म्हणजे सत्ता मिळवण्यासाठीची स्पर्धा, असंही मानले जाऊ लागलं. परंतु आजचं राजकीय वातावरण पाहिलं तर गोष्ट एवढ्यावर थांबत नाही, तर निवडणुका म्हणजे “युद्ध” झालं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घराण्यांचे वर्चस्व पाहिले तर हे युद्ध गृहयुद्ध बनले आहे, असेही म्हणता येईल. राज्यातील किमान पाच मतदारसंघात जवळच्या नातेवाईकांमध्ये लढत आहे. वडील आणि मुलगी, काका-पुतणे आणि अगदी पती-पत्नीही एकमेकांसमोर उभे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या या गृहयुद्धाबद्दलच जाणून घेऊया. (Vidhansabha Election 2024)

निवडणुकांमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी असणं, नेत्यांमधील वैयक्तिक स्पर्धा असणं हे फारसे नवीन नाही. कोकणातील दिग्गज नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि वैभव नाईक किंवा विनायक राऊत यांच्यातील राजकीय सामना हे त्याचे उदाहरण आहे. मराठवाड्यातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि अशोक पाटील चिखलीकर यांचा एकमेकांना विरोध असाच कायम लक्षवेधक ठरला आहे. पुण्यात सुरेश कलमाडी यांचा आपल्याच काँग्रेस पक्षातील विठ्ठलराव गाडगीळ यांच्याशी मुकाबला झाला आणि नंतर शरद पवार यांच्याशी त्यांची राजकीच चुरस होती. अहिल्यानगर जिल्ह्यात विखे पाटील व गडाख, कोल्हे व गडाख, काळे व राजळे अशा अनेक जोड्या परस्परविरोधी राजकारणाचे प्रतीक बनल्या आहेत. थोडक्यात म्हणजे दोन नेते किंवा घराणी एकमेकांच्या विरोधात लढणे हे फारसे नवीन नाही. मात्र यंदाची निवडणूक आणखी एक पाऊल पुढे गेली आहे. आता ती अत्यंत वैयक्तिक आणि कटु बनली आहे. (Political News)

महाराष्ट्राच्या विधानसभेतील 288 मतदारसंघांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल, तोपर्यंत अनेक घरांमधील धुणी-भांडणी अशा रीतीने चव्हाट्यावर धुतली जाणार आहेत. सामान्य राजकारण्यांपेक्षा वेगळी ठरणारी ठाकरे आणि पवार यांची घराणीही त्याला अपवाद नाहीत. यातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची लढाई पवार कुटुंबातील आहे. गेली पन्नास वर्षे एकसंघ कुटुंब म्हणून राजकारणावर वर्चस्व गाजविणाऱ्या पवार कुटुंबात पहिल्यांदाच दुफळी माजली आहे आणि तीन थरांत पसरली आहे. त्यामुळे बारामतीच्या या मुकाबल्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अधिकृत ताबा मिळविणारे अजित पवार यांना त्यांचे राजकीय मार्गदर्शक व काका शरद पवार यांनी अजितदादांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्या विरोधात लढण्याचं आव्हान दिलं आहे. काका विरुद्ध पुतण्या विरुद्ध पुतण्या असा हा तिरंगी सामना आहे. युगेंद्र हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव. गेल्या निवडणुकीत शरद पवारांनी अजितदादांचे आणखी एक पुतणे रोहित पवार यांनाही निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं. मात्र ते जामखेड मतदारसंघातून आणि तेही एकाच पक्षातून. त्यामुळे अजितदादा विरुद्ध रोहित पवार हा संघर्ष सुप्त होता, यंदा त्याला प्रत्यक्ष रूप आलं आहे. (Vidhansabha Election 2024)

अवघ्या सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत बारामतीने पवार विरुद्ध पवार अशी पहिली लढत पाहिली होती. त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. तोही अँगल या लढतीला आहे. त्यामुळे येथील जय किंवा पराजय हा अजितदादांच्या कारकीर्दीला नवे वळण देणारा ठरणार आहे. तेव्हा विधानसभेच्या या निवडणुकीला प्रचंड महत्त्व येणे स्वाभाविक आहे. (Political News)

ही झाली काका-पुतण्या अशी लढत, परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघात तर प्रत्यक्ष कौटुंबिक सामनाच होणार आहे. येथे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे अपक्ष म्हणून लढत असून त्यांची पत्नी संजना जाधव या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आहेत. हर्षवर्धन हे कन्नडचे माजी काँग्रेस आमदार दिवंगत रायभान जाधव यांचे पुत्र आहेत, तर संजना या भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. हर्षवर्धन यांनी 2009 मध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कन्नड विधानसभेची जागा जिंकली होती. पुढच्या निवडणुकीत 2014 मध्ये ते शिवसेनेचे आमदार झाले, मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी 2018 मध्ये आमदारकीचा राजीनामा दिला होता. या निवडणुकीसाठी हर्षवर्धन यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, ते 2019 पासून विभक्त राहत आहेत, परंतु त्यांचा घटस्फोट झालेला नाही. संजना यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मात्र ‘विवाहित’ असा उल्लेख आहे. (Vidhansabha Election 2024)

काका-पुतण्या संघर्षाला सरावलेल्या महाराष्ट्राला काहीसा बदल म्हणून काका-पुतणी संघर्ष पाहायला मिळत आहे तो विदर्भातील सिंदखेडराजामध्ये. येथे विद्यमान राजेंद्र शिंगणे यांनी ऐन वेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांना तिकडून उमेदवारीही मिळाली. यामुळे नाराज झालेल्या गायत्री शिंगणे यांनी पक्षनिष्ठांना मान मिळत नाही, असे म्हणत अपक्ष लढण्याची तयारी केली. मात्र त्यांना अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली. पवार साहेब तुम्हाला माफ करतील, पण तुम्ही ना घरच्यांशी एकनिष्ठ, ना जनतेशी असे म्हणत गायत्री यांनी राजेंद्र शिंगणे यांना लक्ष्य केले आहे. (Political News)

याच विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम आणि त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम-हलगेकर एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. मात्र ही एवढीच कौटुंबिक लढत नाही. धर्मराव बाबा यांचे पुतणे अंबरिश हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे एकाच कुटुंबामध्ये तिहेरी लढत होणार आहे. चिखलीकरांचा वर उल्लेख केला आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यामुळे चिखलीकर यांनी पक्षांतर केलं. आता लोहा-कंधार मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाने त्यांना उमेदवारी दिली आहे. मात्र येथे चिखलीकर यांचा सामना अन्य कोणाशी नसून त्यांच्या भगिनी आशा श्यामसुंदर शिंदे यांच्याशीच आहे. त्या तेथे महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार आहेत. त्यांचे पती चिखलीकरांचे मेहुणे श्यामसुंदर शिंदे यांनी लोह्यात 2019 मध्ये चिखलीकरांच्या पाठिंब्याने विधानसभा निवडणूक जिंकली होती. येथे उमेदवारी मिळविण्यासाठी आधी श्यामसुंदर व आशा शिंदे या पती-पत्नीतच चुरस होती. त्याची परिणती बहिण-भावामध्ये लढत होण्यात झाली आहे. (Vidhansabha Election 2024)

नांदेडमध्ये विधानसभेच्या जोडीला लोकसभेची निवडणूक होत आहे. विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या या जागेवर पोटनिवडणुकीत संतुकराव हंबर्डे हे भाजपचे उमेदवार आहेत. मात्र त्याच जिल्ह्यात नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे मोहनराव हंबर्डे आपली जागा राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे उबाठा सेनेच्या वतीने उमेदवार आहेत. आपला वरळी विधानसभा मतदारसंघ राखण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आदित्यचे मावस बंधू वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून उबाठा सेनेचे उमेदवार आहेत. त्यांच्याशी प्रत्यक्ष लढत नसली, तरी मुंबईमधीलच माहीम मतदारसंघातून आदित्यचे काका राज ठाकरे यांचे पुत्र आणि आदित्यचे चुलत भाऊ अमित ठाकरे नशीब अजमावत आहेत. तिथे उबाठाचे महेश सावंत यांच्याशी त्यांचा सामना आहे. (Political News)

उत्तर महाराष्ट्रात नाशिकच्या चांदवडमध्ये पक्की भाऊबंदकी दिसत आहे. तिथे राहुल आहेर हे भाजपचे उमेदवार आहेत, तर त्यांचे बंधू केदा आहेर अपक्ष म्हणून त्यांच्या विरोधात उभे आहेत. याच नाशिकमध्ये छगन भुजबळ हे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून उभे आहेत, तर त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगावमधून अपक्ष म्हणून आपला दावा ठोकला आहे. भाजप नेते विजयकुमार गावित सलग सहा वेळेस नंदुरबारचे आमदार आहेत. आता ते सातव्यांदा निवडणुकी च्या रिंगणात आहेत. परंतु गावित यांच्या कन्या व माजी खासदार हीना गावित भाजपमधून बाहेर पडत अक्कलकुवा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहेत. विजयकुमार गावित यांचे बंधू शरद गावित नवापूरमधून तर आणखी एक बंधू राजेंद्र गावित शहादा येथून निवडणूक लढवत आहेत. (Vidhansabha Election 2024)

======

हे देखील वाचा : पनवेल मतदारसंघ कोणाच्या बाजूने?

====

नवी मुंबईतील गणेश नाईक हे ऐरोली मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. ते महाविकास आघाडीचा घटक असलेल्या उबाठा सेनेच्या उमेदवार मनोहर मढवी यांच्याशी लढत आहेत. त्यांचे नाईक यांचे धाकटे चिरंजीव संदीप यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी मिळविली आहे. भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्या विरोधात ते लढत आहेत. या अशा परिस्थितीत विचार आणि मुद्द्यांवर चर्चा होण्याऐवजी नेत्यांच्या व्यक्तिगत दोषांवर आणि कुटुंबांवर हल्ले होणे स्वाभाविक आहे. मुख्य म्हणजे हे हल्ले त्यांच्याच कुटुंबियांकडून होत आहेत. जुनी कुलंगडी बाहेर काढली जात आहे. एक प्रकारे या निवडणुकांनी गृहयुद्धच उभे केले आहे. या संघर्षाचा खरे-खोटे पणा देव जाणो, परंतु कागदावर तरी ते एकमेकांच्या विरोधात आहेत ही वस्तुस्थिती आहे. (Political News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.