नलिनी जयवंत यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२६ रोजी मुंबईत मध्यमवर्गीय मराठी कुटूंबात झाला. नलिनी जयवंत आणि अभिनेत्री शोभना समर्थ यांची आई रतन बाई यांचे नाते होते. हिंदी सिनेमाच्या सुरूवातीला निर्माता दिग्दर्शकांमधील चमनलाल देसाई हे एक होते. त्यांचा मुलगा वीरेंद्र देसाई यांची, ‘नॅशनल स्टुडिओज’ नावाची कंपनी होती. एक दिवशी दोघे बाप-लेक चित्रपट बघायला टॉकीज मध्ये गेले. तेव्हा त्यांची नजर एक मुलीवर पडली, गर्दीतही ती मुलगी सगळ्यांच्या नजरेत भरत होती. त्यावेळी ती १३-१४ वर्षाची होती. दोघा बाप-लेकानी मनोमन विचार केला की आपल्या पुढल्या चित्रपटात ह्या मुलीला घ्यायचे. चित्रपट संपला आणि ते त्या मुलीला शोधू लागले, ती मुलगी मात्र तोपर्यंत तिच्या घरच्यांबरोबर निघून गेली होती.
काही दिवसांनी विरेंद्र देसाई अभिनेत्री शोभना समर्थ यांना भेटण्यासाठी तिच्या घरी गेले आणि बघीतले तर तिथे नलिनी जयवंत होत्या. त्यांना पाहिल्यावर देसाई यांना आनंद झाला. ह्यावेळी मात्र विरेंद्र देसाई यांनी जास्त वेळ न दवडता नलिनी जयवंत यांच्या समोर चित्रपटात काम करण्याचा प्रस्ताव ठेवला. नलिनी जयवंत यांनासुद्धा मनातली इच्छा पुरी झाल्यासारखे वाटले होते. फक्त त्यांना त्यांच्या वडिलांची भीती वाटत होती. कारण ते चित्रपटामध्ये काम करण्याच्या विरुद्ध होते. परंतु वीरेंद्र देसाई यांनी त्यांना नीट समजावून सांगितले तेव्हा त्यांनी ते मान्य केले यांच्या मागचे कारण पैसे हे होते, त्यावेळी त्यांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती.
नलिनी जयवंत (Nalini Jaywant) यांचा पहिला चित्रपट होता ‘राधिका’ जो १९४१ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट वीरेंद्र देसाई यांनी दिग्दर्शित केलेला होता. या चित्रपटाला संगीत होते अशोक घोष यांचे. यामधील सात गाण्यांना नलिनी जयवंत यांनी आवाज दिला होता. ‘राधिका’ या चित्रपटानंतर त्याचवर्षी महबूब ख़ान यांनी दिग्दर्शित केलेला एक चित्रपट प्रदर्शित झाला त्याचे नांव ‘बहन’ या चित्रपटात नलिनी जयवंत प्रमुख भूमिकेत होत्या. अनिल विश्वास यांनी नलिनी जयवंत यांच्याकडून चार गाणी गाऊन घेतली होती. ह्या चित्रपटातील ‘नहीं खाते हैं भैया मेरे पान’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. नलिनी जयवंत यांनी एकेठिकाणी सांगितले होते की त्या सहा-सात वर्षाच्या असताना ऑल इंडिया रेडिओवर मुलांसाठी कार्यक्रम सुरु झाले होते. तेथे एका संगीत स्पर्धेत त्यांना गाण्यासाठी प्रथम पुरस्कार मिळाला होता.
नलिनी जयवंत यांना चित्रपटातून सफलता तर मिळतच होती त्याचबरोबर वीरेंद्र देसाई यांचे नलिनी जयवंत यांच्यावर प्रेम बसले आणि दोघांचे लग्न झाले. परंतु हे लग्न फारसे टिकले नाही. त्यांचा घटस्फोट झाला, पुढे नलिनी जयवंत यांनी त्यांचे सहकलाकार प्रभू दयाल यांच्याशी विवाह केला. त्या दोघांनीही अनेक चित्रपटातून कामे केली होती.
१९५० मध्ये त्या परत चित्रपटात काम करू लागल्या. त्यांनी आणि अशोककुमार (Ashok Kumar) यांनी अनेक चित्रपट केले. त्यांच्या प्रेमाबद्दल अफवा पसरू लागल्या, त्यातच चेंबूरला युनियन पार्क मध्ये अशोककुमार यांनी त्यांच्या घरासमोर बंगला घेतला. नलिनी जयवंत या अभिनेत्री तर प्रसिद्ध होत्याच तसेच त्या बोल्ड फोटोशूट साठी देखील प्रसिद्ध होत्या. त्यावेळच्या मासिकातून त्यांचे बोल्ड फोटो येत असत म्ह्णून त्या नेहमी चर्चेत असत. मी १० जानेवारी २००० या दिवशी अशॊकुमारकडे मित्राबरोबर गेलो होतो, आम्ही जरा आधी पोहचल्यामुळे नलिनी जयवंत यांच्याकडे गेलो. माझ्या मित्राची त्यांचाशी ओळख होती. आम्ही गप्पा मारल्या, आणि मग अशॊकुमारकडे जाऊ लागलो. तेव्हा नलिनी जयवंत मला पटकन म्हणाल्या तुझे स्वाक्षऱ्यांचे प्रदर्शन झाले तर सांग मी येईन. परंतु त्यावेळी तो योग काही आला नाही.
अशोककुमार, नलिनी जयवंत या जोडीने संग्राम, काफिला, नौबहार, सलोनी, मिस्टर एक्स, शेरू हे चित्रपट केले. दिलीपकुमारने त्यांना ‘सबसे बडी अदाकारा’ म्हटले आहे. दिलीपकुमारने त्यांच्याबरोबर अनोखा प्यार, शिकस्त या चित्रपटातून काम केले. तर देवआनंद यांच्याबरोबर काला पानी, राही, मुनीमजी या चित्रपपटातुन कामे केली. ‘काला पानी’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ सह-अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. असे म्हणतात की ‘काला पानी’ या चित्रपटात मधुबालापेक्षा नलिनी जयवंत यांना प्रेक्षकांनी पसंती दिली होती. काला पानी नंतर त्यांनी चित्रपटात काम करणे कमी केले. ‘नास्तिक’मध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका केली होती. त्यांनी जवळ जवळ ४५ चित्रपटातून कामे केली.
२० डिसेंबर २०१० रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. त्यांचे निधन झाले हे तीन दिवस कुणालाच समजले नव्हते. त्यांच्या नोकराने त्यांच्या नातेवाईकांना कळवले. म्हणतात ना काळापुढे काहीच कुणाचे चालत नाही, तो सर्व काही विसरायला मजबूर करतो.
सतीश चाफेकर