सध्याच्या राजकारणात नेते मंडळी स्वतःच्या स्वार्थाची चांगलीच पोळी भाजून घेत असताना आपल्याला पहायला मिळतात. समाजसेवा करतोय अस सांगून नेता स्वतःची प्रॉपर्टी कधी वाढवतो हे त्याचं त्याला कळत नाही.
एकंदरीत काय तर सध्याचे राजकारण हे नेते मंडळींचा काळा बाजार करण्याचा अड्डाच झाला आहे. असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. आत्ताचे महाराष्ट्रातील राजकीय वारे बघता, सर्व नेतेमंडळीत आमक्या नेत्याने पैसे खाल्ले तमक्या नेत्यांची इतकी प्रॉपर्टी जप्त अशा बातम्या अलीकडे जास्त प्रकाशित होऊ लागल्या आहेत.
इतकंच काय तर महाष्ट्राचे माजी गृहमंत्री असलेले अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर खंडणी उकाळल्याचे आरोप लागल्याने त्यांना खुद्द राजीनामा द्यावा लागला हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. अर्थात त्यांच्यावर केलेल्या आरोपात किती तथ्य आहे हे लवकरच कळेल.
मात्र हे संपूर्ण प्रकरण बघता, महाराष्ट्रात याअगोदर गृहमंत्र्यांच्या बाबतीत खंडणी उकळल्याचा किंवा त्यांना खंडणी देण्याचा प्रयत्न झाला होता का असा प्रश्न मनात येतो. याच उत्तर आपल्याला माहीत आहे का? नाही ना चला तर मग राजकारणात थोडस मागे जाऊयात आणि गृहमंत्री आणि त्यांच्या खंडणीची राजकीय ऐतिहासिक दाखले जाणून घेऊयात.
ही गोष्ट आहे १९७८ च्या काळातली, की जेव्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नुकताच आपला स्वतंत्र पक्ष स्थापन करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले होते. मात्र त्यांच्या मंत्रिमंडळातील गृहमंत्र्याला एका गुन्हेगारकडून खूप मोठ्या रक्कमेची ऑफर देण्यात आलेली होती.
त्यावेळी भाई वैद्य (Bhai Vaidya) हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. भाई वैद्य हे अत्यंत अभ्यासू आणि प्रामाणिक असे नेते होते. तसेच त्यांची राजकारणात अत्यंत निष्कलंक राजकारणी म्हणून प्रतिमा होती. ही प्रतिमा त्यांनी आपल्या कृतीतून नेहमीच दाखवून दिली होती.
भाई वैद्य यांना एकदा एका गुन्हेगाराने मोठ्या गुन्ह्यातील अटक टाळण्यासाठी फोन केला आणि तुम्हाला हवी तितकी रक्कम देतो फक्त माझी अटक टाळा असे सांगितले.
मात्र अशा परिस्थितीत भाई वैद्य यांना काय करावे सुचत नव्हते. म्हणून त्यांनी आपले राजकीय गुरू एस. एम. जोशी यांना फोन लावला आणि घडलेली सगळी हकीकत त्यांना सांगितली.
त्यावर एस. एम. जोशींनी भाई वैद्य यांना सांगितले की जर तुला त्या व्यक्तीला शिक्षा करायची असेल तर तू त्याला अशी शिक्षा दे की, त्यावरून इतरांनीही याबाबत धडा घेतला पाहिजे.
मग पुढे काय! भाई वैद्य यांनीही आपल्या राजकीय बुद्धीचा वापर केला आणि मुंबईचे क्राईम ब्रांच प्रमुख ज्युलियो रिबेरो यांना याबाबत माहिती दिली. त्यांना सोबत घेऊन त्या गुन्हेगारास रंगेहात पकडण्याचा सापळा रचला गेला.
या प्रकरणाची गुप्तता इतकी पाळण्यात आलेली होती की खुद्द या प्रकरणाविषयी मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्तांना देखील सांगण्यात आले नव्हते.
पुढे तो गुन्हेगार पैश्यानी भरलेली बॅग घेऊन गृहमंत्र्यांच्या घरी आला आणि मला गुन्ह्यातून सुटका करण्यास मदत करा असे गृहमंत्री भाई वैद्य यांना सांगितले. मात्र यानंतर लगेचच दबा धरून बसलेल्या ज्युलिओ रिबेरो यांच्या टीमने त्या गुन्हेगाराला पैसे देताना आणि गुन्हा कबुल करताना रंगेहात पकडले आणि पैशांनी भरलेली बॅग जप्त केली.
जेव्हा हे प्रकरण मिडियासमोर आले तेव्हा मात्र गृहमंत्री भाई वैद्य आणि मुंबई पोलिसांचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात आले होते.
– निवास उद्धव गायकवाड