मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजविलेल्या रेखा कामत (Rekha Kamat) यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. माहिम येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. १९५२ मध्ये सुरु झालेला त्यांच्या अभिनयाचा प्रवास वयाची ८० वर्ष ओलांडल्यावरही अविरत चालू होता. वयानुसार त्यांची भूमिका बदलली. मुख्य अभिनेत्री, ताई, अक्का आणि आजीच्याही भूमिकेत त्या पडद्यावर आल्या. या प्रत्येक भूमिकेला रेखाताईंनी न्याय दिला.
रेखाताईंमध्ये आपल्याला ताई किंवा आजीचा भास होतो, अशा जेव्हा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया यायच्या तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू यायचे. “अभिनय हा माझा आत्मा आहे, तो मी शेवटच्या श्वासापर्यंत जपणार”, हे वाक्य रेखाताईंनी खरं केलं. मराठी चित्रपटसृष्टी बरोबरच मराठी नाट्यसृष्टीसाठी रेखा कामत यांनी दिलेले योगदान अमुल्य असेच आहे.
पाच बहिणी आणि दोन भाऊ अशा कुटुंबात कुमुद सुखटणकर आणि कुसुम सुखटणकर या दोघी बहिणी संगीत आणि अभिनयाच्या लहानपणापासून चाहत्या होत्या. त्यांचे वडील आर्मी स्टोअरमध्ये लिपिक होते. कुमुद आणि कुसुम या बहिणींचे शिक्षण इतर भावडांसोबत कुंभारवाडा येथील शाळेत झाले. त्यानंतर दादरच्या इंडीयन एज्युकेशन सोसायटीच्या छबिलदास शाळेत पुढच्या शिक्षणासाठी ही सुखटणकर बहिण भावंड गेली.
शाळेत शिकत असताना, या दोन्ही बहिणींनी नृत्य-गायनाचे धडे गिरवले. गौरीशंकर यांच्याकडून कथ्थक, तर पार्वतीकुमार यांच्याकडून भरतनाट्यम शिकल्या. भानुदास मानकामे आणि घोडके गुरुजींकडून गाण्याचे धडे घेतले. घरचे वातावरणही मोकळे होते. गाण्याच्या कौशल्याचे घरातून कौतुक होत असे. त्यामुळे कुमुद यांनी वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच गणेशोत्सवात, मेळ्यांमध्ये छोट्या नाटकांमधून काम करायला सुरुवात केली.
जेष्ठनृत्यगुरु सचिन शंकर यांच्या ‘रामलीला’ या प्रसिद्ध बॅलेत त्यांना आणि त्यांच्या बहिणीला काम करण्याची संधी मिळाली. हा बॅले बघायला प्रसिद्ध अभिनेत्री हंसा वाडकर आल्या होत्या. बॅलेमध्ये मुक्त वावरणारी ही हसरी, गोड चेहऱ्याची कुमुद त्यांना आवडली. तेव्हा गजराज चित्रच्या नव्या चित्रपटासाठी एका नव्या चेहऱ्याचा शोध चालू होता.
हंसा वाडकर यांनी गजराज चित्रच्या राजाभाऊ परांजपे, सुधीर फडके आणि ग. दि. माडगूळकर या दिग्गजांपुढे या दोन बहिणींची शिफारस केली. अर्थातच कुमुद सुखटणकर यांना ही संधी मिळाली, पण वेगळ्या नावानं!
चित्रपटासाठी कुमुद आणि कुसुम ही जुनी नावं वाटतात. चित्रपटासाठी जरा आकर्षक नावं पाहिजेत म्हणून खुद्द गदिमां यांनी रेखा आणि चित्रा असं या बहिणींचं नामकरण केलं.
लाखाची गोष्ट हा चित्रपट १९५२ साली प्रसिद्ध झाला. रेखा कामत (Rekha Kamat) यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. हाच चित्रपट करताना चित्रपटाच्या संवादलेखनाचे काम करणारे ग. रा. कामत यांच्याबरोबर रेखा यांचा परिचय झाला. लगेच पुढच्या वर्षी, वयाच्या १९ व्या वर्षी रेखा, सौ. रेखा कामत झाल्या. लग्नानंतरही त्यांनी चित्रपटात काम करणं सुरु ठेवलं होतं. सासरकडूनही सहकार्य मिळाल्यामुळे रेखा कामत यांचा अभिनय प्रवास जोमानं सुरु झाला.
लग्नानंतर त्यांनी ‘कुबेराचं धन’ हा चित्रपट केला. त्यात त्यांचा डबल रोल होता. गृहदेवता या चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून रौप्य पदक मिळाले. बायको माहेरी जाते, या चित्रपटातील रेखा यांची भूमिकाही गाजली. पुण्यामध्ये रहाणारे हे कामत जोडपं काही वर्षांनी मुंबईमध्ये स्थायिक झालं. रेखा यांचा गाण्याचा सरावही चांगला होता. तो इथे कामाला आला.
मुंबईमध्ये आल्यावर त्यांनी संगीत रंगभूमीवर प्रवेश केला आणि आपल्या अभिनयाबरोबर गाण्यांचाही ठसा उमटवला. सौभद्र, एकच प्याला, भावबंधन ही त्यांची नाटकं गाजली. त्याचबरोबर सुंदर मी होणार, दिवा जळू दे सारी रात, तुझे आहे तुजपाशी, लग्नाची बेडी, कल्पवृक्ष कन्येसाठी, दिल्या घरी तू सुखी रहा, कालचक्र अशा व्यावसायिक नाटकांमधून रेखाताईंनी भूमिका केल्या.
प्रसिद्ध नाट्यनिर्माते मोहन वाघ आणि रेखाताई यांचं अनोखं नातं होतं. मोहन वाघ यांच्या चंद्रलेखामधून त्यांनी तरुण तुर्क, ऋणानुबंध, प्रेमाच्या गावा जावे, गोष्ट जन्मांतराची या नाटकात भूमिका केल्या. रंगभूमीवर काम करत असतानाच त्यांनी विजया मेहता दिग्दर्शित यातनाघर तसेच अमोल पालेकर दिग्दर्शित पार्टी या प्रायोगिक नाटकातही काम केले. रेखाताई यांनी केलेल्या सर्व नाटकांची एकूण प्रयोगसंख्या पाच हजारांहून अधिक आहे हे विशेष.
हे ही वाचा: किस्सा महेंद्र कपूर (Mahendra Kapoor) यांच्या रशियन भाषेतील गाण्याचा!
‘हे’ आहेत २०२१ मध्ये भारतीयांनी गुगलला विचारलेले टॉप १० प्रश्न
याशिवाय रेखाताई छोट्या पडद्यावरही तेवढ्याच लोकप्रिय ठरल्या. प्रपंच, माणूस, याला जीवन ऐसे नाव, सांजसावल्या, एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकांमध्ये रेखाताईंनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. वास्तुपुरुष आणि ‘अगबाई अरेच्या’ या चित्रपटात आजी म्हणून त्या भाव खाऊन गेल्या.
हे सुद्धा वाचा: जगातील सर्वात पहिला कम्प्युटर व्हायरस पाकिस्तान मधील ‘या’ दोन पठ्ठ्यांनी बनवला होता
अभिनयाच्या प्रदीर्घ कारकिर्दीसाठी २००५ साली रेखाताईंना जनकवी ‘पी. सावळाराम’ पुरस्कार, २००७ मध्ये महाराष्ट्र सरकारचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार, तर २०१२ साली दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या ‘नवदुर्गा’ पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. पती, संजीवनी आणि माधवी या दोन मुली, जावई आणि नातवंडं यांच्यासोबत गुण्यागोविंदानं रमणाऱ्या रेखाताई मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाच्या साक्षिदार होत्या.
– सई बने