Home » ज्येष्ठ इटालियन अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा यांचा ‘जीवनप्रवास’

ज्येष्ठ इटालियन अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा यांचा ‘जीवनप्रवास’

by Team Gajawaja
0 comment
Gina Lollobrigida
Share

जगातील सर्वात सुंदर महिला हा बहुमान मिळालेली ज्येष्ठ इटालियन अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा (Gina Lollobrigida) यांचे निधन झाले आहे. जीना या लोलो या टोपण नावानं अधिक ओळखल्या गेल्या. 1950 च्या दशकात आंतरराष्ट्रीय स्टारडम मिळविणारी ही ज्येष्ठ इटालियन अभिनेत्री 95 वर्षाची होती.  त्यांनी केलेल्या एका चित्रपटातील भूमिकेवरुन त्यांना जगातील सुंदर महिला हा बहुमान देण्यात आला. वयाच्या 95 वर्षीही जीना लोलोब्रिगिडा (Gina Lollobrigida) यांची तब्बेत ठणठणीत होती. काही महिन्यापूर्वी त्यांना छोटासा अपघात झाला. त्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली. पायावर शस्त्रक्रिया केल्यावर जीना लोलोब्रिगिडा पुन्हा चालायला लागल्या.  त्यासंबंधी बातम्याही आल्या.  मात्र अचानक जीना लोलोब्रिगिडा यांच्या निधनाची बातमी आली आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.  

1955 मध्ये ‘द मोस्ट ब्यूटीफुल वुमन इन द वर्ल्ड’ या चित्रपटात जीना लोलोब्रिगिडा यांनी काम केले. त्यांचे सौदर्य बघून त्यांना जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून संबोधण्यात आले.  याशिवाय अभिनेता रॉक हडसन यांच्यासहा जीना यांनी ‘कम सप्टेंबर’ चित्रपटात काम केले. या चित्रपटाला मानाचा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला होता. याशिवाय जीनाने ‘ट्रॅपीझ’, ‘बीट द डेव्हिल’ आणि ‘बुओना सेरा, मिसेस कॅम्पबेल’मध्येही काम केले.  त्यांचे सौदर्य आणि अभिनय यांचे अनेक चाहते होते. 1969 मध्ये जीना लोलोब्रिगिडा (Gina Lollobrigida) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ‘डेव्हिड डी डोनाटेलो अवॉर्ड’ मिळाला.  हा इटलीतील सर्वात मोठा चित्रपट पुरस्कार मानला जातो. 

जीना लोलोब्रिगिडा (Gina Lollobrigida) यांच्या कुटुंबियांचा फर्निचरचा व्यवसाय होता. मात्र जीना यांनी मॉडलिंग करायला सुरुवात केली. त्यानंतर जीना यांनी  चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यांचे सुरुवातीचे चित्रपट फ्लॉप ठरले.  मात्र  ‘कम सप्टेंबर’, ‘ट्रॅपीझ’, ‘बीट द डेव्हिल’, ‘बुओना सेरा’, ‘मिसेस कॅम्पबेल’ या चित्रपटांनी त्यांची लोकप्रियता वाढवली. 1970 च्या दशकाच्या अखेरीस, लोलोब्रिगिडाने छायाचित्र पत्रकार म्हणून काम केले. त्यांनी पॉल न्यूमन, साल्वाडोर डाली, हेन्री किसिंजर, डेव्हिड कॅसिडी, ऑड्रे हेपबर्न, एला फिट्झगेराल्ड आणि जर्मन राष्ट्रीय फुटबॉल संघाचे फोटो काढले.  जीना यांनी कम्युनिस्ट क्युबाचे नेते फिडेल कॅस्ट्रो घेतलेली मुलाखतही गाजली. अभिनेत्री म्हणून जेवढी त्यांची ओळख झाली नाही, तेवढी ओळख फोटो जर्नलिस्ट म्हणून त्यांची झाली.  

=======

हे देखील वाचा : ‘स्पेअर’ ठरलंय बेस्ट सेलर…

======

1990 च्या दशकात त्यांनी  काही किरकोळ फ्रेंच चित्रपटात भूमिका केल्या.  चित्रपटापासून दूर झाल्यावर जीना लोलोब्रिगिडा अनेक सामाजिक उपक्रमात सहभागी होत असत.1986 मध्ये, जीना लोलोब्रिगिडा यांना 36 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्यूरीचे प्रमुख म्हणून आमंत्रित करण्यात आले होते,  नॅशनल इटालियन अमेरिकन फाऊंडेशन (NIAF) च्या त्या सक्रिय समर्थक होत्या.  2008 मध्ये, त्यांना फाउंडेशनच्या वर्धापन दिनी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 2013 मध्ये जीना यांनी आपल्या दागिन्यांचा संग्रह विकला.  यातून मिळालेली रक्कम त्यांनी एका समाजसेवी संस्थेला देणगी स्वरुपात दिली.  

1999 मध्ये, लोलोब्रिगिडा यांनी युरोपियन संसदेसाठी निवडणूकही लढवली. 2022 च्या इटालियन सार्वत्रिक निवडणुकीत,  म्हणजेच जीना यांनी वयाच्या 95 व्या वर्षी, रिपब्लिकच्या सिनेटमध्ये जागा जिंकण्याचा प्रयत्न केला. जीना यांचे वैयक्तिक जीवन बरेच वादग्रस्त ठरले.  मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्या कार्यमग्न होत्या. बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ही जीना लोलोब्रिगिडा यांची खास चाहती होती.  त्यांच्या टोपण नावावरुनच करिष्मानं स्वतःचे टोपण नाव लोलो असे ठेवले होते.  

सई बने…


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.