हिंदू धर्मात श्रावण महिन्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान शंकराची पूजा करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी हा सर्वात पवित्र महिना मानण्यात येतो. या महिन्यात शाकाहारी भोजन करण्यात येते. यामागे जसे धार्मिक कारण आहे, तसेच शास्त्रीय कारणही देण्यात येते. पावसामुळे झालेले दमट वातावरण या महिन्यात असते. (Shravan Month)
अशावेळी साधे अन्न सेवन केले तर ते पचनास सोप्पे जाते, म्हणून या काळात शाकाहारी भोजनाचा आग्रह केला जातो. यासोबतच श्रावण महिन्यात अनेक हिंदू सण साजरे होतात. त्यामुळे या महिन्यात बहुतांशी देशात शाकाहार पाळला जातो. मात्र फक्त भारतातच नव्हे तर भारतासह अन्य देशांमध्येही शाकाहार पाळला जातो, हे सांगितले तर आश्चर्य वाटेल. भारताच्या शेजारी असलेल्या नेपाळमध्येही या श्रावण महिन्याचे मोठे महत्त्व आहे. पशुपतीनाथांची नगरी असलेल्या नेपाळमध्ये श्रावण महिन्यात मोठा उत्सव साजरा होतो. यापाठोपाठ, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड सारख्या देशातही श्रावण महिना हा धार्मिक महिना म्हणून पाळण्यात येतो. या देशातही या महिन्यात शाकाहारी भोजन घेण्यात येते आणि भगवान शंकराची पूजा करण्यात येते. भारतात सर्वाधिक पूजा अर्चा आणि उपवास श्रावण महिन्यात करण्यात येतात. हा महिना शाकाहारी भोजनाचा महिना म्हणूनही ओळखला जातो.
श्रावण महिन्यातील शाकाहारी भोजनामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणे आहेत. श्रावण महिना हा भगवान शंकराचा आवडता महिना आहे. भगवान शंकराचे भक्त या काळात उपवास करतात. शिवाय हा महिना आध्यात्मिक शुद्धीकरण आणि आत्म-नियंत्रणाचा काळ मानला जातो. त्यासाठी शाकाहारी आहार चांगला असल्याचे मानले जाते. यासोबतच वैज्ञानिक कारणही देण्यात येते. (Shravan Month)
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता आणि तापमानात बदल झाल्यामुळे पचनक्रिया मंदावते. या ऋतूत मांस, विशेषतः जड आणि मसालेदार पदार्थ, पचण्यास कठीण होऊ शकतात. म्हणून, श्रावण महिन्यात शाकाहारी अन्न खाणे पचनाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. भारतासह नेपाळमध्येही श्रावण महिना पाळला जातो. या भारताशेजारील देशातही श्रावण महिना, तीज आणि नवरात्रोत्सवानिमित्त येथील लोक मांसाहारी पदार्थ आहारातून वर्ज करतात. काठमांडूमधील पशुपतिनाथ आणि माखन हनुमानढोका सारख्या मंदिरांमध्ये यावेळी नेपाळी नागरिक मोठ्या संख्येनं गर्दी करतात. नेपाळमधील भक्तपूर येथे असलेल्या डोलेश्वर महादेव मंदिरातही भाविक मोठ्या संख्येनं गर्दी करतात. नेपाळमध्ये श्रावण महिन्यात हिंदू महिला लाल रंगाचे कपडे घालतात. यामुळे घरात संपन्नता येते, अशी धारणा आहे.
नेपाळप्रमाणेच श्रीलंकेतही श्रावण महिन्यात भगवान शंकराची उपासना करण्यात येते. यानिमित्त येथील हिंदू मोठ्या प्रमाणात शाकाहारी भोजनाला प्राधान्य देतात. श्रीलंकेत अनेक प्रसिद्ध शिवमंदिर आहेत, त्यापैकी प्रमुख म्हणजे मुन्नेश्वरम मंदिर आणि त्रिंकोमाली येथील कोनेश्वरम मंदिर. मुन्नेश्वरम मंदिर हे श्रीलंकेतील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरांपैकी एक आहे आणि कोनेश्वरम मंदिर, हे तिरुकोनामलाई कोनेसर मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरात श्रावण महिन्यात मोठ्या धार्मिक सोहळ्यांचे आयोजन केले जाते. भगवान शंकरावर अभिषेक आणि पूजा करण्यात येतात. त्यामुळे यात सहभागी होणारे हिंदू भाविक हा श्रावण महिना शाकाहारी भोजन करतात. या दोन देशांपाठोपाठ थायलंडमध्येही श्रावण महिन्यात मंदिरांमध्ये गर्दी होते. बॅंकॉक येथील श्री महा मरियम्मन मंदिरात भाविकांची गर्दी होते. या मंदिरात अहोरात्र पूजा असते. (Shravan Month)
=========
Cambodia : कंबोडियाला स्वातंत्र्य कसे मिळाले? वाचा इतिहास
=========
याशिवाय या मंदिराच्या शेजारे असलेल्या उमा देवी मंदिरातही भाविक मोठ्या संख्येनं जमा होतात. हे मंदिर भगवान शंकराची पत्नी माता पार्वती हिला समर्पित आहे. या मंदिरामध्ये श्रावण महिन्यात विशेष पूजा अर्चा कऱण्यात येतात. श्रावण महिन्यात थायलंडमध्ये बहुतांश नागरिक मंदिरांना भेट देतात आणि उपवास करतात. थायलंडमध्ये श्रावण महिना हा एक महत्त्वाचा धार्मिक आणि सांस्कृतिक महिना म्हणून मानला जातो. यासोबत म्यानमारमध्येही श्रावण महिन्याचे वेगळे महत्त्व आहे. येथे श्रावण महिन्याला वासो असेही म्हणतात. या काळात, भिक्षू तीन महिन्यांच्या पावसाळी विश्रांतीसाठी त्यांच्या पूजास्थळी जातात. म्यानमारमध्ये, हा महिना धार्मिक उपक्रम, उपवास आणि दानधर्मासाठी समर्पित मानला जातो. त्यामुळे या काळात येथील नागरिक शाकाहारी भोजनाला प्राधान्य देतात. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics