नवी मुंबई एपीएमसीमध्ये भाजीपाला आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. पावसामुळे उठाव कमी झाला आहे. परिणामी भाजीपाल्याचे दर 40 टक्क्यांनी उतरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसात वाढलेले भाजीपाला दर आता 40 टक्क्यांनी खाली आले आहेत. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या दोन दिवसात भाजीपाला आवकीत वाढ झाल्याने दर घसरले आहेत. एपीएमसीमध्ये 300 पर्यंत होणारी भाजीपाला गाड्यांची आवक आता 450 गाड्यांवर गेली आहे.
गेल्या आठवड्यात भाजीपाला दर वाढू लागल्याने राज्यातील, त्यासोबतच परराज्यातील शेतकरी वर्गाने भाजीपाल्याला दर मिळेल, या आशेपोटी मोठ्या प्रमाणात भाजीपाला वाशी एपीएमसी मार्केटमध्ये पाठवला आहे. यामुळे अवकीत अचानक वाढ झाली आहे. तर दुसरीकडे गेल्या तीन-चार दिवसापासून पाऊस सुरु असल्याने किरकोळ विक्रेत्यांनी भाजी खरेदीकडे पाठ फिरवल्याने उठाव कमी झाला आहे. या दुहेरी कारणामुळे भाजीपाल्याच्या किंमती 40 टक्क्यांनी उतरल्या आहेत.
राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, पुणे भागातून सद्धा आवक सुरु आहे. तर परराज्यातील विचार केल्यास तामिळनाडू, आंध्रप्रदेश, गुजरातमधून भाजीपाला वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होत आहे.
भाजीपाला आताचे दर मागील दर
कोबी 7-10 15-20
फ्लॉवर 20-24 35-40
वांगी 30-32 40-45
काकडी 18-20 30-35
फरसबी 40-50 60-70
मिरची 35-40 50-55
वटाणा 80-90 130-140
शिमला 30-40 50-60
गवार 40-50 70-80
पालेभाज्या (जुडी)
कोथिंबीर 20-25 30-35
पालक 5-10 15-20
मेथी 15-20 25-30
भाजीपाल्याचे दर उतरले
42