आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्या धर्मात दैवीय अंश असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आपला धर्म हा नेहमीच वेगळा ठरत असतो. आपल्यासाठी आपले घर हे खूपच महत्वाचे असते. आपले घर आपल्यासाठी स्वर्ग असते. तिथे एक वेगळाच आनंद, शांती आपल्याला मिळते. प्रत्येक व्यक्तीच्या घरात देवघराला एक वेगळेच महत्व आणि जागा असते. आपल्या देशात कोणाच्या घरात देवघर नाही असे घर शोधूनही सापडणार नाही. घरात देव असले की घरात एक वेगळीच ऊर्जा जाणवते.
मात्र तुम्हाला माहित आहे का, वास्तुशास्त्रामध्ये देवघराबद्दल, देवघरात ठेवल्या जाणाऱ्या देवांबद्दल आणि वस्तूंबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. ज्यांचा वास्तुशास्त्रावर विश्वास आहे ते देखील आणि ज्यांचा नाही ते देखील काही गोष्टी पाळताना दिसतात. वास्तुशास्त्रानुसार देवघरात ठेवल्या जाणाऱ्या गोष्टी ह्या आपल्या जीवनात परिणाम करत असतात. त्यामुळे देवघरात कोणत्या गोष्टी ठेवाव्या जेणेकरून आपल्या आयुष्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल.
गंगाजल
हिंदू धर्मात गंगा नदीला अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या संस्कृतीनुसार गंगेला प्राणदायिनी आणि जीवनदायिनी मानले जाते. तिच्या पाण्याला देखील खास महत्व आहे. याच गंगाजलाचे विशेष महत्व आहे. म्हणून प्रत्येक पूजाघरात लहान पितळेच्या किंवा चांदीच्या भांड्यात गंगाजल ठेवावे आणि रोज त्याची पूजा करावी. पोर्णिमा किंवा एकादशी यांसारख्या शुभ दिनी संपूर्ण घरात गंगाजल शिंपडणे पवित्र मानले जाते. असे केल्याने घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो.
मोरपंख
आपली संस्कृती व पौराणिक मान्यतेप्रमाणे मोरपंखाला भगवान श्री कृष्णाचा अंश मानले जाते. पूजाघरात मोरपंख ठेवणे चांगले मानले जाते. मोरपंख पूजाघरात असल्याने कोणाचीही वाईट नजर घरावर पडत नाही अशी मान्यता आहे.
गोमूत्र
गायीला हिंदू धर्मात पूजनीय आणि देवीचे स्थान दिले गेले आहे. असे समजले जाते की गायीमध्ये ३३ कोटी देवतांचा वास असतो. गायीचे दूध, शेण आणि गौमुत्र यांना देखील धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्व आहे. गोमुत्राचा उपयोग पूजा करताना देखील केला जातो. तसेच गौघृत सुद्धा पूजेसाठी महत्वाचे मानले जाते. जरी तुम्ही याचा रोज वापर केला नाहीत तरी या दोन्ही वस्तू पूजाघरात असणे आवश्यक मानले जाते. देवघरामध्ये या गोष्टी ठेवण्याने त्याचे शुभ परिणाम दिसून येतात.
शंख
पूजा करण्याच्या जागेवर शंख असणे महत्वाचे मानले जाते. दक्षिणावर्ती शंखाच्या आवाजाने तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती नष्ट होते. शंख असल्याने आजूबाजूचे वातावरण भक्तिमय होऊन जाते. गुरुवारी दक्षिणावर्ती शंखाने भगवान विष्णूची पूजा केल्याने शुभ फलाची प्राप्ती होते.
शाळीग्राम
शाळीग्राम देखील घरातील देवघरामध्ये असला पाहिजे. हा शाळीग्राम पूजेमध्ये असला पाहिजे रोज नियमितपणे तुळशीचे पान असलेल्या पाण्याने त्याला अभिषेक घातला पाहिजे. असे केल्याने भगवान विष्णूच्या सर्व अवतारांचा आशीर्वाद मिळतो. पौराणिक मान्यतेनुसार ज्या घरात नियमित शाळीग्रामची पूजा होते त्या घरात गरिबी येत नाही आणि मां लक्ष्मीचा सदैव वास असतो.
======
हे देखील वाचा : ‘ही’ योगासने करा आणि केस गळती थांबवा
======
यासोबतच वास्तशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात देवघर असले पाहिजे. देव्हाऱ्यात प्रस्थापित केल्या जाणाऱ्या मूर्तींचा जीवनावर प्रभाव पडतो. देवघरातील मूर्ती वरद हस्त दर्शवणाऱ्या असाव्यात. त्यामुळे पूजा झाल्यावर देवतांची आशीर्वाद रुपी भावमुद्रा पाहणे ऊर्जादायी ठरते. कडक किंवा रागीट स्वरूपातील फोटो, मूर्ती कधीही देवघरात ठेऊ नये. शिवाय वास्तुशास्त्रानुसार देव्हाऱ्याच्या डोक्यावर कोणत्याही वस्तू ठेवू नये. जसे की काडेपेटी, वाती, उदबत्ती घर, हळद कुंकवाचे करंडे आदी.