भारतीयांचा सर्वाधिक ओढा कुठल्या देशाकडे असतो तर पहिल्या क्रमांकावर नाव येतं ते अमेरिकेचे. नंतर इंग्लड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, जर्मनी, दुबई, कतार, अशा देशांची नावे घेतली जातात. पण जगातील आणखी एक देश असा आहे, ज्यांने भारतीयांसाठी आपली द्वारे खुली केली आहेत. फार काय या देशातील नागरिकत्व जर भारतीयांना हवे असेल, तर ते अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीत नागरिकत्वही उपलब्ध करुन देत आहे. फक्त भारतीयांसाठी ही सुविधा असून, भारतीयांनी आपल्या देशात रहावे यासाठी या देशाने रेडकार्पेट घातले आहे. (Vanuatu)
अनेक भारतीय देश-विदेशात पर्यटनासाठी जातात. भारतीय विद्यार्थी परदेशी विद्यापीठात शिक्षणासाठी जातात. तेव्हा हे विद्यार्थी मोजक्याच देशांना प्राधान्य देतात. मात्र या जगात असे अनेक देश आहेत, ज्यांच्या शिक्षणाचा दर्जा अमेरिका, इंग्लड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, कॅनडा यांच्यापेक्षा चांगला आहे. शिवाय येथील सुविधाही जास्त आहे. आणि या देशाचे निसर्गसौंदर्य अन्य देशांपेक्षा सरस आहे. हा देश म्हणजे, वानुआतू. हे नाव ब-याच भारतीयांना माहित नसेल, पण हा देश भारतीयांसाठी द्वारे उघड़ून तयार आहे. केवळ काही औपचारिकता पूर्ण केल्यावर फक्त ७ आठवड्याच्या कालावधीनंतर या देशाचे नागरिकत्वही बहाल करण्यात येत आहे. (Vanuatu)
वानुआतू हा दक्षिण पॅसिफिक महासागरात वसलेला एक छोटासा देश आहे. हा देश म्हणजे एक बेटच आहे. या देशाच्या सर्वच बाजुनं समुद्राचा वेढा आहे. या विशाल समुद्रकिना-यामुळे वानुआतू मधील निसर्गसौदर्यही कोणालाही मोहात पाडेल असेच आहे. यामुळेच जगभरातील अनेक नागरिक या देशात रहाण्यासाठी उत्सुक आहेत. सध्या वानुआतूमध्ये जगभरातील मान्यवर नागरिकही नागरिकत्व मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मुख्य म्हणजे, वानुआतू मध्ये न जाताही तेथील नागरिकत्व मिळू शकते. कारण या देशामधील सरकारने एक गुंतवणूक योजना जाहीर केली आहे. या अंतर्गत कोणत्याही एका व्यक्तीने १ कोटी रुपये दिले तर त्याला वानुआतूचे नागरिकत्व मिळते. जर जोडप्याला नागरिकत्व हवे असेल तर त्यांना १.५ कोटी द्यावे लागतात. अशांचा नवीन पासपोर्ट अर्ज केल्यानंतर ७ आठवड्यांच्या आत त्यांना घरपोच देण्यात येत आहे.
वानुआतू मध्ये मिळत असलेल्या सुविधांमुळे भारतीयांचा या देशाकडे ओघ वाढू लागला आहे. दीड वर्षात सुमारे ३० अनिवासी भारतीय नागरिकांनी वानुआतूचे नागरिकत्व घेतल्याची माहिती आहे. भारतीयांपाठोपाठ रशियन आणि यूएईमधील नागरिक वानुआतूमधील नागरिकत्व घेत आहेत. प्रामुख्यानं कर चुकवण्यासाठी या वानुआतू देशाचे नागरिकत्व घेतले जाते, अशी माहिती आहे. कारण वानुआतूमधील बॅंकांमध्ये ठेवलेला निधी भारत सरकारला सांगण्याचे बंधन येथील बॅंकावर नाही. मुख्य म्हणजे, वानुआतुचे नागरिक असताना, दुसऱ्या देशाचे नागरिकही होता येते. यासर्वांमुळे वानुआतू या देशाकडे देशातील श्रीमंतांच्या नजरा लागल्या आहेत. (Vanuatu)
====================
हे देखील वाचा : स्पेस टुरिझममुळे आता पृथ्वी बाहेर ही फिरता येणार…
====================
वानुआतूमध्ये प्रथम मेलेनेशियन लोकांची वस्ती होती. १८८० च्या दशकात, फ्रान्स आणि युनायटेड किंगडम यांनी या द्वीपसमूहाच्या काही भागांवर दावा केला. तिथेही स्वांतत्र्याची लढाई लढली गेली. १९७० च्या दशकात एक स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली आणि १९८० मध्ये वानुआतू प्रजासत्ताकची स्थापना झाली. स्वातंत्र्य मिळाल्यापासून, हा देश संयुक्त राष्ट्र संघ, राष्ट्रकुल राष्ट्र, संघटना इंटरनॅशनल डे ला फ्रँकोफोनी आणि पॅसिफिक आयलंड फोरमचा सदस्य बनला आहे. वानुआतू हा Y-आकाराचा द्वीपसमूह आहे. त्यात ८३ बेटं आहेत. ज्वालीमुखीच्या स्फोटातून या बेटांची निर्मिती झाली आहे. या बेटांपैकी ६५ बेटांवरच लोकवस्ती आहे.
यामधीलही काही बेटांवर अद्यापही फ्रान्स आपला हक्क सांगत आहे. मात्र वानुआतूच्या सरकारनं हा हक्क नाकारला आहे. या देशात मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. तसेच येथे कोकोचेही पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. याशिवाय केळी, लसूण, कोबी, शेंगदाणे, अननस, ऊस, तारो, रताळे, टरबूज, लीफ मसाले, गाजर, मुळा, वांगी, व्हॅनिला याशिवाय मसाल्यांच्या पदार्थांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन वानुआतूमध्ये घेतले जाते. युरोपियन देशांकडून या सर्वांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच येथे वर्षाचे बाराही महिने पर्यटन व्यवसाय चालू असतो. त्यामुळे या शेती उत्पादनावर आणि पर्यटनावर देशाचे आर्थिक गणित अवलंबून आहे. (Vanuatu)
सई बने