भारतीय ट्रेनचा चेहरा मोहरा बदलतोय आणि याचे प्रमुख उदाहरण म्हणजे वंदे भारत एक्स्प्रेस…(Vande Bharat Express) चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) मध्ये अवघ्या अठरा महिन्यात तयार झालेल्या या गाडीचे कोच प्रवाशांसाठी आरामदायी असे आहेत. संपूर्ण भारतीय बनावटीची ही गाडी आता भारतातल्या तिस-या प्रतिष्ठीत मार्गावर धावणार आहे. तो रेल्वे मार्ग म्हणजे मुंबई ते गांधीनगर. वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील तिसरी सेमी-हाय-स्पीड ट्रेन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात 75 वंदे भारत गाड्या सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता देशातली तिसरी वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाली आहे. यापाठोपाठ अन्य राज्यांनाही वंदे भारत एक्सप्रेसद्वारे जोडण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या सर्व 75 वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्यावर भारतीय रेल्वेच्या इतिहासात वेगाची आणि पर्यायानं विकासाची क्रांती होणार आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तिसऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे (Vande Bharat Express) उद्घाटन केले. आता ही एक्सप्रेस महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या राजधानींदरम्यान धावणार आहे. मुंबई-गांधीनगर वंदे भारत ही देशातील तिसरी सेमी-हाय-स्पीड ट्रेन आहे. अत्यंत आधुनिक सुविधा असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसबाबत प्रवाशांमध्ये उत्सुकता आहे. पहिली वंदे भारत एक्स्प्रेस 15 फेब्रुवारी रोजी दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावली. त्यानंतर या एक्सप्रेसबाबत रेल्वे प्रवाशांमध्ये उत्सुकता वाढली. 1,128 प्रवासी बसण्याची क्षमता असलेल्या या सेमी-हाय-स्पीड ट्रेनचा वेग 160 किमी प्रतितास इतका आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची ही ट्रेन प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. भारत सरकारच्या मेक इन इंडिया या उपक्रमाअंतर्गत केवळ 18 महिन्यांच्या कालावधीत 100 कोटी रुपये खर्चून या गाड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या नवी दिल्ली-वाराणसी, नवी दिल्ली-कटरा या दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या कार्यरत आहेत. त्याला आता मुंबई ते गांधीनगर अशी तिसरी जोड मिळाली आहे. 2023 पर्यंत अशा 75 गाड्या देशभरात चालवण्यात यणार आहेत.
वंदे भारत एक्सप्रेसचा लूक आणि त्यातील सुविधा या प्रवाशांना सुखावणा-या आहेत. वंदे भारत एक्सप्रेसच्या (Vande Bharat Express) सध्याच्या रचनेमध्ये गाडीला 16 डबे आहेत. त्यात 1128 प्रवासी बसू शकतात. गाडीच्या दोन्ही बाजूंस चालकांचे कक्ष आहेत. संपूर्णपणे वातानुकुलित असलेल्या या गाडीत शयनयान सुविधा मात्र नसून फक्त बसण्याची सोय आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी वाय-फाय, गाडीचा वेग, पुढील स्थानक ही माहिती पुरवणारी यंत्रणा आहेच. शिवाय स्वयंचलित दरवाजे, आपोआप फ्ल्श होणारी शौचालये, अशा अद्ययावत सुविधा देण्यात आल्या आहेत. वंदे भारतच्या एक्झिक्युटिव्ह क्लासच्या प्रवाशांसाठी साइड रिक्लाइनिंग सीटची सुविधा उपलब्ध आहे. ही सुविधा लवकरच सर्व वर्गांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये 180 डिग्री रेसिप्रोकेटिंग सीटची अतिरिक्त सुविधा आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या(Vande Bharat Express) डब्यांमध्ये पूर संरक्षणासाठी एक सुधारित फ्लडप्रूफिंग यंत्रणा बसवण्यात आली आहे. या अंतर्गत, ट्रेन 400 मिमीच्या तुलनेत 650 मिमी उंचीपर्यंत पूर सहन करण्यास सक्षम असेल. ट्रेनमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यास प्रत्येक डब्यात 4 आपत्कालीन दिवे उपलब्ध आहेत. याशिवाय प्रवाशांना वैयक्तिक वाचन दिवे देखील आहेत. प्रत्येक कोचमध्ये गरम जेवण आणि गरम आणि थंड पेये देण्यासाठी सुविधा असलेली पॅन्ट्री आहे. अतिरिक्त प्रवाशांच्या सोयीसाठी उष्णता आणि आवाज अतिशय कमी पातळीवर ठेवण्यासाठी इन्सुलेशन आहे.
===========
हे देखील वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 5G नेटवर्क लॉन्च, जाणून घ्या खासियत
===========
भारतीय रेल्वे वाहतुकीला आधुनिकतेकडे नेण्यासाठी ही वंदे भारत एक्सप्रेस मोठे योगदान ठरणार आहे. 2017 साली रेल्वेने ट्रेन 18 नावाचा प्रकल्प हाती घेतला. ज्याअंतर्गत 2018 सालापर्यंत विजेवर धावणारी संपूर्ण भारतीय बनावटीची रेल्वेगाडी विकसित करण्याचा निर्धार करण्यात आला. ऑक्टोबर 2018 मध्ये या गाडीची पहिली यशस्वी चाचणी झाली. फेब्रुवारी 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या प्रवासी सेवेला हिरवा झेंडा दाखवला. नवी दिल्ली-वाराणसी वंदे भारत एक्सप्रेसला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तशीच लोकप्रियता नवी दिल्ली-वैष्णोदेवी या दुस-या वंदे भारत गाडीला मिळाली. अनेक प्रवाशांनी गाडीमध्ये मिळणा-या सुविधा आणि खाद्यपदार्थ यावर व्हिडीओ काढून सोशल मिडियावर शेअरही केले. त्यातून वंदे भारत एक्सप्रेसची (Vande Bharat Express) मागणी वाढली. या तिनही मार्गावर आठवड्यातून पाच ते सहा वेळा ही गाडी धावते. आणि त्यातील सुविधांमुळे आणि वेगामुळे त्यांचे बुकींगही हाऊसफूलच चालू आहे. आता देशात लवकरच 75 वंदे भारत एक्सप्रेस चालू होणार आहेत. यातून विकासालाही चालना मिळणार आहे.
सई बने…