भाऊबीज झाली की अनेकांना वाटते की दिवाळी संपली. मात्र असे अजिबातच नसते. भाऊबीजेनंतर मध्ये मध्ये काही महत्वाचे सण दिवस साजरे केले जातात. कार्तिकी एकादशी झाली की लगेच येते ती वैकुंठ चतुर्दशी. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते. यंदा वैकुंठ चतुर्दशी १४ नोव्हेंबर रोजी साजरी केली जात आहे. या दिवशी विष्णू आणि महादेवाची पूजा केली जाते. या दिवसाचे देखील एक वेगळे महात्म्य आणि इतिहास आहे. नक्की वैकुंठ चतुर्दशीला काय करतात?, वैकुंठ चतुर्दशीचे महत्व काय असते? आदी सर्वच प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया.
कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ०९ वाजून ४३ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ०६ वाजून १९ मिनिटांनी संपेल. तर १४ नोव्हेंबर ला वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाणार आहे.
वैकुंठ चतुर्दशीचा दिवस हा हर हरेश्वर भेट म्हणून साजरा केला जातो. देवशयनी एकादशीच्या दिवसापासून सुरु होणाऱ्या चातुर्मासामध्ये सृष्टीचे पालनहार विष्णू शेषावर झोपी जातात. त्यानंतर त्यांचे पालनकर्त्याचे काम भगवान विष्णू यांच्या अनुपस्थितीमध्ये भगवान शंकर बघतात. या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात आणि स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात अशी मान्यता आहे. याच वैकुंठ चतुर्दशी या दिवशी ‘हरिहर भेट’ म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते. हीच भेट या दिवशी साजरी होते आणि हेच या वैकुंठ चतुर्दशीचे वैशिष्ट्य असते.
वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी चार महिने चालणाऱ्या चतुर्मासाची समाप्ती होते. या दिवशी रात्री शंकराची १००८ नावे घेऊन आणि श्री विष्णूची एक हजार नावे घेऊन विष्णूला बेल आणि शंकराला तुळस वाहून पूजा केली जाते. हाच एक दिवस असतो जेव्हा शंकराला तुळस आणि विष्णूला बेल वाहिला जातो. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी मंदिरांमध्ये आणि घरी देखील रात्री ही पूजा केली जाते.
वैकुंठ चतुर्दशीच्या दिवसाची अजून एक परंपरा आहे, जी बऱ्याच ठिकाणी पाळली जाते. ती म्हणजे, महाभारत काळात श्रीकृष्णाने युद्धात ज्यांचा मृत्यू झाला होता त्यांचे श्राद्ध वैकुंठ चतुदर्शीला केले होते. म्हणूनच या दिवशी तर्पण आणि श्राद्ध करणे अतिशय चांगले समजले जाते. सद्धगुणी, दिव्य पुरुष आणि सतकर्म करणार्यांना वैकुंठ प्राप्ती होते. तरी श्रद्धापूर्वक वैकुंठ चतुर्दशी केल्यास वैकुंठात स्थान मिळण्याची शक्यता वाढते.
वैकुंठ चतुर्दशी आख्यायिका १
पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान विष्णु यांनी काशी येथे महादेवाला एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता. यावेळी महादेवाने विष्णुची परिक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले. यावर भगवान विष्णु यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला. विष्णुची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णुला वर दिला की, कार्तिक मासनंतर येणारी चतुर्दशी ‘वैकुंठ चतुर्दशी’ म्हणून ओळखली जाईल. जो कोणी हे व्रत करील त्याला वैकुंठ प्राप्ती होईल.
या दिवशी भगवान विष्णुची पुजा केली जाते. विष्णुला चंदन, फुलं, दुध, दही या सर्वांनी अंघोळ घातली जाते आणि भगवान विष्णुचा अभिषेक केला जातो. या दिवशी विष्णु नामस्मरण केलं जातं. विष्णुला गोड नैवद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो. तसेच या दिवशी विष्णुंसह शिवाची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. पुराणानुसार या दिवशी शिवने प्रभू विष्णुंना सुदर्शन चक्र दिले होते. या दिवशी शिव-विष्णु एकाएक रुपात असतात.
वैकुंठ चतुर्दशी आख्यायिका २
वैकुंठ चतुर्दशीच्या पौराणिक कथेनुसार, एकदा नारदजी पृथ्वीभोवती फिरून वैकुंठ धामला पोहोचले. भगवान विष्णू त्याला आदराने बसवतात आणि प्रसन्न होतात आणि त्याच्या येण्याचे कारण विचारतात. नारदजी म्हणतात- हे भगवान! तुम्ही स्वतःला कृपानिधान नाव दिले आहे. जे तुमचे प्रिय भक्त आहेत तेच यातून जगू शकतात. सर्वसामान्य स्त्री-पुरुष वंचित राहतात. म्हणून मला असा काही सोपा मार्ग सांगा की, ज्याद्वारे सामान्य भक्तही तुझी उपासना करून मोक्ष मिळवू शकतील.
========
हे देखील वाचा : त्रिपुरारी पौर्णिमेला ‘या’ गोष्टी करणे ठरते लाभदायक
========
हे ऐकून भगवान विष्णू म्हणाले – हे नारद ! माझे ऐका, जे स्त्री-पुरुष कार्तिक शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीचे व्रत करतात आणि माझी भक्तिभावाने पूजा करतात, त्यांच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे अक्षरशः उघडतील. यानंतर विष्णूजी जय-विजय म्हणतात आणि त्यांना कार्तिक चतुर्दशीला स्वर्गाचे दरवाजे उघडे ठेवण्याचा आदेश देतात. भगवान विष्णू म्हणतात की, या दिवशी जो कोणी भक्त माझे थोडेसे नाम घेऊनही माझी पूजा करेल त्याला वैकुंठधाम प्राप्त होईल.
वैकुंठ चतुर्दशी आख्यायिका ३
दुसर्या एका कथेनुसार धनेश्वर नावाचा एक ब्राह्मण खूप वाईट कृत्ये करायचा आणि अनेक पापे करत असे. एके दिवशी ते गोदावरी नदीत स्नान करायला गेले, त्या दिवशी वैकुंठ चतुर्दशी होती. त्या दिवशी अनेक भाविक गोदावरी घाटावर प्रार्थना करण्यासाठी आले होते, त्या गर्दीत धनेश्वरही त्यांच्यासोबत होता.
अशा प्रकारे त्या भक्ताच्या स्पर्शाने धनेश्वरालाही पुण्य प्राप्त झाले. त्याचा मृत्यू झाल्यावर यमराजाने त्याला घेऊन नरकात पाठवले. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की तो खूप पापी आहे पण त्याने वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी गोदावरीत स्नान केले आणि भक्तांच्या सत्कर्मामुळे त्याची सर्व पापे नष्ट झाली आणि त्यामुळे त्याला वैकुंठधाम प्राप्त होईल. त्यामुळे धनेश्वराला वैकुंठधाम प्राप्त झाले.