चुका होणे ही खूपच सामान्य बाब आहे. एखाद्या विषयातील तज्ज्ञाची देखील तो निपुण असलेल्या विषयात चूक होऊ शकते. चुका ही मनुष्य असल्याचीच एक खूण समजली जाते. मात्र चूक झाली की, ती आपल्या लक्षात आल्यावर लगेच सुधरवता देखील आली पाहिजे. चूक झाली की क्वचितच असे घडते की ती आपल्याला सुधरवता येणे शक्य नसते. नाहीतर प्रत्येक चूक सुधरवण्यासाठी एक तरी मार्ग असतोच.
आता स्वयंपाकाचेच घ्या. असे म्हणतात की स्वयंपाक हे एक शास्त्र आहे, ही एक कला आहे. मात्र यातही अगदी मातब्बर, मुरलेल्या आणि अनेक वर्ष स्वयंपाक करत असलेल्या स्त्रियांकडूनही चूक होते. स्वयंपाकात किंवा किचनमध्ये होणाऱ्या चुका खूपच सामान्य बाब आहे. जेवण बनवतात त्यात कधी कधी चुकून, नजर चुकीने मीठ जास्त पडते. मात्र ते मीठ आपण जेवणातून काढू शकत नाही.
अशा वेळेस आपण संपूर्ण जेवण तर टाकून देऊ शकत नाही. आणि फक्त मीठ जास्त पडल्यामुळे ताजे आणि उत्तम चवीचे अन्न तसेच पडून राहते. मग अशावेळेस काय करावे हे अनेकदा लक्षात येत नाही. मीठ जरी जेवणात जास्त झाले असले तरी आपल्या जेवणाची चव टिकून जास्त मीठ असलेले जेवण सोप्या पद्धतीने पुन्हा ठीक केले जाऊ शकते. आनंद झाला ना वाचून…? मात्र कसे? चला तर जाणून घेऊया जेवणात मीठ जास्त पडल्यास काय करावे?
१) भाज्या आणि डाळी इत्यादींमध्ये मीठ जास्त असल्यास आपण त्यात लिंबाचा रस घालू शकता. यामुळे मीठ कमी होण्यास मदत होईल.
२) जेवणात मीठ जास्त असल्यास त्यात कणिकेच्या पिठाचे गोळे घालू शकता. हे गोळे १० ते १५ मिनिटे पदार्थात शिजू द्या. त्यानंतर भाजीमधून काढून टाका. यामुळे मीठ कमी होण्यास मदत होईल.
३) तर्री असलेल्या भाजीमध्ये मीठ जास्त झाले, तर त्यात उकडलेले बटाटे घालून भाजी किंवा आमटी चांगली एकजीव करून म्ह जेवण वाढू शकता.
४) जेवणात मीठाचे प्रमाण जास्त असेल तर त्यात २ ते ३ चमचे तूप घाला. तुपामुळे पदार्थातील मीठाचे प्रमाण संतुलित राहते.
५) कोणताही पदार्थ खारट झाल्यास तुम्ही त्या मिठाचे प्रमाण कमी करण्यासाठी दही वापरू शकता. त्यात २ ते ३ चमचे दही घाला. त्यामुळे मिठाचे अतिरिक्त प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत होईल.
६) रस्सा भाजीमध्ये मीठाचे प्रमाण जास्त झाल्यास त्यामध्ये ब्रेडचे तुकडे मिसळल्याने फायदा होतो. ब्रेड भाजी अतिरिक्त गोड शोषून घेते. त्यामुळे खारटपणा कमी होण्यास मदत होईल.
===========
हे देखील वाचा : मातीच्या भांड्यात अन्न शिजवण्याचे ‘हे’ आहेत फायदे
===========
७) काजूची पेस्टही पदार्थामधील खारटपणा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे भाजीला वेगळी चव मिळण्याबरोबरच मिठाचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल.
८) भाजीमध्ये मीठ जास्त असेल तर तुम्ही भाजलेले बेसनही वापरू शकता. यासाठी बेसन तळून त्यात भाज्या किंवा डाळी मिसळा. त्यामुळे भाजीत मीठ कमी होईल. ही पद्धत तुम्ही ग्रेव्ही आणि कोरड्या भाज्या दोन्हीसाठी वापरू शकता.
९) पातळ रस्सा भाजी करणार असाल अथवा डाळ असेल तर त्यातील मीठाचे प्रमाण संतुलित करण्याचा आणखी एक सोपा उपाय म्हणजे त्यात कोमट पाणी टाकणे. असे केल्याने भाजी अथवा डाळीचं प्रमाण वाढेल पण खारटपणा नक्कीच कमी होईल.