अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये कमालीचा तणाव वाढला आहे. अमेरिका कठोर आर्थिक निर्बंधांद्वारे, तेल व्यापार रोखून आणि मध्य पूर्वेतील लष्करी ताकद वाढवून इराणवर दबाव आणत आहे. ट्रम्प प्रशासनाने इराणच्या तेल, पेट्रोकेमिकल आणि शिपिंग उद्योगांना लक्ष्य केले आहे. इराणला अणुशस्त्रे विकसित करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिका आणि इस्रायली सैन्याने संयुक्तपणे इराणी अणुस्थळांवर हल्ला केला आहे. यासोबत अमेरिकेने मध्य पूर्वेत अतिरिक्त बॉम्बर आणि युद्धनौका तैनात केल्या आहेत. त्यामुळे युद्धाचा धोका वाढला आहे. अमेरिका अशा मार्गाने इराणवर दबाव टाकत असतानाच इराणने थेट अमेरिकेचे नाकच दाबले आहे. कारण इराण सरकारने होर्मुझची समुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला काही दिवसांसाठी ही समुद्रधुनी बंद असेल, असे इराणने जाहीर केल्यावर जगभर खळबळ उडाली आहे. होर्मुझची समुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल मार्गांपैकी एक आहे. जागतिक तेल पुरवठ्यापैकी सुमारे २०% तेल पुरवठा यातून केला जातो. त्यामुळेच इराणने ही समुद्रधुनी किमान आठवडाभर बंद ठेवली तरी जागतिक तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ( Strait of Hormuz )

अमेरिका-इराणमधील परिस्थिती अधिक युद्धजन्य होत चालली आहे. अमेरिका इराणवर दबाव टाकण्यासाठी युद्धनौका पाठवत असताना इराणने उचललेल्या पावलाने जगभर खळबळ उडवली आहे. इराण सरकारने होर्मुझची समुद्रधुनी काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येथे युद्धसराव सुरू असून सुरक्षिततेच्या कारणामुळे ही समुद्रधुनी बंद करत असल्याचे इराण सरकारने स्पष्ट केले आहे. होर्मुझची समुद्रधुनी ही एक अरुंद पण जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतुकीच्या सागरी मार्गांपैकी एक आहे. पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातादरम्यान ही समुद्रधुनी आहे. ही समुद्रधुनी इराणला ओमानपासून वेगळे करते आणि सौदी अरेबिया, इराक आणि युएईसारख्या देशांमधून येणारे बहुतेक कच्चे तेल यातून पाठवले जाते. उपलब्ध माहितीनुसार याच भागात सुरक्षा आणि सागरी चिंतेमुळे अनेक तासांसाठी लाईव्ह-फायर सराव करण्यात आले आहेत. हा युद्धसरावाचा प्रकार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अमेरिकेच्या दबावापुढे इराण सरकार कधीही माघार घेणार नाही, हा संदेशही देण्यात आला आहे.
मात्र होर्मुझची समुद्रधुनी बंद केल्यामुळे जगभरातील तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सौदी अरेबिया, कुवेत, इराक, कतार, बहरीन, युएई आणि इराणमधील तेल व वायू टँकर या मार्गावरून जातात. या मार्गाची रुंदी सुमारे ३३ किलोमीटर आहे. यातून होणारा तेलाचा पुरवठा बहुतेक आशियाई बाजारपेठांसाठी केला जातो. आता याच मार्गावर युद्धसराव सुरू असल्याने इराणने अमेरिकेवर एकप्रकारे मात केल्याची चर्चा आहे. या सरावात क्षेपणास्त्र आणि पृष्ठभागावरून गोळीबार करण्यात आला. एका सरकारी एजन्सीने दावा केला आहे की किनाऱ्यावरून डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे त्यांच्या लक्ष्यांवर आदळली. या सर्व घडामोडींमध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अमेरिकन विमानवाहू जहाज यूएसएस अब्राहम लिंकन आधीच अरबी समुद्रात तैनात आहे. अमेरिकेने मध्य पूर्वेत यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड तैनात करण्याची घोषणाही केली आहे. अशा परिस्थितीत इराणने युद्धसराव सुरू केल्यामुळे जिनेव्हा येथे सुरू असलेल्या दोन्ही देशांतील चर्चेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ( Strait of Hormuz )
हा युद्धसराव सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे की कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तरात्मक हल्ला केला जाईल. अमेरिकेच्या जहाजांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्याच समुद्रात बुडवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता यावर अमेरिका काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. होर्मुझ समुद्रधुनीवर इराणचे वर्चस्व आहे. या महत्त्वाच्या तेल मार्गाला लक्ष्य करून इराण जगाला कसे गुडघे टेकवू शकतो, याची चर्चा सुरू आहे. कारण हा महत्त्वाचा सागरी मार्ग बंद राहिला तर त्याचा परिणाम फक्त पश्चिम आशियापुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण जगावर होणार आहे.
=======
हे देखील वाचा : Kim Yo Jong : सत्तेसाठी क्रूर हुकूमशहाविरुद्ध उभी राहिली बहिण
=======
सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवेत, कतार आणि युएईसारखे प्रमुख तेल उत्पादक देश त्यांचे बहुतेक तेल आणि वायू याच मार्गाने निर्यात करतात. याव्यतिरिक्त, होर्मुझच्या समुद्रधुनीभोवती अनेक महत्त्वाची बंदरे आहेत. इराणचे अब्बास बंदर हे एक प्रमुख नौदल आणि व्यावसायिक बंदर आहे. युएईचे फुजैरा बंदर हे तेल साठवणूक आणि शिपिंगचे प्रमुख केंद्र मानले जाते. ओमानचे सोहर बंदर आणि कतारचे रास लाफान बंदर हे एलएनजी निर्यातीसाठी महत्त्वाचे मानले जाते. हे सर्व या सागरी मार्गावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे अवलंबून आहेत. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची भीती अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. फार काय, अमेरिकेची अर्थव्यवस्थाही कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता अमेरिका याबाबत काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ( Strait of Hormuz )
सई बने
