मेक्सिकन इतिहासातील सर्वात क्रूर ड्रग माफियांपैकी एक असलेला एल मेंचो चकमकीत ठार झाला. यामागे मेक्सिकोसह अमेरिकेचे मोठे योगदान असल्याचे मानले जाते. अमेरिकेने एल मेंचोवर १३६ कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले होते. यावरून अमेरिका त्याच्यामुळे किती त्रस्त झाली होती, याचा अंदाज येतो. एल मेंचोने अमेरिकेत मोठ्या प्रमाणात ड्रग तस्करीचे जाळे विणले होते. त्यातही फेंटानिलसारखे घातक ड्रग त्याच्या माध्यमातून अमेरिकेत पाठवले जात होते. या फेंटानिलमुळे अमेरिकेतील तरुण पिढी मोठ्या प्रमाणात पोखरली गेली आहे. दररोज १०० हून अधिक मृत्यू फेंटानिलच्या अतिसेवनामुळे होत असल्याचे सांगितले जाते. अमेरिकेने अनेक वेळा एल मेंचोचा माग काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याच्यापर्यंत पोहोचलेल्या मारेकऱ्यांना त्याने पुलावर लटकवून अत्यंत क्रूरपणे ठार केले होते. त्यामुळे त्याला घेरण्यासाठी जवळपास वर्षभर पाळत ठेवण्यात आली आणि अखेर त्याला ठार करण्यात आले. फक्त एल मेंचोच नव्हे, तर त्याच्या कार्टेलमधील अन्य प्रमुख साथीदारांनाही मारण्यात यश आले. या कारवाईनंतर मेक्सिकोच्या अनेक भागांत हिंसाचार आणि अशांततेच्या घटना घडल्या. मात्र न्यू जनरेशन कार्टेलवर एल मेंचोच्या मृत्युमुळे काही प्रमाणात पायबंद बसेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः अमेरिकेसह युरोपात त्याने उभारलेल्या फेंटानिल जाळ्यावर निर्बंध येतील आणि त्यातून लाखो तरुणांचे जीव वाचतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. ( US Fentanyl Crisis )

एल मेंचोच्या मृत्यूनंतर अमेरिकेने त्याच्याभोवती कसे जाळे विणले होते, याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच फेंटानिलच्या अतिवापरामुळे अमेरिकेची तरुण पिढी कशी उद्ध्वस्त झाली आहे, हेही समोर आले आहे. फेंटानिल हे एक अत्यंत शक्तिशाली कृत्रिम ओपिओइड आहे. फार्मास्युटिकल फेंटानिलला यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने भूल देणारे आणि वेदनाशामक म्हणून मान्यता दिली आहे. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला कर्करोग आणि इतर गंभीर वेदनादायक आजारांसाठी फेंटानिलचा वापर सुरू झाला. मात्र फेंटानिल हे हेरॉइनपेक्षा सुमारे ५० पट आणि मॉर्फिनपेक्षा १०० पट अधिक शक्तिशाली आहे. बहुतांश फेंटानिल-संबंधित ओव्हरडोज प्रिस्क्रिप्शन फेंटानिलमुळे नव्हे, तर बेकायदेशीरपणे उत्पादित फेंटानिलच्या वितरणामुळे होत आहेत. एल मेंचो हा या बेकायदेशीर फेंटानिल उत्पादनात अग्रेसर होता. चीनमधील काही गटांबरोबर त्याचे संबंध असल्याचा अमेरिकन सुरक्षा यंत्रणांना संशय होता. एल मेंचो बेकायदेशीर फेंटानिल अमेरिकेत पोहोचवत असे. गेल्या दहा वर्षांत अमेरिकेत ड्रग सेवनाचे प्रमाण आणि मृत्यूचे प्रमाण वाढण्यामागे याचा मोठा वाटा आहे.
अवैध फेंटानिल हे अनेकदा हेरॉइन, कोकेन आणि मेथाम्फेटामाइनसारख्या इतर ड्रग्समध्ये मिसळले जाते. अशा मिश्रणामुळे ओव्हरडोजचा धोका वाढतो. दररोज सुमारे १५० हून अधिक लोक फेंटानिलच्या अतिसेवनामुळे मृत्यूमुखी पडत असल्याचे अहवाल सांगतात. २०१७ पासून फेंटानिल तस्करीशी संबंधित गुन्ह्यांमध्ये ९५ टक्के वाढ झाली, आणि या वाढीत एल मेंचोचा मोठा सहभाग होता. २०२२ मध्ये अनावधानाने फेंटानिलच्या अतिसेवनामुळे ७०,८१३ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. २०२५ च्या अहवालानुसार या मृत्यूदरात आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे अमेरिकेत फेंटानिलविरोधात कठोर कारवाईची मागणी वाढू लागली आहे. अमेरिकेत उपलब्ध असलेले काही बेकायदेशीर फेंटानिल ‘चायना व्हाइट’ या नावाने ओळखले जाते. २०१३ च्या सुमारास चीनमधून मोठ्या प्रमाणात फेंटानिल आणि त्याची रसायने अमेरिकेत येत होती. मात्र २०१९ च्या सुमारास या रसायनांचा पुरवठा मेक्सिकोला वळवण्यात आला. ( US Fentanyl Crisis )
=======
हे देखील वाचा : American Soldiers: अमेरिकन सैनिकांचे मानसिक खच्चीकरण…
=======
त्याच काळात एल मेंचोच्या कार्टेलद्वारे चीनमधील रसायनांचा वापर करून फेंटानिलचे उत्पादन सुरू झाले. हे बेकायदेशीर फेंटानिल मेक्सिकोमार्गे अमेरिकेत पोहोचू लागले. २०२१–२२ च्या सुमारास अमेरिकेत फेंटानिलचे सेवन आणि मृत्यूदर लक्षणीय वाढले. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी फेंटानिलविरोधात कारवाईचे संकेत दिले. त्यांनी चीनविरोधात टॅरिफ धोरणाचा इशारा दिला आणि अमेरिका–मेक्सिको सीमासुरक्षा कडक करण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र या सर्व प्रक्रियेत एल मेंचोचे जाळे अत्यंत मजबूत होते. त्यामुळे त्याला ठार केल्याशिवाय फेंटानिलचे चक्र तोडता येणार नाही, याची जाणीव अमेरिकेला होती. त्याच्याविषयीची सविस्तर माहिती गोळा करण्यात आली. मेक्सिकोच्या सुरक्षा यंत्रणांना एल मेंचोचे ठिकाण शोधण्यात अमेरिकन यंत्रणांनी मदत केली. त्याला ठार मारण्यापर्यंत अमेरिकन सुरक्षा यंत्रणा या मोहिमेवर लक्ष ठेवून होती. आता एल मेंचोनंतर अमेरिका चीनविरोधात काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ( US Fentanyl Crisis )
– सई बने
