अवघ्या जगानं बर्फाची चादर अंगावर ओढून घेतल्यासारखे वातावरण आहे. भारतातील हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, शिमला, मसूरी या भागात यावर्षीची विक्रमी बर्फवृष्टी होत आहे. तिकडे रशियातील मॉस्को आणि अमेरिकेच्या न्यू यॉर्कमध्येही अशीच परिस्थिती आहे. नव्या वर्षाची सुरुवातच या बर्फवृष्टीनं झाली असून आता आलेल्या कडक हिवाळ्यामुळे सामान्य नागरिकांचे जीवन कठीण झाले आहे. काश्मिर आणि हिमाचलप्रदेशमध्ये जोरदार होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे हजारो पर्यटक अडकले आहेत. तर अमेरिकेच्या शहरांमध्ये शतकातील सर्वात प्राणघातक हिवाळा तेथील जनता अनुभवत आहे. तापमान -३१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्यानं जनजीवन विस्कळीत झाले आहे. ( Climate Change )

फारकाय अफगाणिस्तानसारख्या देशालाही निसर्गाच्या प्रकोपानं व्यापून टाकलं आहे. येथे गेल्या तीन दिवसात विक्रमी हिमवर्षाव झाला. सोबतच पाऊसही आल्यानं अनेक गावं उद्ध्वस्त झाली आहेत. जगभरात होत असलेल्या या बर्फवृष्टीमागे नेमके कारण काय, याचा शोध आता सुरु झाला आहे. हवामानतज्ञांच्या मते, बदलत असणारे हे ऋतू आणि हिमवादळांचे वाढलेले प्रमाण यामागे जागतिक तापमानवाढ हे कारण आहे. एवढंच नाही, पुढच्या काही वर्षात यातही वाढ होण्याचा धोका हवामान तज्ञांनी वर्तवला आहे.
म्हणूनच ज्या भागात पाऊसही पडत नाही, तिथे मोठी वादळे येऊ शकतात, तर ज्या भागात कधी बर्फ पडला नाही, अशा प्रदेशावर बर्फाची चादर पसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या बदलामुळे फक्त हवामानावरच नाही, तर पर्यावरणावरही मोठा परिणाम होणर आहे. २०२६ हे वर्ष पर्यावरणातील बदलाचे वर्ष ठरणार आहे. कारण या वर्षाची सुरुवातच वादळ, भूकंप आणि तुफानी हिमवर्षावानं झाली आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होत आहे. ( Climate Change )
याबाबत हवामान तज्ञांनी केलेल्या अभ्यासातून जागतिक तापमानवाढीचा हा परिणाम असून हिवाळा अधिक धोकादायक होत असल्याची हीमपूर्वसूचना असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. सध्या भारतातील उत्तर भागात कडाक्याची थंडी आहे, सोबतच काश्मिर आणि हामाचलप्रदेशमध्ये रस्तेच बर्फवृष्टीनं बंद झाले आहेत. आपल्या शेजारी असलेल्या रशियात तर यापेक्षा भयानक परिस्थिती आहे. येथे काही इमारतींच्या दुस-या मजल्यापर्यंत बर्फ साठला आहे. रशियामधील मोठा प्रदेश विक्रमी हिमवर्षावाने वेढला गेला आहे. अशीच परिस्थिती अमेरिकेतही असून येथील अनेक शहरे बर्फाच्या आवरणाखाली झाकली गेली आहेत.
=======
हे देखील वाचा : Panda Diplomacy : पांडा मागचे राजकारण
=======
निसर्गाचे बदलणारे हे चित्र जागतिक तापमानवाढीमुळे होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. आर्क्टिक प्रदेशातील समुद्रातील बर्फ वेगाने वितळत आहे. सूर्यप्रकाश अंतराळात परत परावर्तित होण्याऐवजी मध्येच रहात असल्यामुळे पृथ्वीवरील वातावरण उबदार होत आहे. या तापमानवाढीमुळे आर्क्टिक आणि खालच्या अक्षांशांमधील तापमानातील फरक कमी होत आहे. याचा परिणाम म्हणून थंड आर्क्टिक हवा सहजपणे दक्षिणेकडे पसरू लागली आहे. त्यामुळेच अमेरिका, युरोप आणि आशियामध्ये तीव्र थंडी आणि हिमवादळे येत असल्याचे हवामान तज्ञांनी सांगितले आहे. ( Climate Change )
सोबतच जेट स्ट्रीम हा उत्तर गोलार्धातील हवामान नियंत्रित करणारा हवेचा एक मजबूत प्रवाह आहे. जेव्हा जेट स्ट्रीम लक्षणीय वळण घेतो, तेव्हा अत्यंत थंड हवा दूरवर प्रवास करते. या हवेमुळेच दीर्घकाळ थंडी आणि जोरदार हिमवर्षाव होतो. अमेरिका आणि रशियामध्ये सध्या जी बर्फाची वादळे होत आहे, त्यामागे हेच बदल प्रामुख्यानं आहेत. भारतामध्येही अशाच स्वरुपाचे हवामान बदल होत आहेत. समुद्राचे तापमान वाढत असल्यामुळे बदलत्या वाऱ्याच्या पद्धतीनं वादळ होण्याचा प्रमाण वाढले आहेत. आता हिमालयीन प्रदेशात जो बर्फवर्षाव होत आहे, त्यामागे हे प्रमुख कारण असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
हिमालयात सर्वाधिक हिमवर्षाव होत आहे. हा नवीन बर्फ पडताच, हवा वेगाने थंड हेत असून थंड वारे उत्तर भारतातील मैदानी भागात पोहचत आहेत. त्यामुळे संपूर्ण उत्तर भारतामध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे. तापमानवाढीचा सर्वात मोठा धोका सुपरपॉवर अमेरिकेला बसला आहे. एका विनाशक हिमवादळानं अमेरिकेतील अनेक शहरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. शहरांमध्ये २० इंचांपर्यंत झालेल्या हिमवादळामुळे तापमान उणे ३१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. ( Climate Change )

त्यातही ईशान्य अमेरिकेत मुसळधार हिमवादळ, गोठवणारी थंडी आणि पावसाने अनेक राज्यांमध्ये कहर केला आहे. आतापर्यंत किमान २५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. न्यू यॉर्क शहरात सेंट्रल पार्कमध्ये ११ इंच बर्फवृष्टी झाली आहे. तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये ७,५०,००० हून अधिक घरांमध्ये वीज खंडित झाली आहे. अमेरिकेसारखीच परिस्थिती अफगाणिस्तानमध्ये आहे. सतत तीन दिवस झालेल्या मुसळधार हिमवर्षाव आणि पावसाने अफगाणिस्तानात कहर केला आहे. यात ६१ लोकांचा मृत्यू झाला असून १५ प्रांतांमध्ये ४५८ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. शेकडो प्राणी देखील मृत्युमुखी पडले आहेत.
रशियामध्येही अशीच परिस्थिती असून येथे अनेक घरे बर्फाखाली दाबली गेली आहेत. आता या सर्व भागातील बर्फ वितळल्यावर येणा-या समस्यांचा सामना कसा करायचा हा प्रश्न प्रशासनासमोर आहे. या सर्वाबाबत हवामान तज्ञ अधिक संशोधन करीत असून पुढीव वर्षांमध्ये अशीच परिस्थिती वारंवार होण्याचा धोका त्यांनी वर्तवला आहे. ( Climate Change )
सई बने
