पहिली दुखापत तुम्हीच करा आणि अशी जोरदार इजा करा की प्रतिस्पर्ध्याला उठताही येणार नाही, ज्युडो मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी ब्लॅक बेल्ट मिळवलेल्या युवकाचे हे मत ऐकून तेव्हा त्याचे शिक्षकही चक्रावले होते. पण हा युवक काही वेगळाच होता. ब्लॅक बेल्ट मिळवण्याआधीच त्यानं जगातल्या सर्वात खतरनाक अशा गुप्तहेर संघटनेत प्रवेश मिळवलेला तरुण 70 वर्षाचा झाला आहे. हा तरुण दुसरा तिसरा कोणीही नसून टाइम मासिकाने चार वेळा जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून घोषित केलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आहेत. व्लादिमिर पुतीन (Vladimir Putin)70 वर्षांचे झाले आहेत. केबीजीचा साधा गुप्तहेर देशाचा राष्ट्राध्यक्ष कधी आणि कसा झाला, याबाबत अनेक सुरस कथा रशियामध्ये चर्चिल्या जातात.अर्थातच त्याही गुप्तपणे, कारण पुतीन यांचा दराराच असा आहे की त्यांच्या विरोधात बोलणारे कधी आणि कसे गायब होतात, हे कोणालाही कळत नाही. विरोधकच कशाला गेल्या काही महिन्यात पुतीन यांच्या खास व्यक्तींचाही गुढ मृत्यू झाला आहे. युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानं पुतिन यांच्यावर जगभरातून टिका झाली. पण पुतिन यांच्यावर या सर्वांचा काहीही परिणाम झाला नाही. उलट रशियाची अर्थव्यवस्था अधिक सक्षम केल्याचा दावा त्यांनी केला आहे. वयाच्या सत्तरीत प्रवेश केलेले पुतिन हे असेच आहेत, जेवढी वादळं त्यांच्यावर येतात, तेवढ्याच प्रखरपणे ते त्यांच्यावर प्रहार करतात. या वादळी नेत्याचे आयुष्यच वादळी ठरलेले आहे.
2012 पासून रशियाच्या अध्यक्षपदी असलेल्या पुतिन(Vladimir Putin) यांना सध्यातरी रशियामध्ये आव्हान देणारं नेतृत्व नाही.7 ऑक्टोबर 1952 रोजी पुतीन यांचा जन्म लेनिनग्राड नावाच्या शहरात झाला.आता या शहराचे नाव सेंट पीटर्सबर्ग आहे. पुतिन यांचे वडील दुस-या महायुद्धात देशाकडून पाणबुडी दलात होते. त्यांना दोन भाऊही होते. पण लहानपणीच त्यांचे निधन झाले. पुतिन यांचा जन्म झालेल्या लेनिनग्राड या शहरातील वातावरणाचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम झाला. आपल्याला शत्रूपेक्षा वरचढ व्हायचे असेल तर अंगात शक्ती हवी, आणि प्रतिकार करण्यासाठी योग्य प्रशिक्षणही हवे, या मताचे ते होते. त्यामुळे ज्युडो खेळाकडे पुतिन वळले आणि त्यात ब्लॅक बेल्ट मिळवला. नंतर सेंट पीटर्सबर्ग राज्य विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. त्यादरम्यानच पुतिन केबीजी या गुप्तहेर संघटनेकडे आकर्षित झाले होते. कायद्याची पदवी घेतल्यावर ते पूर्णवेळ केबीजीसाठी काम करु लागले.पुतिन यांनी 16 वर्षे केबीजीसाठी एजंट म्हणून काम केले. त्यातील 6 वर्षे ही पूर्व जर्मनी येथील होती, हे विशेष. त्याचदरम्यान सोव्हिएत युनियन शेवटच्या घटका मोजत होते, अशावेळी पुतिन यांना मॉस्कोला परत बोलवण्यात आले आणि या केबीजीच्या साध्या एजंटचा राजकीय प्रवास सुरु झाला.केबीजीमध्ये लेफ्टनंट कर्नल पदावर बढती झालेले पुतिन 1991 मध्ये निवृत्त झाले.केबीजीमुळे त्यांना अंतर्गत राजकारणाची पूर्ण माहिती झाली होती.

महत्त्वकांक्षी असलेल्या पुतिन (Vladimir Putin) यांनी सेंट पीटर्सबर्ग या त्यांच्या मूळ शहरातून राजकारणात प्रवेश केला. 1996 मध्ये ते मॉस्कोमध्ये अध्यक्ष बोरिस येल्तसिन यांच्या प्रशासनात सामील झाले. काही दिवसातच ते तिथेही बोरिस येल्तसिन यांच्या विश्वासू टीमचे सदस्य झाले. तेव्हाच येल्तसिन यांनी अनपेक्षितरित्या राजनामा दिला किंवा त्यांना द्यावा लागला. 31 डिसेंबर 1999 रोजी पुतिन रशियाचे कार्यवाहक अध्यक्ष बनले.पुतिन यांचा हा विजयी रथ मग रोखण्याची ताकद कुठल्याही नेत्यामध्ये नव्हती.पुतिन यांनी 2000 आणि 2004 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. रशियन राज्यघटनेनुसार पुतिन 2008 मध्ये सलग तिसर्यावेळी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहण्यास ते अपात्र ठरले. 2008 मध्ये दिमित्री मेदवेदेव यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली आणि पुतीन यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त केले. पण पुतिन यांनी कायद्यात बदल करुन 2012 मध्ये पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली. या त्यांच्या घोषणेनंतर रशियात मोठ्या प्रमाणात विरोध झाला. पण हे विरोधक नंतर गायब झाले आणि पुतिन यांनी ही निवडणूक जिंकली. आता पुतिन (Vladimir Putin)हे या अध्यक्षपदावर कायम झाले आहेत. मध्यंतरी त्यांना पक्षघाताचा त्रास जाणवत असून ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, अशा बातम्या आल्या. पण पुतिन यांनी या सर्वांवर खुलासा कधीच दिला नाही. उलट त्यानंतर काही दिवसात त्यांनी युक्रेनवर हल्ला चढवत आपल्या आजारपणाच्या बातम्या पसरवणा-यांना वेगळ्या भाषेत उत्तर दिले. पुतिन यांच्या आयुष्यातला हाच गुढपणा त्यांच्या विरोधकांच्या मनात धडकी भरवतो.
पुतिन यांनी 1983 मध्ये ल्युडमिला यांच्याबरोबर विवाह केला. 2014 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. त्यांना मारिया आणि येकातेरिना या दोन मुली आहेत. सध्या पुतिन यांचे नाव ऑलिम्पिंक जिमनॅस्ट अलीना काबेवा यांच्याबरोबर जोडले गेले आहे. पुतिन आणि अलीना यांना जुळी मुलं असल्याचीही माहिती आहे. पण याबाबत उघड बोलण्यात येत नाही. कारण पुतीन यांचे कुटुंब प्रसिद्धीपासून कायम दूर राहिले आहे.ऐवढ्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात पुतिन यांचे नाव अनेक घोटाळ्यांमध्येही जोडले गेले. पण ते तेवढ्यापुरतेच राहिले. सेंट पीटर्सबर्गमध्ये अन्न घोटाळ्यात त्यांचे नाव होते. पण या घोटाळ्यासंदर्भातले कागदपत्र नंतर गहाळ झाली आणि त्याची चौकशीही गुंडाळण्यात आली.पुतिन(Vladimir Putin) यांच्या व्यक्तिमत्वावर सोव्हिएत युनियनची छाप आहे.सत्तेचे केद्रिंकरण आवश्यक असल्याचे त्यांचे मत आहे. अर्थात त्यामुळेच रशियाची सर्व सत्ता त्यांनी त्यांच्या हातात ठेवली आहे. आणि त्यांचा डोळा आता शेजारच्या स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांवर आहे. यासाठी त्यांनी रशियाची लष्करी ताकद प्रचंड वाढवली आहे, प्रसंगी अमेरिकेसारख्या राष्ट्रालाही धमकी देण्यास ते मागेपुढे पहात नाहीत. सध्या व्लादिमीर पुतिन यांनी नाटो आणि अमेरिका यांच्यासह इतर देशांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करुन फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनवर हल्ला केला. काही दिवसातच हे युद्ध संपेल अशी अपेक्षा होती. मात्र युक्रेनही त्याला चांगलाच पलटवार दिल्यामुळे रशियाला युद्ध महागात पडल्याची चर्चा होती. पण पुतिन हे कसलेले सरदार आहेत. या युद्धकाळात युरोपिय देशांच्या नाड्या गॅस पुरवढ्यावरुन आढळल्या. पुतिन यांच्या एका इशा-यानं खळबळ उडाली होती. आता हेच पुतिन युक्रेनच्या पूर्ण पाडावासाठी शांतपणे थंडीच्या मोसमाची वाट पहात आहेत. त्याकाळात पुतिन कशाप्रकारे आपले डावपेच आखणार आहेत, याची काळजी सर्व जगाला पडली आहे.
===========
हे देखील वाचा : टीपू सुल्तान कोण होते? महान योद्धे की हिंदू विरोधी?
==========
हा सत्तर वर्षाचा नेता भविष्यात राजा होणार अशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी अनेक वर्षापूर्वी करुन ठेवली होती म्हणे…या भविष्यवाणीबाबत माहिती नाही, पण व्लादिमीर पुतिन एका राजासारखेच आहेत. त्यांच्या व्यक्तीमत्त्वाभोवती अनेक वर्तुळं आहेत.त्यामुळे खरे पुतिन कसे आहेत, त्यांच्या मनात काय आहे, याची माहिती अद्याप कोणालाच नाही. आणि हाच त्यांच्याबाबतचा सर्वात मोठा प्लसपॉईंट आहे.
सई बने…