Home » पूजा सावंत (Pooja Sawant): त्या एका संधीने घडवलं आयुष्य!

पूजा सावंत (Pooja Sawant): त्या एका संधीने घडवलं आयुष्य!

by Correspondent
0 comment
Share

संधी एकदाच दार  ठोठावते असं म्हटलं जातं आणि ते खरंही आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये त्याला यशाची कवाडे  खुली करणारी संधी कधी आणि कुठे चालून येईल, हे काही सांगता येत नाही. मात्र त्या संधीचं सोनं कसं करायचं, हे मात्र त्याच्या हातात असते. अशा संधीच्या शोधात प्रत्येकजण असतो. 

अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) हिच्या आयुष्यात देखील एक अशीच संधी आली. खरंतर त्या संधीला तिला नकार द्यायचा होता, पण माणसाच्या नशिबात असते ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही या उक्तीचा प्रत्यय पूजाला आला आणि त्या एका संधीने पूजाचे आयुष्य बदलून टाकलं. 

“‘बेस्ट डान्सर’ या शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीवर मला त्याच संधीने स्थान दिलं आहे”, असं सांगताना पूजाने तिच्या आयुष्यातील ‘ती’ संधी कोणती होती, याबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. 

Pooja Sawant

मराठी सिनेमा, मालिका, वेगवेगळ्या शोजमधील एक आकर्षक चेहरा आणि कमालीचे टॅलेंट अशी ओळख असलेल्या पूजा सावंतने बेस्ट डान्सर मधील नव्या दमाच्या डान्सर्सचे परीक्षण केले आहे. या शोची टॅगलाईन होती ‘संधी दवडू नका’! या निमित्ताने पूजाने तिच्या आयुष्यातील पहिली संधी आणि त्या संधीच्या निमित्ताने तिला एक नृत्यांगना म्हणून मिळालेली ओळख  तिच्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे, याबद्दल सांगितलं.

पूजाच्या शब्दात सांगायचं झालं तर, तिला त्या दिवशी ऑडिशनला जायचंच नव्हतं. तिला तिचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. आधी हातामध्ये पदवी घ्यायची होती आणि मगच एक प्रोफेशनल डान्सर म्हणून या क्षेत्रामध्ये यायचं होतं. परंतु तिच्या आईला मात्र तिने डान्सर म्हणून करिअर करावं, असं मनापासून वाटत होतं. 

कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना एक डान्स ऑडीशनची जाहिरात आईच्या वाचनात आली. आईच्या आग्रहाखातर तिने त्या ऑडिशनला जाण्याचा निर्णय घेतला. पूजा ऑडिशनला पोचली तेव्हा तिथे प्रचंड गर्दी होती. खूप वेळाने जेव्हा तिथे पूजा सावंत (Pooja Sawant) हे नाव पुकारलं गेलं. त्यानंतर पूजा तिचा डान्स परफॉर्म करण्यासाठी स्टेजवर गेली. तिने काही स्टेप  केल्या असतील, तोपर्यंत लाईट गेल्यामुळे म्युझिक बंद झालं. 

Pooja Sawant

तिच्यासमोर बसलेल्या परीक्षकांनी तिला विचारलं की, “लाईट नसल्यामुळे म्युझिक लागणार नाही, मग तू काय करणार? तुझा डान्स परफॉर्मन्स थोड्यावेळाने देणार का?” खरंतर ऑडीशनला जायचं हे पूजाच्या मनातच नव्हतं. त्यामुळे ती परीक्षकांना, “मी नंतर ऑडिशन देईन किंवा देणारच नाही”, असं उत्तर देईल ही शंका तिच्या आईच्या मनात आली. पण पूजाने क्षणभर विचार केला आणि तिने म्युझिक शिवाय डान्स ऑडीशन दिली. 

पूजा सांगते, “मी असं का म्हटलं याचं कारण मला आजही कळत नाहीये.  मी त्या परीक्षकांना असं म्हणू शकले असते की, मी थोड्या वेळाने ही ऑडिशन देते. परंतु, ती माझ्या आयुष्यातील पहिली ऑडिशन होती. त्या क्षणी मला असं वाटलं होतं की, ही सुरुवात आहे आणि ही सुरुवात मला पुन्हा मिळणार नाही.  ही एनर्जी कदाचित मी पुन्हा दाखवू शकणार नाही. त्यामुळे नकळत मी परीक्षकांना सांगितलं की, “काही हरकत नाही. या गाण्यावर मी जो डान्स करणार आहे ते गाणं माझ्या मनात आहे. ते गाणं गुणगुणत मी डान्स करते.” 

परिक्षकांनी संमती दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आयुष्यातील पहिली ऑडिशन मी विदाऊट म्युझिक सादर केली. माझी निवड झाली. पुढे मला डान्स करण्याची संधी मिळाली. आज मी अभिनेत्री म्हणून जरी नावारूपाला आले असले, तरी माझ्या आयुष्यातील पहिली ऑडिशन ‘विनाम्युझिक’ डान्स अशी दिली असल्यामुळे माझे डान्सवर विशेष प्रेम आहे. 

Pooja Sawant

मला डान्स करायला खूप आवडतं. त्या दिवशी जर मी ऑडिशनला गेले नसते किंवा लाईट गेल्याचे निमित्त करून परफॉर्मन्स देणार नाही असं सांगितलं असतं, तर कदाचित मी आज इथपर्यंतचा प्रवास करू शकले नसते. म्हणूनच मला असं वाटतं की माणसाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या रूपांमध्ये, वेगळ्या वळणावर  एक संधी वाट बघत असते. मात्र कुठल्याही कारणास्तव तुम्ही ती संधी सोडू नका. त्यादिवशी ती संधी मी सोडली असती, तर आज मी माझं डान्सचे स्वप्न पूर्ण करू शकले नसते. 

=====

हे देखील वाचा: टिकटॉकपासून बिगबॉसच्या घरापर्यंतचा प्रवास – अभिनेत्री सोनाली पाटील

=====

पूजा सावंतने विविध चित्रपट आणि डान्स शोमध्ये काम केले आहे. दगडी चाळ या सिनेमातील तिची भूमिका विशेष गाजली होती, तर ‘जंगली’ या हिंदी सिनेमात ती महिला माहूतच्या भूमिकेत पडद्यावर दिसली होती. ‘भेटली ती पुन्हा’ या सिनेमात वैभव तत्ववादी सोबत तिची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. ‘नीलकंठ मास्तर’ या सिनेमातील ‘अधीर मन झाले…मधुर घन आले’ या गाण्यात पुजाच्या नृत्याने कमाल केली आहे.

पूजा सावंत (Pooja Sawant) सोशल मीडियावर आपले अनुभव शेअर करत असते. मध्यंतरी एक डान्स शो करत असताना अचानक स्टेज कोसळल्याची घटना घडली होती. त्यावेळी पूजा त्या अपघातातून  बचावली होती. हा प्रसंग तिने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला होता तसेच त्या वेळेचा अनुभव देखील तिने प्रेक्षकांना  सांगितला होता.

– अनुराधा कदम


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.