Home » सौदी अरेबियात योग विद्यापीठ

सौदी अरेबियात योग विद्यापीठ

by Team Gajawaja
0 comment
Saudi Arabia
Share

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सौदी अरेबियाने (Saudi Arabia) एक अभूतपूर्व असा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास कट्टरवाद्यांनी विरोध केला, मात्र सौदी अरेबियानं (Saudi Arabia) या कट्टरवाद्यांकडे दुर्लक्ष करीत याच कार्यक्रमाचे आता पुढचे पाऊल टाकले आहे. हा कार्यक्रम होता योग शिक्षणाबाबतचा.  यात जवळपास 11 अरब देशांना आमंत्रण देण्यात आल होत. आता याच सौदी अरेबियामध्ये(Saudi Arabia) योग विद्यापीठाची स्थापना होत आहे.  एक मोठा क्रांतिकारक निर्णय म्हणून याकडे बघण्यात येत आहे. सौदी अरेबियामध्ये काही वर्षापूर्वी योगासनांवर बंदी होती. कट्टरवाद्यांनी योग म्हणजे इस्लामविरोधी असल्याचे जाहीर केले होते. मात्र हा सौदी अरेबिया आता बदलत आहेत. योगचा आपल्या आरोग्यावर किती चांगला परिणाम होतो, हे लक्षात घेऊन सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी हा निर्णय घेतला आहे. योगाला सौदी अरेबियामध्ये (Saudi Arabia) एक खेळ म्हणून मान्यता मिळाली आहे. कट्टरवादी विचारसरणी असलेल्यांना ही मोठी चपराक मानली जाते. 

सौदी युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स फेडरेशनने रियाधमधील शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमात या योग विद्यापीठाची घोषणा करण्यात आली. सौदी अरेबियामधील अभ्यासक्रमात खेळांचा समावेश करण्यासाठी गेल्या काही वर्षापासून नव्यानं प्रयत्न करण्यात येत आहेत. आता या खेळांमध्ये योगाचाही समावेश करण्यात येतोय. आता या निर्णयावरुन सौदीमध्ये अनेक चर्चा सुरु झालेल्या आहेत.  या निर्णयाला कट्टरवाद्यांतर्फे मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला आहे.  मात्र या विरोधाकडे दुर्लक्ष करीत सौदी सरकारनं योग विद्यापीठाच्या स्थापनेसाठी पुढची कारवाई सुरु करण्यात आली आहे.  

या निर्णयानुसार सौदी अरेबिया (Saudi Arabia) आपल्या अनेक प्रमुख विद्यापीठांमध्ये योगासन वर्ग सुरू करणार आहे.  मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व लक्षात घेऊन सौदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. सौदी युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स फेडरेशनने ‘द रोल ऑफ युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स इन सपोर्टिंग द किंगडम्स व्हिजन इन स्पोर्ट्स’  हा कार्यक्रम रियाधमध्ये आयोजित केला होता.  यावेळी या योग अभ्यासक्रमाची  घोषणा करण्यात आली. सध्या सौदी अरेबिया (Saudi Arabia) हा देश आपल्या प्रगतीच्या उच्च टप्प्यावर आहे.   विदेशी पर्यटक आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी  येथे अनेक सुधारणावादी विचारांचा स्विकार करण्यात आला आहे.  डिसेंबर महिन्यात सौदीत ख्रिसमसही मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. यावरही टिका करण्यात आली.  मात्र या टिकाकारांकडे दुर्लक्ष करीत सौदी सरकारनं आपल्या नव्या योजनांचा पाठपुरावा कायम केला आहे. त्यातच आता योग विद्यापीठाच्या निर्णयाची भर पडणार आहे.  

======

हे देखील वाचा :  विषारी शेवाळ्याच्या जाळ्यात समुद्र….

======

योग विद्यापीठाची घोषणा केल्यावर हे विद्यापीठ कसे असेल याचीही रुपरेखा स्पष्ट करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यांत योगास समर्थन आणि प्रोत्साहन देण्यासाठी देशातील आघाडीच्या विद्यापीठांसोबत अनेक करार करण्यात येणार आहेत. सौदी योग समितीचे अध्यक्ष नूफ अल-मारवाई यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. नूफ अल-मारवाई यांना प्राथमिक टप्प्यावरच अनेकांनी विरोध केला.  तेव्हा त्या विरोधकांना,  योगासने केल्याने शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही फायदे होतात, असे नूफ यांनी स्पष्ट केले.   एवढेच नाही तर व्हिजन 2030 अंतर्गत, आम्ही येथे क्रीडा विद्यापीठांची मोठ्या संख्येनं वाढ करणार असून त्यामध्ये योगाचा मोठा सहभाग असेल.  याशिवाय  योगाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील समावेश केला जाईल, असेही त्यांनी आश्वासन दिले आहे.  त्यांच्या या निर्णयावर कट्टरवाद्यांनी त्यांना धमक्याही दिल्या आहेत.  यावर नूफ यांनी योगाच्याच माध्यमातून उत्तर दिले आहे.  गेली 10 वर्ष स्वतः नूफ योगासने करत आहेत.  त्यामुळे त्यांना योगाचे फायदे माहित आहेत.  आता सौदी अरेबियाचे (Saudi Arabia) क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनीही योगाला एक खेळ म्हणून मान्यता दिल्याने नूफ यांचे सौदी अरेबियामधले योग प्रचार आणि प्रसाराचे कार्य अधिक सुलभ झाले आहे. सौदी अरेबियामध्ये योग प्रशिक्षण, सराव, स्पर्धा, योगाचा समावेश असलेले सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार आहेत. सौदीमध्ये काही महिन्यांपूर्वी योगा चॅम्पियनशिप पार पडली. यामध्ये 112 अभ्यासक सहभागी झाले होते.  काही वर्षापासून सौदी अरेबियात धक्कादायक बदल पाहायला मिळत आहेत.  आता सौदी अरेबियात महिलांना गाडी चालवण्याचा अधिकार मिळाला आहे.  शैक्षणिक सुधारणा होत आहेत. यामुळे येत्या काही वर्षात सौदी अरेबियाचे स्वरुन नक्कीच बदललेले असणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.