अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाची ठिणगी कुठल्याही क्षणी पडण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला त्यांच्या अणुकरार कार्यक्रमावर ७२ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. या दोन देशांमध्ये जिनिव्हा येथे सुरू असलेली चर्चा अपयशी ठरली आहे. त्यानंतर अमेरिकेने इराणवर हल्ला करण्याची तयारी अंतिम टप्प्यात सुरू केल्याची माहिती आहे. यामध्ये लष्करी तैनाती आणि इस्रायलची सुरक्षा यांचा समावेश आहे. अमेरिकन सैन्याने मध्य पूर्वेतील युद्धासाठी व्यापक तयारी सुरू केली असून यातून इराणवर अनेक दिवस बॉम्बहल्ले करण्याचाही अमेरिकेचा मानस आहे. मात्र हा संभाव्य विनाश दिसत असतानाही इराणच्या नेतृत्वाने अमेरिकेसमोर हार मानण्यास नकार दिला आहे. त्यातच इराणमध्ये मोठा भूकंप झाल्याची बातमी समोर आली आहे. हा भूकंप नेमका होर्मुझ समुद्रधुनीच्या आसपास झाला आहे. भूकंप होण्याच्या काही तास आधी इराणने ही समुद्रधुनी लष्करी सरावाच्या नावाखाली बंद केली होती. त्यामुळे हा भूकंप नैसर्गिक आहे की काही वेगळे कारण आहे, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याला तोंड देण्यासाठी इराणने शक्तिशाली अणुचाचणी केल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे अमेरिका-इराण युद्ध झाल्यास ते संपूर्ण जगासाठी किती विनाशकारी ठरू शकते, याची कल्पना येते. ( United States and Iran Tensions )

इराणच्या समुद्रात अमेरिकेच्या युद्धनौका सज्ज होत असतानाच दक्षिण इराणमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. इराणमध्ये भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.५ इतकी नोंदवली गेली. भूकंप होताच घबराट पसरली आणि लोक घराबाहेर पळाले. त्यानंतर हा नैसर्गिक भूकंप होता की अणुचाचणीची कंपन होती, याबाबत चर्चा सुरू झाली. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसनुसार, फार्स प्रांतातील मोहर शहरापासून सुमारे ३६ किलोमीटर नैऋत्येस २७.३६ अंश उत्तर अक्षांश आणि ५२.६० अंश पूर्व रेखांशावर भूकंपाचे केंद्र होते. भूकंपाची खोली फक्त १० किलोमीटर होती, त्यामुळे तो अधिक तीव्र जाणवला. हा भाग इराणच्या होर्मुझ समुद्रधुनी परिसरात येतो. ही समुद्रधुनी काही तास आधीच बंद करण्यात आली होती. त्यामुळे आशियाई तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र इराणने यासाठी लष्करी सरावाचे कारण दिले. त्यानंतर लगेच भूकंप झाल्याने शंका अधिक बळावली आहे.
अमेरिका आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचलेला असतानाच हा भूकंप झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. अमेरिका २२ फेब्रुवारीपर्यंत इराणवर हल्ला करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर इराणने शक्तिशाली अणुचाचणी केली असावी, अशी चर्चा रंगली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या सत्तेबाबत कठोर इशारा दिला आहे. तर खामेनी यांनी अमेरिकेच्या युद्धनौकांना इराणच्या समुद्रात बुडवण्याची धमकी दिली आहे. जिनिव्हा येथे सुरू असलेली शांतता चर्चा अपयशी ठरल्याने आता अमेरिका कुठल्याही क्षणी हल्ला करू शकते, असे सांगितले जात आहे. युद्धनौका, लढाऊ विमाने आणि इंधन भरणारी विमाने यांसह मध्य पूर्वेत अमेरिकेने मोठ्या प्रमाणात लष्करी ताकद उभी केली आहे. अमेरिका ‘ऑपरेशन ७२’ ची तयारी करत असल्याचे सोशल मीडियावर चर्चेत आहे. ( United States and Iran Tensions )
=======
हे देखील वाचा : Prince Andrew : माजी राजकुमाराच्या कर्माची फळं
=======
या पार्श्वभूमीवर जर इराणने अणुचाचणी केली असेल, तर ते अमेरिकेसाठी गंभीर इशारा ठरेल. कारण अशा परिस्थितीत इराणवर त्वरीत वर्चस्व मिळवणे अमेरिकेसाठी कठीण ठरू शकते. अणुचाचणीदरम्यान भूगर्भात स्फोट होतो आणि त्यातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. त्यामुळे कृत्रिम भूकंपीय लाटा निर्माण होतात आणि त्या पृष्ठभागावर भूकंपासारख्या जाणवतात. हीच स्थिती इराणमधील या भूकंपाच्या वेळी होती का, याबाबत चर्चा सुरू आहे. पुढील काही तासांत अमेरिका जर खरोखरच इराणवर हल्ला करत असेल, तर इराण त्याला कसे उत्तर देणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ( United States and Iran Tensions )
सई बने
