खानापूर पंचायत समितीमध्ये आज प्रजासत्ताक दिन अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला. भारतीय सैन्यदलात काम करत असताना ज्या माजी लष्करी अधिकारी व सैनिकांनी प्रत्यक्षात युद्धामध्ये सहभाग घेऊन आपल्या प्राणांची बाजी लावली, अशा वंदनीय लष्करी अधिकारी व सैनिकांच्या हस्ते पंचायत समितीच्या आवारात ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या हस्ते या शूरवीरांचा यथोचित सत्कारही करण्यात आला.
खानापूर पंचायत समितीच्या विद्यमान सभागृहाचा हा अखेरचा प्रजासत्ताक दिन होता. काही दिवसात सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचा कालावधीत संपणार असून, लवकरच निवडणुका लागणार आहेत. गेल्या दहा वर्षात या पंचायत समितीने अनेक अनोखे उपक्रम राबवून राज्यात आदर्श निर्माण केला आहे.
यशवंत पंचायत राज अभियानात ही पंचायत समिती राज्यात पहिली आली होती. प्रशासन, क्रीडा, कला, सांस्कृतिक विभागात तर या पंचायत समितीने यश मिळवले आहेच, त्याबरोबरच तालुक्यातील सर्वच्या सर्व ग्रामपंचायती व्हिडिओ कॉन्फरसिंगने जोडण्याचा राज्यातला पहिला प्रयोग या पंचायत समितीने केला होता.

गेल्या १० वर्षात शिक्षण विभागात या पंचायत समितीने अफलातून कामगिरी केली आहे. कोरोनाचे संकट असताना पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने अक्षरशः जीव धोक्यात घालून काम केले आहे. या पंचायत समितीच्या कामाची नेहमीच विविध पातळीवर प्रशंसा होत असते. हा प्रजासत्ताक दिन देखील अनोख्या पद्धतीने ‘माजी सैनिकांचा सन्मान’ करून राबविण्याचा संकल्प जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केला होता आणि त्यास सभापती महावीर शिंदे, उपसभापती सारिका माने, गटविकास अधिकारी संदीप पवार यांचे व सदस्यांचे सहकार्य लाभले.
यंदाचे ध्वजारोहण ज्यांनी प्रत्यक्ष सीमेवर लढताना सहभाग घेतला आशा माजी सैनिकांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यातील बहुतांश माजी सैनिक या सोहळ्यास उपस्थित होते. ध्वजारोहण पार पडल्यानंतर सर्व माजी सैनिकांचा कृतज्ञता म्हणुन याथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी काही माजी सौनिकांनी लढाईतील चित्तथरारक अनुभव सांगितले. आज राज्यभरात वेगवेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना खानापूर पंचायत समितीने मात्र आपले वेगळेपण दाखवून दिले आहे.
हे ही वाचा: भारतीय राज्यघटना: राज्यघटनेविषयीची ९ अज्ञात तथ्ये
व्हाय आय किल्ड गांधी: अभिनेते आणि जनमानसातील प्रतिमा
यावेळी माजी सभापती मनीषा बागल, माजी उपसभापती बाळासाहेब नलवडे, जिल्हा परिषद सदस्या निलम सकटे, सुलभा आदाटे, पंचायत समिती सदस्य संजय मोहिते, कविता देवकर यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आज सीमेवर जे लढताहेत त्यांच्यामुळेच आपण सुखाचे दोन घास खात आहोत. आपल्या तालुक्यातील अशा अनेक माजी सैनिकांनी यापूर्वी जे अतुलनीय काम केले आहे, त्यांच्या हस्ते ध्वजारोहण व्हावे व त्यांचा सन्मान व्हावा असा कृतज्ञता म्हणून आजचा प्रजासत्ताक दिन आम्ही साजरा केला. आम्हाला त्यांचा मनस्वी अभिमान आहे, त्यांच्या कार्याला आमचा नेहमीच सलाम राहील अशी प्रतिक्रिया सुहास बाबर यांनी व्यक्त केली.
बी. संतोष