Home » युक्रेनमध्ये चर्चा आहे या दोन लढवय्या महिलांची… 

युक्रेनमध्ये चर्चा आहे या दोन लढवय्या महिलांची… 

by Team Gajawaja
0 comment
Tetiana Chornovol
Share

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाला आता महिना होत आला आहे. प्रथम रशियासमोर कमकुवत वाटणाऱ्या युक्रेननं रशियासारख्या प्रबळ देशाला इतके दिवस झुंझवल्यानं युक्रेनच्या लढावू क्षमतेचं कौतुक होत आहे. 

असे असताना युक्रेनच्या सैन्याचे बॅकबोन म्हणून काही व्यक्ती पुढे आल्या आहेत.  त्यापैकी दोन महिला आहेत. लेफ्टिनेंट तेत्याना चोर्नोवोल (Tetiana Chornovol) आणि यूक्रेनच्या उपप्रधानमंत्री इरिना एंड्रीवना वेरेस्चुक या दोन महिलांच्या धैर्याची आणि साहसाची सध्या चर्चा होत आहे. 

या दोन महिलांपैकी लेफ्टिनेंट तेत्याना चोर्नोवोल यांची पार्श्वभूमी गौरवास्पद आहे. तेत्याना माजी सांसद आहेत. युक्रेनची राजधानी कीवचे संरक्षण करण्याची प्रमुख जबाबदारी सध्या तेत्याना यांच्याकडेच आहे.  त्यांनी आखलेल्या डावपेचामुळेच कीव अद्यापही रशियाच्या ताब्यात गेलेले नाही.  

सध्या तेत्याना (Tetiana Chornovol) अजोब बटालियनसोबत एंटी टैंक मिसाइल युनिट सांभाळत आहे. याच मिसाइलच्या सहाय्यानं त्यांनी अनेक रशियन रनगाडे उद्धस्त केले आहेत. तेत्याना या मुळातच धाडसी महिला म्हणून युक्रेनमध्ये ओळखल्या जातात. शोध पत्रकार म्हणूनही त्यांचा लौकीक आहे.  

2013 मध्ये तेत्याना यांची ओळख युक्रेनी जनतेला झाली. त्यावेळेचे रशियन समर्थक, युक्रेनी राष्ट्रपती विक्टर यानुकोविच यांचा मोठा घोटाळा तेत्याना यांनी समोर आणला. यामुळे युक्रेन आणि रशियामध्येही मोठी खळबळ उडाली.  

डिसेंबर 2013 मध्ये ऐन ख्रिसमसच्या सुमारास तेत्याना यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. जवळपास मरणावस्थेत असलेल्या तेत्याना यांनी अनेक दिवस रुग्णालायत घालवले. पण त्या जीगरी ठरल्या. मृत्यूला हरवून त्या उभ्या राहिल्या आणि आपल्या हल्ल्याला यानुकोविच असल्याचे जाहीर केले.  

====

हे देखील वाचा: Ukraine-Russia War: कीवमध्ये रशियन हल्ल्यात प्रसिद्ध युक्रेनियन अभिनेत्रीचा मृत्यु

====

तेत्याना सध्या ज्या अजोव बटालियनसोबत तैनात आहेत त्याच बटालियनमध्ये त्यांचे पती मायकोला बेरेजोवईही तैनात होते. 2014 मध्ये त्यांना विरमरण प्राप्त झाले. आता आपल्या पतीच्याच बटालियनमध्ये युक्रेनसाठी लढणाऱ्या तेत्याना (Tetiana Chornovol) समस्त युक्रेनच्या महिलांसाठी गौरवाचा विषय ठरल्या आहेत.  

तेत्याना (Tetiana Chornovol) यांच्यासारख्याच लढवय्या आहेत युक्रेनच्या उपप्रधानमंत्री इरीना एंड्रीवना वेरेस्चुक. त्यांच्याबाबत विशेष सांगायचे म्हणजे, त्या कधीकाळी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्या चाहत्या होत्या. पुतिन यांच्यासारखा राष्ट्रपती युक्रेनला मिळायला हवा असं वक्तव्य इरीना यांनी केलं होतं. त्याच इरीना आता पुतिन यांच्यावर टीका करीत आहेत.  

लीव ओब्लास्ट येथे जन्म झालेल्या इरीना या शालेय जीवनापासून अत्यंत हुशार विद्यार्थिनी म्हणून परिचीत आहेत. लीव पॉलिटेक्निक, मिलिट्री इंस्टीट्यूटमधून शिक्षण घेऊन त्यांनी पुढे  यूनिवर्सिटी ऑफ लीव मधून कायद्याचे शिक्षणही पूर्ण केले आहे. या सर्व शिक्षणात त्या गोल्ड मेडलिस्ट होत्या.  

====

हे देखील वाचा: ही दाक्षिणात्य अभिनेत्री आहे अमेरिकेन आर्मीमध्ये वकील

====

या सर्वांदरम्यान इरीना यांनी यूक्रेनी राष्ट्रपतींच्या अधिपत्याखाली येणाऱ्या नॅशनल अकॅडमीमधून  सार्वजनिक प्रशासन या विषयातही पदवी संपादन केली. त्यात त्यांनी डॉक्टरेटही मिळवली आहे. लष्करी शाळेत शिकलेल्या इरीना यांनी पाच वर्ष देशाच्या आर्मीसाठी काम केले. वकील म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.  

2010 मध्ये त्या सर्वात कमी वयात महापौर होणाऱ्या महिला होत्या. पोलंडच्या विद्यापीठात इरीना यांनी राजनिती आणि प्रशासन याबाबत संशोधन प्रबंध सादर केला.  2019 मध्ये युक्रेनच्या संसदीय निवडणुकीत इरीना विजयी झाल्या. तिथे अनेक मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या इरीना 4 नोव्हेंबर 2021 रोजी युक्रेनच्या उपप्रधानमंत्रीपदी विराजमान झाल्या.  

आता या युद्धात युक्रेनमधून हजारो नागरिक स्थलांतर करीत आहेत. या सर्व नागरिकांच्या स्थलांतराची जबाबदारी इरीना सांभाळत आहेत. त्यासोबत प्रसिद्धी माध्यमाचे कामही इरीना सांभाळत आहेत आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना मदत करत आहेत. एकूण तेत्याना आणि इरीना या दोन महिला सध्या युक्रेनच्या जनतेसाठी आशेचा किरण ठरल्या आहेत.

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.