एलियन, म्हणजेच परग्रहींबद्दल जेवढी उत्सुकता अमेरिकेत आहे, तेवढी अन्य कुठल्याही देशात नाही. या देशात दर दिवसाला एलियन आणि युएफओ संदर्भात नवीन बातमी येत असते. आता या बातमीत थेट पेंटागॉननच भर टाकली आहे. अमेरिकेचा संरक्षण विभाग म्हणून ओळखल्या जाणा-या पेंटागॉननं एलियन संदर्भात एक अहवालच प्रसिद्ध केला आहे. या अहवालातील नोंदीमुळे पुन्हा एलियन आहेत का, आणि ते पृथ्वीवर येतात का, याची चर्चा सुरु झाली आहे. या अहवालात गेल्या वर्षभरात आकाशातून पृथ्वीवर काही रहस्यमय गोष्टी आलेल्याची नोंद करण्यात आली आहे. शिवाय या गोष्टी पुन्हा आकाशातही जातांना दिसल्याचीही नोंद आहे. हे युएफओ असून याच विमानातून एलियन पृथ्वीवर येतात आणि जातात असल्याची माहिती पुढे आल्यामुळे खळबळ उडाली आहे. (UFOs And Aliens)
यालाच सोबत आणखी एक बातमी पुढे आली आहे. काँग्रेसवुमन लॉरेन बोएबर्ट यांनी समुद्रामध्ये युएफओसाठींचा मोठा तळ असल्याचा दावा केला आहे. ही सर्व माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांकडे आहे. मात्र ही माहिती अमेरिकन जनतेपासून लपवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. समुद्राच्या तळाला अनेक युएफओ असून परग्रही त्यातून पृथ्वीच्या संपर्कात असल्याचा दावा बोएबर्ट यांनी केला आहे. हे दोन्ही दावे एकदम आल्यानं पुन्हा एकदा युएफओ आणि एलियन यांची चर्चा सुरु झाली आहे. अमेरिकन संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनने यूएफओ आणि एलियन्सवर एक नवीन अहवाल जाहीर केला आणि अमेरिकेत एकच खळबळ उडाली आहे. या अहवालात एलियन संदर्भात अनेक खुलासे करण्यात आले आहेत. या अहवालात अमेरिकेतील अवकाशाचा 1 मे 2023 ते 1 जून 2024 पर्यंत आढावा घेण्यात आला आहे. या दरम्यान अनेकांनी आकाशात एक गुढ वस्तू उडतांना पाहिल्याचे सांगितले आहे. त्यात सामान्य जनतेचा जेवढा सहभाग आहे, तेवढचे अमेरिकन एअर फोर्स आणि विमान सेवेतील वैमानिकांचाही समावेश आहे. या सर्वांच्या मते अमेरिकेच्या आकाशात अनेकवेळा युएफओ सारख्या वस्तू उडतांना दिसत आहेत. (International News)
विमानांसारख्या या वस्तू कशामुळे उडत आहेत, हे मात्र कोणालाही शोधता आले नसल्यामुळे अहवालात त्यांचा उल्लेख गुढ वस्तू असाच करण्यात आला आहे. या सर्वांचा तपास पेंटागॉनतर्फे करण्यात आला. ज्या तक्रारी आल्या होत्या, त्यातील अर्ध्या तक्रारीतून युएफओ नाही तर फुगे, पक्षी आणि उपग्रहांशीसंबंधीत वस्तू आढळल्या. मात्र उर्वरित वस्तू नेमक्या काय होत्या, याचा शोध घेता आला नाही, त्यामुळे त्यांचे गुढ वाढले आहेत. अशी एकूण 757 प्रकरणे आहेत. यातील बहुतांश गोष्टी या किमान 100 किलोमीटरच्या उंचीवर दिसल्या आहेत. पेंटागॉन आता यासंदर्भात अधिक तपास करीत आहे. मात्र एकीकडे हा तपास चालू असतांना काँग्रेसवुमन लॉरेन बोएबर्ट यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या कोलोरॅडो राज्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या बोएबर्टने यांनी समुद्राच्या तळाशी अनेक गुढ गोष्टी घडत असल्याचे सांगितले आहे. समुद्राच्या तळाला युएफओ येत असून यात एलियनही असतात असेही त्यांनी सांगितले आहे. (UFOs And Aliens)
======
हे देखील वाचा : टीव्ही होस्ट ते संरक्षण मंत्री
====
तसेच यासंदर्भात अमेरिकन सैन्याला सगळी माहिती असल्याचाही त्यांचा दावा आहे. याबाबत अमेरिकन जनतेला माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे. युएफओ आणि एलियान बाबत अमेरिकन सैन्य आणि गुप्तचर विभागांकडे छायाचित्रे, व्हिडिओ आणि इतर अनेक प्रकारची माहिती आहे. हे सगळे एलियनच्या अस्तित्वाबद्दल माहिती देणारे स्पष्ट पुरावे असून ते जाणण्याचा अधिकार अमेरिकन जनतेला असल्याचेही बोएबर्ट यांनी सांगितले आहे. या दाव्यात भर म्हणून की काय अमेरिकन संरक्षण विभागाचे माजी विरोधी गुप्तचर तज्ञ लुईस एलिझोन्डो यांनी सरकारी कर्मचारी युएफओमुळे जखमी झाल्याचा दावा केला आहे. त्यांचे याबाबत एक पुस्तक असून त्यात अमेरिकन सरकारने अपघातस्थळावरून एलियनचा मृतदेह बाहेर काढल्याचा दावाही करण्यात आला आहे. एकूण अमेरिकेत एकीकडे नव्या सरकारची घडी बसवण्यात डोनाल्ड ट्रम्प हे व्यस्त असले तरी दुसरीकडे युएफओ आणि एलियन यांच्यासंदर्भात दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. (International News)
सई बने