उद्धव ठाकरे कधीही आडपदडा ठेवून बोलत नाहीत. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढायला हवं हीच भूमिका त्यांनी मांडली. बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व आता उद्धव ठाकरे यांनी करायला हवं, असं मत शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं. महाराष्ट्र, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, झारखंड, राजस्थान, पश्चिम बंगाल, ओरिसा, पंजाब, आंध्र प्रदेश ही बिगर भाजपशासित राज्ये आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवण्याची मागणी शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तून करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्ताने ‘सह्याद्रीचा कडा! हिमालयाकडे कूच करा,’ अशा मथळ्यासह आज सामनाचा अग्रलेख लिहिण्यात आला होता. आता उद्धव ठाकरेंनी बिगर भाजपशासित राज्यांचं नेतृत्त्व करण्याचं मत राऊत यांनी व्यक्त केलं.
दरम्यान देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत आहेत. देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतले जाईल, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.