लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) भाजपला बऱ्यापैकी टक्कर देणाऱ्या इंडिया आघाडीचे राष्ट्रीय पातळीवर विसर्जन होईल न होईल, परंतु महाराष्ट्रात मात्र ते झालेच आहे. दिल्लीत घडणाऱ्या घडामोडींचे पडसाद राज्यातही पडणार आहेत, पडत आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मविआला (MVA) राम राम ठोकत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचं जाहीर केलं आहे. महाविकास आघाडीतील पक्ष विधानसभेच्या जागावाटपापासूनच एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत होते. त्यामुळे ही आघाडीसुद्धा कधी ना कधी कोसळेल, अशा चर्चा होत होत्या. त्यातच उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर मुंबई महापालिका निवडणूक लढविण्याची घोषणा करून मविआच्या ताबूतावर शेवटचा खिळा ठोकला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि एकूणच इंडिया आघाडीत ताटातूट होऊन, या आघाड्यांमधील पक्ष वेगवेगळ्या दिशेला जाणार का? हे जाणून घेऊ.(Uddhav Thackeray)
राष्ट्रीय पातळीवर दिल्ली विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha elections) रणधुमाळी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत खांद्याला खांदा लावून लढणारे काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे पक्ष दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात रिंगणात आहेत. या आघाडीच्या एक आधारस्तंभ असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी ‘आप’ला पाठिंबा जाहीर केला आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनीही काँग्रेसवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.(Political news)
उमर अब्दुल्ला यांनी आपली चरफड व्यक्त करताना सांगितले, तसे दिल्ली निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीची कोणतीही बैठक झाली नाही. या आघाडीचे नेतृत्त्व कोण करणार? तिचे धोरण काय असेल? ही आघाडी पुढे वाटचाल कशी करणार? या प्रश्नांवर कोणतीही चर्चा झालेली नाही. आपण एकजूट राहू की नाही याबद्दलही आघाडीच्या नेत्यांमध्ये कोणतीही स्पष्टता नव्हती. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक झाली पाहिजे. केवळ लोकसभा निवडणुकीपुरती ही आघाडी केली असेल, तर ही आघाडी आता बरखास्त करा. आणि विधानसभा निवडणुकीतही आघाडी कायम ठेवायची असेल तर आपण एकत्र काम करावे, अशी अपेक्षाही उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली आहे.(Political news)
राष्ट्रीय पातळीवर बोलायचे झाले तर इंडिया या आघाडीचे नेतृत्त्व कोण करणार, यावर वाद निर्माण झाला आहे. लोकसभेत शंभर जागा मिळाल्यामुळे काँग्रेस, म्हणजे पर्यायाने राहुल गांधीच, या आघाडीचे नेतृत्त्व करतील, असे त्या पक्षाला वाटते. परंतु स्वतः अब्दुल्ला, ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव अशा प्रबळ प्रादेशिक नेत्यांना तसे वाटत नाही. शिवाय राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वगुणांवर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे असते. त्यामुळे त्या आघाडीत बेबनाव निर्माण झाला आहे.
जे दिल्लीत, तेच मुंबईत. खरे तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या आधीही अस्तित्वात आली. वास्तविक या आघाडीमुळेच राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीला आकार आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची त्यात महत्त्वाची भूमिका होती. या आघाडीने लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखून मोठे यश मिळाले. महाविकास आघाडीचे 30 खासदार निवडून आले, त्यात 13 खासदार एकट्या काँग्रेसचे होते. या यशामुळे तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँगेस व शिवसेना उबाठा गट यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून वाद निर्माण झाला. मात्र निवडणूक निकालात त्यांच्या हाती निराशा आली. विधानसभेत भाजपच्या नेतृत्त्वाखालील महायुतीने प्रचंड यश मिळविले.(Uddhav Thackeray)
महाविकास आघाडीला लोकसभेतील यश पचले नाही, तसेच विधानसभेतील अपयशही पचले नाही. म्हणूनच विधानसभेच्या पराभवावरून आघाडीतील मित्रपक्षांनी एकमेकांवरच तोंडसुख घ्यायला सुरूवात केली. विधानसभा निवडणुकीत मविआच्या पराभवासाठी अनेक कारणे आहेत. मात्र जागावाटपाच्या चर्चेला झालेला विलंब हे एक मुख्य कारण आहे, असे सांगून माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार विजय वडेट्टीवार यांनी उबाठासेनेला लक्ष्य केले. जागावाटपाचा गोंधळ सोडवण्यासाठी मविआच्या नेत्यांना 20 दिवस लागले. नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन वरिष्ठ नेते चर्चेला हो म्हणाले असते आणि दोन दिवसांत हे प्रश्न सोडवले असते तर प्रचारासाठी 18 अतिरिक्त दिवस मिळाले असते, असे वडेट्टीवार म्हणाले.(Political news)
वडेट्टीवार यांच्या या आरोपाला उबाठा सेनेचे नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी तेवढेच तिखट प्रत्युत्तर दिले. काँग्रेसचे स्थानिक नेते जेव्हा जागावाटपाच्या चर्चेत कठोर सौदेबाजी करत होते तेव्हा काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने हस्तक्षेप केला नाही, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उबाठा गट यांच्याकडे अनेक मतदारसंघांत चांगले उमेदवार होते, मात्र काँग्रेसने त्या जागांवर आपला दावा सोडला नाही. कुरघोडी करण्यापेक्षा एकसंघ मविआ म्हणून आम्ही चांगल्या प्रकारे जागावाटप करू शकलो असतो, अशी कबुली त्यांनी दिली.(Uddhav Thackeray)
याच वादात त्यांनी दिल्लीतील घडामोडींचाही संदर्भ दिला. इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांना ही आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीसाठी होती, असे वाटत असेल आणि आणि ही आघाडी आता अस्तित्वात नसेल तर त्यासाठी काँग्रेसला दोष द्यावा लागेल. आमच्यात संवादच झाला नाही. आम्ही लोकसभेच्या निवडणुका एकत्र लढल्या. त्याचे निकालही चांगले आले. परंतु त्यानंतर पुढच्या योजना आखण्यासाठी बैठक व्हायला हवी होती आणि त्यासाठी पुढाकार घेणे ही काँग्रेसची जबाबदारी होती, हे त्यांनी बोलून दाखविले.(Political news)
माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार नितीन राऊत यांनीही या चिखलफेकीत भाग घेतला. मविआच्या तिन्ही पक्षांनी तळागाळात काम करण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी जागावाटपाच्या वाटाघाटीत वेळ घालविला. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आम्ही सावधान राहिलो नाहीत आणि जमिनीवर काम करण्याकडे दुर्लक्ष केले. त्याचा तोटा आम्हाला झाला, असे नितीन राऊत म्हणाले.(Uddhav Thackeray)
मविआतील तिसरा पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचीही चाल वेगळीच सुरू आहे. गुरुवारी त्या पक्षाच्या दोन दिवसीय आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी या दोन्ही पक्षांवर निशाणा साधला. कोल्हे हे शरद पवार यांचे किती निकटवर्ती आहेत, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे ते जे बोलतात ते पवारांचेच मत आहे, असं मानायला जागा आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहिली तर काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही अन् शिवसेनेला अजून जाग येत नाही, असे ते म्हणाले.(Political news)
स्वतः शरद पवार यांनी गेल्या काही दिवसात वेगवेगळे संकेत देऊन पुन्हा संभ्रम निर्माण केला आहे. पक्षाच्या आढावा बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचे त्यांनी केलेले कौतुक, अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काका-पुतण्याची झालेली भेट आणि त्यानंतर दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची सुरू झालेली चर्चा, तसेच इंडिया आघाडीबाबत उलटसुलट चर्चेमध्ये त्यांनी कुठलीही भूमिका न घेणे अशा वेगवेगळ्या घटनांमुळे त्यांची भाजपशी जवळीक वाढली आहे का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. “भाजपने निवडणुकीत हिंदुत्वाचा वापर केला. हा असा पक्ष आहे जिथे लोकांनी त्यांचे जीवन समर्पित केले आहे. त्यांच्याकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संस्था आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांसारखे काम कऱणारे लोक आपल्याकडे हवेत,” असे पवार म्हणाले. ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे.(Uddhav Thackeray)
दुसऱ्या बाजूला उबाठा सेनेनेही पुन्हा भाजपशी घरोबा करण्याची तयारी केली आहे की काय, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या महिनाभरात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किमान तीन-चारदा भेटले. आपले मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून फडणवीस यांच्यासाठी देवाभाऊ असा सन्मानदर्शक उल्लेख केला. त्यामुळेही काँग्रेसमध्ये अस्वस्थता आणखी वाढली.
===============
हे देखील वाचा : America Fire : अमेरिकेच्या जंगलांना भीषण आग ! लावली की लागली ?
===============
या सर्व गदारोळातच अखेर मविआचे अस्तित्व संपविण्याची घोषणा करत उबाठा सेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. एकदा आम्हाला पाहायचे आहेच, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतंय. मुंबई, ठाणे नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असे त्यांनी सांगितले. दुसऱ्या बाजूने ठाकरे गटाचा निर्णय झाला असेल तर थांबवणारे आम्ही कोण? राऊतांनी चर्चा करुन निर्णय घ्यायला हवा होता, अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
थोडक्यात म्हणजे दिल्लीपासून मुंबईपर्यंत इंडिया या आणि महाविकास आघाडीचे नेतेच लोकसभा निवडणुकीच्या निकालापासूनच एका पानावर नाही आहेत. त्यात उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय. या सर्व गोष्टींचे संकेत याच प्रश्नाकडेच बोट करत आहेत की, मविआ आता संपणार का? अशी अधिकृत घोषणा अजून कोणीही केलेली नाही. पण परिस्थिती तशीच निर्माण झाली आहे. मविआ म्हणजे मला विसरा आता असा एक विनोद विधानसभा निवडणुकीनंतर प्रचलित झाला होता. तो आता खरा ठरताना दिसत आहे.