Uddhav Thackeray Birthday- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस. उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० मध्ये महाराष्ट्रातच झाला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वात लहान सुपुत्र, उद्धव ठाकरे हे ठाकरे परिवारातील पहिलेच मुख्यमंत्री. परंतु काही दिवसांपासून आपण पाहिले राज्यातील राजकरणाला एक वेगळेच वळण लागल्याने अखेर उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र उद्धव ठाकरे यांना राजकरणात यायचे नव्हते परंतु २००२ मध्ये ते राजकरणात अधिक अॅक्टिव्ह झाले. तर ठाकरेशाही, उत्तम फोटोग्राफर ते राज्याचे मुख्यमंत्री पद मिळवणाऱ्या उद्धव ठाकरेंचा जीवनप्रवासाबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.
उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आहेतच. पण बाळासाहेबांनी सुरु केलेल्या सामना वृत्तपत्राचे एडिट इन चीफ सुद्धा उद्धव ठाकरे होते. २००२ मधील बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणूकीदरम्यान उद्धव ठाकरे यांना पक्षाचा कॅम्पेन इंचार्ज ही केले होते. या निवडणूकीत शिवसेनेने उत्तम शक्तीप्रदर्शन केले होते आणि त्यानंतर २००३ मध्ये शिवसेनेने उद्धव ठाकरेंना कार्यकारी अध्यक्ष बनवले.
शिवसेना, बंडखोरी आणि सत्ता स्थापन
मात्र २००३ नंतरच्या काही वर्षानंतर सुरुवातीला छगन भुजबळ यांनी शिवसेनेसोबत बंड केले, त्यानंतर २००५ मध्ये नारायण राणे यांनी सुद्धा शिवसेनेसोबत बंडखोरी केली. पण सर्वाधिक मोठा धक्का शिवसेनेला आणि ठाकरे परिवाराला बसला तो म्हणजे २००६ मध्ये जेव्हा राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. कारण त्यावेळी उद्धव ठाकरेंऐवजी लोकप्रिय नेता म्हणून राज ठाकरेंकडे पाहिले जात होते आणि त्यांनाच ठाकरे घरण्याचे राजकीय वारसदार म्हणून मानले जात होते. मात्र तसे झाले नाही आणि राज ठाकरेंनी आपला पक्ष स्थापन केला.
त्यानंतर २०१२ मध्ये बाळासाहेबांचे निधन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना २०१३ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख म्हणून निवडण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखील शिवसेनेने एनडी सोबत राहून २०१४ मध्ये केंद्रात सत्ता मिळवली. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी एनडीए सोबत असलेले जुने संबंध तोडत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत मिळून महाविकास आघाडीची सत्तेचे सरकार महाराष्ट्रात स्थापन केले. त्याचवेळी ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. २०२२ मध्ये पक्षाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी म्हटले होते की, आम्ही भाजपला केंद्रातील सत्ता मिळवण्यासाठी पूर्णपणे मदत केली. आम्हाला हवे होते की, त्यांनी केंद्रात बसावे आणि आम्ही राज्य सांभाळावे. पण आम्हाला धोका मिळाला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यापूर्वी कोणत्याही संविधानिक पदावर नव्हते. परंतु एका लहान राजकीय संकटानंतर २८ नोव्हेंबर २०१९ मध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या १९ व्या मुख्यमंत्री पदी शपथ घेतली.तसेच त्यांना महाविकास आघाडीचे अध्यक्ष म्हणून ही निवडण्यात आले. सर्वात खास गोष्ट अशी की, २०२१ मध्ये म्हणजेच कोरोनाच्या काळात एका सर्वेमध्ये उद्धव ठाकरे यांना देशाच्या १३ राज्यांपैकी सर्वाधिक चर्चेत राहिलेले मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले. सर्वेत सहभागी झालेल्यांनी बहुतांश जणांनी उद्धव ठाकरेंनाच आम्ही पुन्हा एकदा मतदान करु असे म्हटले होते.(Uddhav Thackeray Birthday)
हे देखील वाचा- शाळा बदलण्याचा हट्ट, हौसेखातर केलेलं मॉडेलिंग देवेंद्र फडणवीसांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू

फोटोग्राफीची आवड
उद्धव ठाकरे हे फक्त राजकरणी नव्हे तर उत्तम फोटोग्राफर सुद्धा आहेत. वडिल बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)फोटोग्राफीची अत्यंत आवड आहे. २००४ मध्ये त्यांनी आपल्या कॅमेऱ्यातून टिपलेल्या फोटोंचे प्रदर्शन जहांगीर आ्र्ट गॅलरीमध्ये करण्यात आले होते. त्याचसोबत २०१० मध्ये उद्धव ठाकरे यांनी टिपलेल्या छायाचित्रांचे एक पुस्तक ही आले. त्याला ‘महाराष्ट्र देश’ असे नाव देण्यात आले. तसेच आणखी एक पुस्तक म्हणजे ‘पाहवा विठ्ठल’ त्यामध्ये महाराष्ट्र राज्यासंदर्भातील बहुतांश माहिती दिली आहे. उद्धव ठाकरेंना असलेली फोटोग्राफीची आवड ही बाळासाहेबांमुळेच लागली.

असा हा उद्धव ठाकरेंच्या आयुष्याचा जीवनप्रवास आहेच. पण आता ही उद्धव ठाकरेंच्या समोर फार मोठे आव्हान आहे ते म्हणजे शिवसेनेचे पुन्हा एकदा बळ वाढवणे. कारण एकनाथ शिंदेनीं केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला फार मोठा धक्का बसला आहे. अशातही शिवसेना ही नेहमीच लढा देणार असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या राजकारणातील हालचालींना फार वेग आला आहे. त्याचसोबत आता ते दररोज आपल्या कार्यकर्त्यांना, नेतेमंडळीना भेटण्यासाठी शिवसेना भवनात येतात त्यांच्याशी संवाद साधतात. तर दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे सुद्धा राज्यभरात शिवसेना वाढवण्याचे काम करताना दिसून येत आहेत.