आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक लहान मोठे मात्र अतिशय महत्वपूर्ण सण साजरे केले जातात. हिंदूंचा सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीला ओळखले जाते. दिवाळी नंतर लगेच येणारा तसा छोटा, मात्र अतिशय आकर्षक, वैविध्यपूर्ण सण म्हणजे तुळशी विवाह. या दिवशी तुळशीचे भगवान विष्णूसोबत लग्न लावले जाते. याच तुळशी विवाहानंतर सामान्य लग्न सुरु होतात.
अर्थात चातुर्मासाच्या चार महिन्यांमध्ये हिंदूंमध्ये लग्न केले जात नाही. या काळात लग्न करणे अशुभ समजले जाते. मात्र दिवाळीनंतर तुळशी विवाह झाले की लग्नांना सुरुवात होते. आपल्याकडे साजऱ्या होणाऱ्या या तुळशी विवाहाला देखील मोठे महत्व आहे. नक्की तुळशी विवाह कधी आणि का साजरा केला जातो आणि त्यामागे कोणती कथा आहे जाणून घेऊया.
तुळशी विवाह दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला साजरा केला जातो. हा उत्सव प्रबोधिनी एकादशीपासून सुरू होतो आणि पौर्णिमेच्या रात्री किंवा कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो. या दिवशी भगवान विष्णू आणि माता तुळशीचा विवाह लावला जातो. या दिवसापासून सर्व शुभ कार्ये पुन्हा सुरू होतात.
कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी तिथीला तुळशी विवाह साजरा केला जातो. या दिवसाला देवोत्थान एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. तुळशी मातेचा विवाह शालिग्राम रूपात भगवान विष्णूशी झाला आहे. असे मानले जाते की तुळशीचे लग्न केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. या दिवशी भगवान श्रीहरी आणि तुळशी मातेची विधिवत पूजा केली जाते.
पंचांगानुसार द्वादशी तिथी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ०४ वाजून ०४ मिनिटांनी सुरू होणार असून १३ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ०१ वाजून ०१ मिनिटांनी संपेल. आपण सूर्याने पाहिलेली तिथी ग्राह्य धरत असल्याने यंदा तुळशी विवाह १३ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.
तुळशी विवाह मुहूर्त
लाभ- उन्नती : सकाळी ०६ वाजून ४२ मिनिटांपासून ते ०८ वाजून ०२ मिनिटांपर्यंत.
अमृत – सर्वोत्तम : सकाळी ०८ वाजून ०२ मिनिटांपासून ते ०९ वाजून २३ मिनिटांपर्यंत.
शुभ – उत्तम: सकाळी १० वाजून ४४ मिनिटांपर्यंत ते दुपारी १२ वाजून ०४ मिनिटांपर्यंत.
लाभ – उन्नती : दुपारी ०४ वाजून ०७ मिनिटांपर्यंत ते संध्याकाळी ०५ वाजून २७ मिनिटांपर्यंत.
शुभ – उत्तम: ०७ वाजून ०७ मिनिटांपासून ते ०८ वाजून ४६ मिनिटांपर्यत.
तुळशी विवाहाचे महत्व
एका पौराणिक कथेनुसार, प्रबोधिनी एकादशीला तुळस आणि विष्णूचे प्रतीक असलेल्या शालिग्रामचा विवाह केला जातो. अशी मान्यता आहे की हा विवाह केल्याने भगवान विष्णूची कृपा आपल्यावर सदैव राहते. शिवाय आपल्या जीवनात सुखसमृद्धी येते. सोबतच मान्यतेनुसार, ज्या तरुण तरुणींना लग्नाशी संबंधित समस्या येतात आणि ज्यांना लवकर लग्न करायचे असते त्यांनी तुळशी विवाह विधी नक्कीच साजरा करायला हवा. यामुळे लग्नात येणाऱ्या बाधा दूर होतात.
तुळशी विवाहाचा विधी :
या विवाहाच्या दिवशी तुळशीच्या रोपाला अगदी नव्या नवरीप्रमाणे सजवले जाते. सोबतच रोपाला साडी किंवा ओढणी घातली जाते. या रोपाला विविध शृंगार करून सजवले जाते. या तुळशीच्या विवाहासाठी फुलं, पानं आणि रांगोळी काढून एक छोटासा मंडपही सजवला जातो. याचसोबत विवाहादरम्यान मंडपात ठेवली जाणारी सर्व सामग्रीही ठेवली जाते.
या विवाहामध्ये तुळशीच्या रोपाप्रमाणेच विष्णूदेवाचे प्रतीक म्हणून शालिग्राम ठेवले जाते. त्याच्याद्वारे तुळशीमातेला हार अर्पण केला जातो. यासोबतच विवाहाचे अनेक विधीदेखील केले जातात. याच दरम्यान विविध मंत्रांचा जप करत या दोघांचा विवाह संपन्न केला जातो.
कथा
पौराणिक कथेनुसार, एकेकाळी राक्षसांचा राजा जालंधर याने तिन्ही लोकांमध्ये दहशत निर्माण केली होती. पत्नी वृंदाच्या एकनिष्ठ असल्यामुळे तो अजिंक्य होता. असे म्हणतात की यामुळे भगवान विष्णूने एक युक्ती केली आणि जालंधरचे रूप धारण केले. वृंदाने आपल्या पत्नीशी निष्ठा ठेवण्याचे व्रत मोडले गेले, परिणामी जालंधर भगवान शिवाच्या हातून मारला गेला.
पवित्रतेचे व्रत मोडून आणि अपवित्र झाल्यानंतर, वृंदाने प्राण त्याग केला. त्यानंतर भगवान विष्णूला दगड बनण्याचा शापही दिला. भगवान विष्णूच्या या रूपाला ‘शाळीग्राम’ म्हणतात. वृंदाने प्राण त्याग केलेल्या ठिकाणी तुळशीचे रोप दिसले. भगवान विष्णूंनी वरदान दिले की तुळशीचा विवाह त्यांच्या शालिग्राम रुपाशी होईल आणि तुळशीशिवाय त्यांची पूजा अपूर्ण राहील. तेव्हापासून विष्णूच्या रूपातील शालिग्रामचा विवाह वृंदा म्हणजेच तुळशीशी होतो.