अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या सरकारमधील महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या करत आहेत. ट्रम्प यांनी त्याच नियुक्तीमध्ये राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालकपदाची जबाबदारी तुलसी गबार्ड यांच्याकडे सोपवली आहे. तुलसी हे नाव हिंदू धर्मांमध्ये पवित्र मानण्यात येते. तुलसी यांच्या आई या ख्रिश्चन धर्माचे पालन करणा-या होत्या. इस्कॉन मंदिरामध्ये त्यांचा हिंदू धर्माशी परिचय झाला. हिंदू धर्माबद्दल त्यांना आत्मियता वाटू लागली आणि हे सर्व गबार्ड कुटुंब हिंदू झालं. त्यात तुलसी यांचेही नाव बदलण्यात आले आणि तुलसी गबार्ड ही त्यांची नवी ओळख झाली. तुलसी या भगवान कृष्णाचा परम भक्त असून त्या शुद्ध शाकाहारी आहेत. अमेरिकेतील इस्कॉनच्या मंदिरातील प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. ब-याचवेळी तुलसी यांचा उल्लेख भारतवंशीय असा केला जातो. तुलसी हा उल्लेख आपला बहुमान समजतात. हिंदू धर्माचा अभिमान बाळगणा-या तुलसी गबार्ड यांच्या हाती आता अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाची जबाबदारी आली आहे. अमेरिकेत हे पद महत्त्वाचे मानले जाते. भारताच्या दृष्टीनेही तुलसी यांची या पदावर नियुक्ती होणे महत्त्वाचे मानले गेले आहे. पाकिस्तान, बांगलादेशमध्ये होणा-या हिंदू अल्पसंख्यकांविरोधात तुलसी यांनी अनेकवेळा आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे. अशी रोखठोक भूमिका मांडणा-या तुलसी यांची भूमिका भारतासाठी उपयोगी ठरणार आहे. (Tulsi Gabbard)
20 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेणा-या डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये तुलसी गबार्ड यांचा प्रवेश झाला आहे. यापुढे तुलसी गबार्ड या अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक असणार आहेत. माजी डेमोक्रॅट असलेल्या तुलसी या त्यांच्या रोखठोक मतांसाठी प्रसिद्ध आहेत. डेमोक्रॅटीक पक्षाच्या पाठिराख्या म्हणून ओळखल्या जाणा-या तुलसी या लष्करात तैनात होत्या. त्यांनी 2020 ची राष्ट्रपतीपदाची निवडणुकही लोकशाहीवादी म्हणून लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. 2022 पर्यंत तुलसी या सध्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्या पक्षात होत्या. त्या जो बिडेन यांच्या पाठिराख्या म्हणूनही प्रसिद्ध होत्या. मात्र त्यानंतर तुलसी आणि बिडेन यांचे बिनसले. त्यांनी डेमोक्रॅटीक पक्षाला रामराम करुन डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला आणि ट्रम्प यांच्या कॅम्पेनमध्ये त्या सामिल झाल्या. ट्रम्प यांना त्यांनी प्रचारमोहिमेदरम्यान मार्गदर्शन केल्याची माहिती आहे. तुलसी गबार्ड या कमला हॅरीस यांच्या कट्टर विरोधकही आहेत. कमला यांच्या अनेक धोरणांवर त्या कठोर टिका करतात. कमला यांच्याकडे अमेरिकेतल्या प्रश्नावर ठोस उपाय नसल्याचा आरोप तुलसी यांनी अनेकवेळा जाहीर सभेत केला आहे. (International News)
तुलसी या आता आपल्या पदाचा कार्यभारही 20 जानेवारी 2025 रोजी स्विकारतील. त्या एव्हरिल हेन्सची यांची जागा घेतील. 43 वर्षाच्या तुलसी या अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार ठरल्या आहेत. तुलसी या त्यांच्या लष्करी बाण्यासाठीही प्रसिद्ध आहेत. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी हवाई दलामध्ये कारकीर्द सुरू केली. त्या डेमोक्रॅटिक पक्षाकडून 4 वेळा खासदारही झाल्या आहेत. तुलसी 2016 च्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाकडून अध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या. नंतर त्यांनी हिलरी क्लिंटनऐवजी बर्नी सँडर्सला पाठिंबा दिला. 2020 मध्ये डेमोक्रॅटिक अध्यक्षीय प्राथमिकमध्ये देखील त्यांनी भाग घेतला. नंतर त्यांनी जो बिडेन यांना पाठिंबा दिला. मात्र बराक ओबामा यांच्या हस्तक्षेपाला त्यांचा विरोध होता. तसेच कमला हॅरिस यांना दिलेल्या उमेदवारीलाही त्यांनी विरोध केला. त्यामुळेच त्यांनी आपल्या पक्षाला सोडून रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. (Tulsi Gabbard)
डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या असलेल्या तुलसी यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केल्यावर मोठी खळबळ उडाली होती. तुलसी यांनी पक्ष सोडतांना, डेमोक्रॅटिक पक्ष काही उच्चभ्रू लोकांच्या ताब्यात आहे. या उच्चभ्रूंना युद्ध अधिक हवी आहेत. शिवाय गोऱ्या लोकांना त्यांचा विरोध असून वंशवादाला ते प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे इस्लामिक अतिरेक्यांना अमेरिका खुले दालन झाल्याची कठोर टिका केली होती. राजकारण सोडून तुलसी यांनी फॉक्स न्यूज चॅनलमध्ये प्रवेश केला. तिथल्या अनेक शोमध्ये त्या सह-होस्ट होत्या. 2022 च्या निवडणुकीत तुलसी यांनी अनेक रिपब्लिकन उमेदवारांच्या बाजूने प्रचार केला. तेव्हापासून त्या रिपब्लिकन पक्षात सामील होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात 10 सप्टेंबर रोजी जे वादविवाद झाले होते, त्यासंदर्भात ट्रम्प यांनी तुलसी गबार्ड यांची मदत घेतली होती. (International News)
======
हे देखील वाचा : ट्रम्प यांची महिला आघाडी
====
या वादविवादात कमला हॅरिस यांचा ट्रम्प यांनी पराभव केला होता. नॅशनल गार्ड या अमेरिकन लष्कराच्या शाखेत असतांना तुलसी गबार्ड यांनी इराक आणि कुवेतमध्येही काम केले आहे. तुलसी या हिंदू धर्माचे पालन करतात. त्या शुध्द शाकाहारी आहेत. इस्कॉनच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त वॉशिंग्टन डीसीच्या हिल्टनमध्ये महामंत्राचा जप करतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शिवाय बांगलादेशमध्ये इस्कॉनच्या मंदिरामध्ये जाळपोळ झाल्यावरही त्याचा निषेध करणारा तुलसी यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बांगलादेशात वारंवार होणाऱ्या अत्याचारानंतर 2021 मध्ये तुलसी गबार्ड यांनी हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी अमेरिकन काँग्रेसमध्ये ठरावही मांडला होता. त्यामुळेच तुलसी गबार्ड यांच्या नियुक्ती भारतासाठीही चांगली असल्याचे मत व्यक्त होत आहे. (Tulsi Gabbard)
सई बने