Home » ये है तुलसी अमेरिकाकी !

ये है तुलसी अमेरिकाकी !

by Team Gajawaja
0 comment
Tulsi Gabbard
Share

अमेरिकेमध्ये सध्या निवडणुकांचे वारे आहेत. नोव्हेंबर मध्ये होणा-या या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस हे दोघं अध्यक्षपदासाठी समोरासमोर उभे असतील हे स्पष्ट झालं आहे. अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीयांची मतेही मोठी आहेत. त्यामुळे कमला हॅरिस यांच्या नावाला वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला एक उमेदावर पुढे केला आहे. या आहेत, तुलसी गबार्ड. तुलसी गबार्ड यांनी नुकत्याच एका जाहीर संवादसभेमध्ये कमला हॅरीस यांच्यावर मात केली आहे. त्यात तुलसी हे नाव असल्यामुळे भारतीयांची मते खेचून घेण्यासाठी त्यांची मदत होणार नाही. मात्र तुलसी गबार्ड यांच्याबद्दल मिळालेली माहिती उत्सुकतापूर्ण आहे. अतिशय हुशार असलेल्या या तुलसी गबार्ड यांचा भारताबरोबर कुठलाही नातेसंबंध नाही. मात्र सांस्कृतिक आणि धार्मिकरित्या संबंध आहे.

म्हणजेच, तुलसी यांच्या आईला भारतीय संस्कृतीबद्दल कमालीची आस्था आहे. त्यांनी भारतीय संस्कृती, विशेषतः अध्यात्माचा अभ्यास केला आहे. त्याच दरम्यान त्यांनी आपल्या सर्व मुलांची नावे भारतीयांसारखी ठेवली. तुलशीपत्र हे कृष्णाला प्रिय असते, त्यात त्याचे आरोग्याच्या दृष्टीनेही तुलशीपत्र लाभदायी असते. हेच जाणून त्यांनी आपल्या मुलीचे नाव तुलसी ठेवले. त्याच तुलसी गबार्ट आता अध्यक्षीय निवडणूक लढणा-या डोनाल्ड ट्रम्प यांच्या भरवशाच्या साथीदार आहेत. अमेरिकेच्या निवडणुकीत कमला हॅरिस यांचे पारडे जड होत असतांना डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला एक हक्काचा मोहरा पुढे केला आहे. या आहेत, तुलसी गबार्ड. १२ जानेवारी १९८१ मध्ये अमेरिकेत जन्मलेल्या तुलसी या राजकारणात येण्याआधी युनायटेड स्टेट्स आर्मी रिझर्व्ह अधिकारी आणि राजकीय समालोचक आहे म्हणून ओळखल्या जात होत्या. (Tulsi Gabbard)

वयाच्या २१ व्या वर्षी तुलसी यांची हवाई हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये निवड झाली. दरम्यानच्या काळात तुलसी यांनी हवाई आर्मी नॅशनल गार्डच्या फील्ड मेडिकल युनिटच्या माध्यमातून आपल्या देशासाठी इराकमध्ये काम केले आहे. शिवाय आर्मी मिलिटरी पोलिस प्लाटून लीडर म्हणून त्या कुवेतमध्येही तैनात होत्या. त्यानंतर त्यांनी राजकीय कारर्किदीला सुरुवात केली. २०१६ पर्यंत त्यांनी डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीच्या उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तुलसी या आक्रमक विचारांच्या नेत्या म्हणूनही ओळखल्या गेल्या. त्यांच्या आक्रमक विचारांची पहिली झलक बराक ओबामा यांच्या कार्यकालात पहायला मिळाली. युनायटेड स्टेट्सचा खरा शत्रू कट्टरपंथी इस्लाम किंवा इस्लामिक अतिरेक आहे असे म्हणण्यास नकार दिल्याबद्दल बराक ओबामा प्रशासनावर त्यांनी प्रखर शब्दात टिका केली होती. (Tulsi Gabbard)

अध्यक्षीय पदाच्या निवडणुकीतही त्यांचे नाव काही काळ पुढे होते. पण अमेरिकेच्या अन्य देशातील लष्करी हस्तक्षेपाला त्यांनी विरोध केला. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद यांची त्यांनी भेट घेतली. या वादग्रस्त भुमिकांमुळे तुलसी यांचे नाव मागे पडले आणि जो बिडेन यांचे नाव पुढे झाले. त्यानंतर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देऊन, त्यांच्यासाठी काम करण्यास सुरुवात केली. या सर्वात तुलसी गबार्ड यांच्या भारतीय नावाबद्दल जाणून घेऊयात. तुलसी यांचा जन्म अमेरिकेच्या माओपोटासी काउंटी येथे झाला आहे. त्यांच्या आईचे नाव कॅरोल गबार्ड आणि माईक गबार्ड हे त्यांचे वडिल. पाच मुलांना घेऊन हे गबार्ड कुटुंब हवाई बेटांवार रहायला गेलं. तिथे तुलसी यांच्या आई, कॅरोल गबार्ड यांनी हिंदू धर्माचा अभ्यास केला. तेव्हा हिंदू धर्मापासून प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या सर्व मुलांची नावं हिंदू संस्कृतीप्रमाणे ठेवली. (Tulsi Gabbard)

======

हे देखील वाचा : कमला हॅरिस नेमक्या कोण ?

======

हवाईमध्ये रहात असतांना या कुटुंबानं योगाचाही अभ्यास केला. शिवाय भगवतगीतेचे पाठ त्यांच्याकडे होत असत. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना म्हणजेच इस्कॉन बरोबर हे गबार्ड कुटुंब जोडलं गेलं आहे. तुलसी यांचे वडिल कायम सामाजिक कार्यात पुढे असतात. ११ सप्टेंबरच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्टँड अप फॉर अमेरिका नावाची संस्था स्थापन केली. यात तुलसी काम करीत असत. तुलसी यांनी हवाई पॅसिफिक विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय व्यवसाय प्रशासनातील पदवी प्राप्त केली आहे. तिथून त्या लष्करी सेवेत गेल्या आणि नंतर राजकारणात आल्या. आता त्याच तुलसी गबार्ड या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक मोहीमेचे काम बघत आहेत. अमेरिकेत इस्कॉनला मानणारा मोठा मतदार आहे. त्यांचा तुलसी गबार्ड यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. (Tulsi Gabbard)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.