अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 फेब्रुवारी पासून कॅनडा आणि मेक्सिकोवर 25 टक्के आणि चीनवर 10 टक्के अतिरिक्त कर लादण्याची घोषणा केली आहे. या घोषणानंतर खळबळ उडाली. या तिनही देशांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने ट्रम्प यांच्या कर लादण्याच्या निर्णयाला जागतिक व्यापार संघटनेत आव्हान देण्यात येईल, असे सांगितले. तर मेक्सिकोनेही प्रत्युत्तरात्मक कारवाईची घोषणा केली. वास्तविक या सर्वांमागे ट्रम्पचा उद्देश काय आहे, हे जाणणे जरुरीचे आहे. या सर्वांमागे अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात येणा-या फेंटॅनिल या शक्तिशाली कृत्रिम ओपिओइड औषधाला रोखणे, हा महत्त्वाचा उद्देश ट्रम्प यांचा आहे. अमेरिकेत फेंटॅनिलमुळे दरवर्षी सर्वाधिक मृत्यू होत आहेत. (America)
एका अहवालानुसार कोरोनामुळे अमेरिकेत जी जीवित हानी झाली, त्याहून अधिक मनुष्यहानी या फेंटॅनिलमुळे होत आहे. चीनच्या लॅबमध्ये तयार होणारे हे फेंटॅनिल एकप्रकारचे घातक ड्रग्ज आहे. चरस, गांजा, अफीम, हेरॉइन यांच्यापेक्षा कितीतरी पट घातक असलेल्या या फेंटॅनिलमुळे अमेरिकेतील तरुण पिढीची दुर्दशा होत आहे. चीनमधून या फेंटॅनिलचा पुरवठा मेक्सिकोमध्ये होतो, आणि तिथून हे फेंटॅनिल सहजपणे अमेरिकेत पोहचते. फेंटॅनिलचा हा व्यापार थांबवायचा असेल, आणि अमेरिकेच्या तरुण वर्गाला त्यापासून दूर ठेवायचे असेल तर मेक्सिको आणि चीन या देशातून होणा-या व्यापारावर लगाम लावाली लागेल, हे ट्रम्प जाणून आहेत. त्यातूनच या देशांवरील व्यापारावर अधिक कर लावण्यात आला आहे. (International News)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको, चीन आणि कॅनडावर लावलेल्या कराबाबत गदारोळ उठला. मात्र त्यात फेंटॅनिल या शब्दाकडे दुर्लक्ष झालं. याच फेंटॅनिलमुळे ट्रम्प यांनी चीन आणि मेक्सिकोच्या नाड्या आवळायला सुरुवात केली आहे. मेक्सिकोतील अनेक गुन्हेगारी संघटना या फेंटॅनिलला अमेरिकेत सहजपणे पोहचवत आहेत. प्रयोगशाळांमध्ये तयार होणारे हे फेंटॅनिल एकप्रकारचे सिंथेटिक ड्रग्ज आहे. या फेंटॅनिलचे व्यसन लागले तर अगदी क्वचितपणे त्यापासून सुटका होते. बहुधा फेंटॅनिल घेणा-याचे सर्व अवयव एकापाठोपाठ एक निकामी होत संबंधित व्यक्तिचा अत्यंत वेदनामय मृत्यू येतो. सध्या युरोपमध्ये अशाच फेंटॅनिल घेणा-या वर्गाची संख्या वाढत आहे. हे फेंटॅनिल सर्वाधिक तयार करणारा देश म्हणजे चीन. 2003 पासून फेंटॅनिल चा जगभर पुरवठा चीन करत आहे. या फेंटॅनिलच्या अतिसेवनामुळे मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. यामुळे व्यक्ती कोमात जाते आणि नंतर तिचा मृत्यू होतो. बरं हे फेंटॅनिल किती घातक आहे, हे जाणून घेतलं तर धक्का बसेल. (America)
हेरॉइन घेतल्यामुळे एक ते दहा प्रमाणात शरीराला त्रास होतो. तर फेंटॅनिलमुळे तो त्रास हजार पटीत मोजला जातो. गेल्या काही वर्षात अमेरिकेत तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्याबाबत तपास केल्यावर यामागे फेंटॅनिल असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हापासून तिथे फेंटॅनिलला अटकाव करावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. अलिकडेच, न्यू यॉर्कमध्ये सुमारे 195 पौंड फेंटॅनिल जप्त केले. या फेंटॅनिलमध्ये 32 दशलक्ष लोकांना मारू शकेल इतकी ताकद आहे. त्यावरुनच या ड्रग्जची घातकता स्पष्ट होते. 2016 मध्ये सुमारे 33 हजार लोकांनी फेंटॅनिलमुळे जीव गमवला आहे. आता ही संख्या अधिक झाली आहे. मार्च 2024 मध्ये, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी व्हिएन्ना येथे संयुक्त राष्ट्रांच्या अंमली पदार्थ आयोगाला संबोधित करतांना, अमेरिकेत 18 ते 45 वयोगटातील लोकांच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण सिंथेटिक ड्रग्ज म्हणजेच फेंटॅनिल असल्याचे सांगितले होते. अर्थात फक्त अमेरिकाच नाही, तर युरोपमधील अनेक देश या फेंटॅनिलच्या धोक्याचा सामना करत आहेत. (International News)
==============
हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट
Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
या फेंटॅनिलची निर्मिती चीनमध्ये मोठ्या प्रमाणात होते. तेथील शांघाय आणि वुहान सारख्या शहरात फेंटॅनिल निर्मितीच्या प्रयोगशाळा आहेत. यात घातक रसायनांचा वापर करुन फेंटॅनिलची निर्मिती होते. ही रसायने इतकी प्रभावी आहेत की, एक किलोग्राम रसायनांपासून लाखो गोळ्या बनवता येतात. या गोळ्या मेक्सिकोमधील ड्रग कार्टेल किंवा तस्करी टोळ्यांपर्यंत पोहचतात. या टोळ्या बेकायदेशीर फेंटॅनिल अमेरिकेत पाठवतात. अमेरिकन सीमा सुरक्षा दलाने ही तस्करी थांबवण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत, पण त्यांना अद्यापही पूर्णपणे यश आलेले नाही. गेल्या तीन वर्षांत, अमेरिकेने फेंटॅनिल रोखण्य़ासाठी तब्बल 179 अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. पण त्यातूनही फेंटॅनिलमुळे अमेरिकेत होणारे मृत्यू रोखण्यात यश आलेले नाही. आता या सर्वांच्या मुळावरच घाव घालण्याचे प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केले आहेत. त्यातलाच पहिला भाग म्हणजे, मेक्सिकोवर त्यांनी 25 टक्के अधिक कर लादला आहे. (America)