अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी जंगजंग पछाडले होते. या शांतता नोबेल पुरस्काराची घोषणा होण्याआधीच या पुरस्कारासाठी आपणच सर्वात योग्य उमेदवार असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले होते. मात्र नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना माचाडो यांना मिळाल्यावर ट्रम्प कमालीचे निराश झाले होते. पण याच डोनाल्ड ट्रम्प यांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी करण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे त्यांना इजिप्त आणि इस्रायलकडून त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. गाझापट्टीमध्ये ट्रम्प यांच्या प्रयत्नानं दोन वर्षानंतर शांतता प्रस्थापित होण्याची आशा आहे. शिवाय इस्रायलच्या २० जिवंत ओलिसांचीही सुटका होत आहे. या सर्वात ट्रम्प यांच्या मध्यस्थीचे श्रेय मोठे असल्यानं इस्रायलनं त्यांना मानाचा पुरस्कार जाहीर केला आहे. अर्थात, ट्रम्प यांना नोबेलच्या बदल्यात दोन देशांचे सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळणार आहेत. (Donald Trump)
गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले इस्रायल आणि हमासमधील युद्ध आता थंडावले आहे. इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी व्हावी यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रयत्नशील होते. या युद्धबंदीसाठी त्यांची भूमिकी महत्त्वाची ठरली आहे. यामुळेच इस्रायली अध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करुन सन्मान करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. या घोषणेपाठोपाठ इजिप्तमधूनही अशीच बातमी आली. इजिप्तचे अध्यक्ष अब्देल-फताह अल-सिसी यांच्या कार्यालयाकडून ट्रम्प यांचा विशेष पुरस्कारानं सन्मान करणार असल्याचे जाहीर केले आहे. गाझामधील युद्ध थांबवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी ट्रम्प यांना इजिप्त ‘द ऑर्डर ऑफ द नाईल’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करणार आहे. इस्रायल आणि इजिप्तकडून ट्रम्प यांच्या प्रयत्नांबद्दल गौरवोद्गार काढण्यात आले आहेत. (International News)
इस्रायली राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांच्या कार्यालयाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ट्रम्प यांच्या प्रयत्नांमुळे प्रियजनांना घरी परत आणण्यास मदत झाली आहे. त्यातून मध्यपूर्वेतील शांततापूर्ण भविष्याच्या नवीन युगाचा पाया रचला गेला आहे, या सर्वांसाठी ट्रम्प यांनी केलेली शांतता वार्ता महत्त्वाची ठरली असल्याचे हर्झोग यांनी स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांना प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या काही महिन्यात या पुरस्कार वितरणासाठी इस्रायलतर्फे मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. बहुधा हमासकडून सर्व २० ओलिसांची सुटका झाल्यावर हा कार्यक्रम होईल. इस्रायल भेटीवर गेलेल्या ट्रम्प यांना याची माहिती देण्यात आली असून मध्यपूर्वेतील शांतीचे दूत म्हणून त्यांचा गौरव होत असल्याचे इस्रायलकडून सांगण्यात आले आहे. (Donald Trump)
सध्या इस्रायलमध्ये ओलिसांची सुटका होत असल्यानं आनंदाचे वातावरण आहे. हमासच्या ताब्यात असलेल्या २० पैकी ७ ओलिसांची सुटका झाली असून अन्य ओलिसांची सुटकाही लवकरच होणार आहे. शिवाय २५१ पैकी जे ओलिस हमासच्या ताब्यात मृत पावले आहेत, त्यांच्या अस्थीही इस्रायलमधील त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिल्या जाणार आहेत. या सर्व वाटाघाटी करण्यासाठी ट्रम्प यांची भूमिका महत्त्वाची आहे. इस्रायलच्या पुरस्काराच्या घोषणेमुळे नोबेल हुकल्याची खंत लागलेल्या ट्रम्प यांना थोडा तरी दिलास मिळणार आहे. कारण इस्रायली राष्ट्रपती पुरस्कार हा मानवतेसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. यापूर्वी २१ मार्च २०१३ मध्ये हा पुरस्कार अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनाही प्रदान करण्यात आला होता. (International News)
=======
हे देखील वाचा :
Israel : हमासनं इस्रायली ओलिसांची सुटका केली !
=======
दरम्यान हमास इस्रायली ओलिसांची सुटका करत असतांना स्वतः डोनाल्ड ट्रम्प इस्रायलमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी त्यांना देण्यात येणा-या पुरस्काराची माहिती देण्यात आली आहे. ट्रम्प हे हमासनं ज्यांना ओलिस ठेवले होते, त्यांच्या कटुंबियांची भेट घेणार असून इस्रायली संसदेतही भाषण करतील, अशी माहिती आहे. त्यानंतर, २० देशांचे नेते गाझाचे भविष्य ठरवण्यासाठी इजिप्तमध्ये भेटतील. यात गाझासाठी पुढील रणनीती निश्चित होईल. याचवेळी ट्रम्प यांचा इजिप्तच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मान कऱण्यात येणार आहे. ट्रम्प यांनी ही युद्धबंदी आणि ओलिसांची होणारी सुटका, शिवाय गाझाचा विकास हे ऐतिहासिक शांतीपर्वाची सुरुवात असल्याचे म्हटले आहे. (Donald Trump)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics