अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपद हाती घेतल्यावर आक्रमक भूमिका घेत अनेक निर्णय घेतले आहेत. यामध्ये अमेरिकेशिवाय अन्य देशांमधील संघर्षाबाबतही त्यांनी सल्ला दिला आहे. सध्या अशाच एका सल्ल्यामुळे त्यांच्यावर अरब देशांकडून टिका होत आहे. ट्रम्प यांनी इस्रायल आणि गाझा वादावर एक भलताच उपाय सुचवला आहे. यामुळे इस्रायलमध्ये आनंद व्यक्त झाला आहे, मात्र अरब देशांनी ट्रम्प यांच्या या सूचनेवर प्रचंड टिका करण्यात येत आहे. गाझामधील जवळजवळ सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे आणि लोक तिथे मरत आहेत. अशावेळी संपूर्ण गाझापट्टी खाली करुन तेथील नागरिकांना जॉर्डर, इजिप्त या देशांनी आसरा द्यावा. आणि गाझा संपूर्णपणे इस्रायलनं ताब्यात घ्यावे. यातूनच त्या भागात शांतता येऊ शकते, असे ट्रम्प यांनी सांगतिले आहे. हे फक्त सांगून ट्रम्प शांत बसले नाहीत तर त्यांनी यासंदर्भात जॉर्डनचे राजा अब्दुल्ला यांच्याबरोबर फोनवरुन चर्चाही केली आहे. तसेच इजिप्तच्या राष्ट्रपतींबरोबरही आपण चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (Donald Trump)
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्विकारल्यावर जे काही धडाडीचे निर्णय घेतले आहेत, त्यामध्ये आता गाझा पट्टीतील वादावर त्यांनी दिलेल्या सूचनेचा समावेश झाला आहे. ट्रम्प यांनी संपूर्ण गाझा भाग रिकामा करायला सांगितले आहे. या गाझा मधील जवळपास सर्वच इमारती जमिनदोस्त झाल्या आहेत. सर्वत्र मातीचे ढिग दिसत आहेत. या शहराला पुन्हा बसवायचे असेल तर त्यातील हा मातीचा ढिगारा हलवण्यासाठीही काही वर्ष लागणार आहेत. त्यामुळे येथे रहाणा-या नागरिकांना प्रचंड त्रास होणार आहे. अशा परिस्थितीत या भागात कोणतीही वस्ती होऊ नये असे, ट्रम्प यांना वाटते. त्यांनी येथील नागरिकांनी हा संपूर्ण परिसर खाली करावा असा सल्ला दिला आहे. गाझा मधील जे नागरिक विस्थापित होतील, त्या लोकांना जॉर्डन, इजिप्त आणि इतर अरब देशांमध्ये सामावून घ्यावे असा सल्लाही ट्रम्प यांनी दिला आहे. या युद्धग्रस्त भागातील पॅलेस्टिन नागरिकांना या देशांनी आपल्या देशात सामिल करुन घेतल्यास त्यांच्या पुढील आयुष्याचा प्रश्न सुटणार असल्याचे ट्रम्प यांना वाटते.
अर्थातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्ल्यामुळे इस्रायलनं आनंद व्यक्त केला आहे. ट्रम्प यांनी संपूर्ण गाझापट्टीचा विकास करण्याची जबाबदारी इस्रायलवर सोपवली आहे. त्यासाठी हा भाग त्यांनी आपल्या ताब्यात घ्यावे असेही सुचवले आहे. ट्रम्प यांचा हा सल्ला प्रत्यक्षात आला तर मिडलइस्ट चा संपूर्ण नकाशा बदलणार आहे. पण ट्रम्प यांच्या या सल्यावर अरब देशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सर्वप्रथम हमासनं या सल्ल्याला चांगलाच विरोध केला आहे. युद्ध गुन्हेगारांना पाठिशी घालणारा हा निर्णय असल्याचे हमासनं म्हटलं आहे. पण ट्रम्प यांनी या निषेधाकडे दुर्लक्ष करीत जॉर्डनचे राजे अब्दुल्लाह यांच्याशी संवादही साधला आहे. त्यात त्यांनी गाझा भागाचा विकास करायचा असेल तर तेथील जनतेचे आधी संपूर्णपणे स्थलांतर करणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. गाझामधील जास्तीत जास्त निर्वासितांना जॉर्डननं आसरा द्यावा असेही त्यांनी सांगितले आहे. जॉर्डन शिवाय अन्य अरब राष्ट्रांनीही या गाझा मधील नागरिकांना आपल्याकडे नागरिकत्व द्यावे असे ट्रम्प यांनी सुचवले आहे. (Donald Trump)
गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात 15 महिने चाललेल्या लढाईमुळे 23 लाख लोक विस्थापित झाले आहेत. तर सुमारे 60% इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यांना पुन्हा बांधण्यासाठी दशके लागू शकतात. या भागातील पडलेल्या इमारतींचा नुसता कचराच अन्यत्र हलवायचा झाल्यास त्याला किमान वर्षभराचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर या भागात नव्यानं उभारण्यात येणा-या शहरासाठी आवश्यक निधी आणि अन्य सामग्री उपलब्ध करणं हेही एक आव्हानच असणार आहे. पॅलिस्टिनी नागरिकांनी याबाबत संमिश्र प्रतिक्रीया दिली आहेत. त्यांना आपल्या घरी जायची घाई आहेत, त्यासाठी ते गाझापट्टीच्या सिमेवर जमले आहेत. मात्र जे घर बघण्यासाठी आपण आतुर झालो आहोत, तिथे पक्त सिमेंट, माती आणि दगडांचा ढिग दिसणार आहे, याची आपल्याला खात्री आहे. आमच्या जीवनभराची सर्व कमाई त्या इमारतीसोबत मातीत मिळाल्याची खंत या लोकांनी व्यक्त केली आहे. अशा सर्वस्व गमावलेल्या लोकांना अरब देशांनी सुरक्षित निवारा उभारुन द्यावा असे आवाहन ट्रम्प यांनी केले आहे.
===============
हे देखील वाचा : Prayagraj : मस्क्युलर बाबा आणि एमटेक बाबा
Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
मात्र हमासनं ट्रम्प यांच्या या सूचनेवर टिका करत गाझामधील नागरिक कोणत्याही परिस्थितीत ही भूमी सोडणार नसल्याचे सांगितले आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलशी युद्ध सुरु झाल्यापासून हजारो पॅलेस्टिनी इजिप्तमध्ये पळून गेले आहेत. पण त्यांना त्या देशात निर्वासित म्हणून मान्यता देण्यात आलेली नाही. गाझामधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जॉर्डनमध्येही 20 लाखांहून अधिक पॅलेस्टिननी निर्वासित रहात आहेत. आता त्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव ट्रम्प यांनी पाठवला आहे. पॅलेस्टिनी अध्यक्ष महमूद अब्बास यांनीही याचा निषेध केला आहे. पॅलेस्टिनी लोक त्यांची जमीन आणि पवित्र स्थळे कधीही सोडणार नाहीत, अशा शब्दात त्यांनी ट्रम्प यांचा समाचार घेतला आहे. तर जॉर्डननेही आपल्या देशात अधिक नागरिक सामावून घेण्याची क्षमता नसल्याचे सांगितले आहे. (Donald Trump)
सई बने