Home » Savarkar Tribute: विनायक दामोदर सावरकर – राष्ट्रभक्तीचा त्रयोदशाक्षरी मंत्र

Savarkar Tribute: विनायक दामोदर सावरकर – राष्ट्रभक्तीचा त्रयोदशाक्षरी मंत्र

by Team Gajawaja
0 comment
Share

२६ फेब्रुवारी १९६६ ची ती स्तब्ध संध्याकाळ आजही ६० वर्षांनंतर स्मृतिपटलावरून सरत नाही. माझे वय अगदी लहान होते. मी आईबरोबर आमच्या पुण्यातील प्रसिद्ध शनीपाराजवळ राहणाऱ्या नातेवाईकांकडे जात होतो. डेक्कन जिमखान्यापासून गावात पोहोचेपर्यंत वातावरणातील खिन्नता, आजूबाजूने जाणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरील अतीव दुःखाचे भाव, निःशब्द जनसमुदाय यामुळे काहीतरी विपरीत घडल्याची जाणीव मनाला होत होती. त्यातच घराघरातून ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ ही सागराला घातलेली आर्त साद प्रतिध्वनीत होत होती.

नातेवाईकांकडे पोहोचताच त्यांनी ती बातमी दिली – “सावरकर गेले, ‘क्रांतीसूर्य’ मावळला.” हे सांगताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रूधारांचा पूर वाहत होता. दुसरे काही बोलणेच झाले नाही. हे मी ऐकले आणि माझ्या डोळ्यासमोर स्वातंत्र्यवीरांचा जीवनपट उलगडू लागला; कारण नुकतेच मला शाळेतून बक्षीस म्हणून सावरकरांचे पुस्तकरूपी चरित्र मिळाले होते आणि मी ते अधाशीपणे वाचून काढले होते.

पुढील आयुष्यात स्वातंत्र्यवीरांवर लिहिलेले बरेच साहित्य वाचनात आले. त्यांची ‘माझी जन्मठेप’, ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ वगैरे पुस्तके वाचून झाली आणि सावरकरांच्या अद्भुत चरित्राने मनाचा जो ताबा घेतला, तो आजतागायत कायम आहे.

भगूरसारख्या छोट्या गावात जन्मलेले सावरकर पृथ्वीतलावर अवतरले ते बुद्धिमत्तेचे अलौकिक लेणे घेऊनच. अद्वितीय स्मरणशक्ती व हेवा वाटावी अशी प्रतिभा यांचे वरदान त्यांना लाभले होते. ते मोठ्या बंधूची धर्मपत्नी येसूवाहिनींबरोबर ‘भेंड्या’ लावण्याचा खेळ खेळताना स्वरचित उस्फूर्त संस्कृत श्लोकांचा खजिना उघडत असत. ते जेमतेम १० वर्षांचे असताना त्यांनी एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. परीक्षक होते लोकमान्य टिळक. सावरकरांना पहिले बक्षीस मिळाले. टिळकांना वाटले की एवढे ज्वलंत विचार या बालकाचे असणे शक्य नाही. त्यांनी छोट्या विनायकला विचारले, “बाळ, हे भाषण तुला कोणी लिहून दिले?” त्यावर सावरकरांनी हे विचार स्वतःचे असल्याचे सांगितले, तेव्हा लोकमान्य आश्चर्यचकित झाले.

मातृभूमीला परकीयांच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी “देशाच्या स्वातंत्र्यासाठी मारता मारता मरे तो झुंजेन” अशी प्रतिज्ञा केली. ते केवळ प्रतिज्ञा करून थांबले नाहीत; ती पूर्ण करण्यासाठी बलोपासनेशिवाय पर्याय नाही हे जाणून त्यांनी अवघड डोंगर-दऱ्या पार करण्याचा सराव केला. मनातील भय नाहीसे व्हावे म्हणून ते रात्री स्मशानात जात असत.

पुण्यातील फर्ग्यूसन कॉलेजात असताना त्यांनी परदेशी कपड्यांची होळी केली. (कर्वे रस्त्यावर जिथे ही होळी पेटवली गेली, तेथे आज सावरकरांचे स्मारक उभे आहे.) या कृतीबद्दल त्यांना कॉलेजमधून ‘रस्टिकेट’ करण्यात आले. त्यांना कॉलेजमधून काढून टाकणारे प्राचार्य होते रँग्लर र. पु. परांजपे.

विद्यार्थीदशेतच सावरकरांनी इटलीचा स्वातंत्र्ययोद्धा जोसेफ मॅझिनी याचे चरित्र वाचले आणि त्याचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव पडला.

=======

हे देखील वाचा : Narsimha Dwadashi : नरसिंह द्वादशी का साजरी केली जाते?

=======

कुशाग्र बुद्धीचे सावरकर बॅरिस्टरीसाठी विलायतेला गेले. त्यापूर्वी थोड्याच दिवसांपूर्वी त्यांचा विवाह जव्हार संस्थानचे दिवाणजी चिपळूणकर यांच्या कन्येशी झाला होता. निघण्यापूर्वी त्यांना मुलगा झाला होता. वेळेअभावी ते पत्नीचा यथोचित निरोपही घेऊ शकले नाहीत. निघताना त्यांच्या सुविद्य पत्नी एवढेच म्हणाल्या, “तिकडे खूप थंडी असते, प्रकृतीची काळजी घ्या.” बोटीवरून निघताना घेतलेले मुलाचे दर्शन हे अखेरचे ठरले; कारण ते ब्रिटनमध्ये असतानाच मुलाच्या निधनाची बातमी त्यांना मिळाली.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी वैयक्तिक सुखावर त्यांनी निखारा ठेवला. त्यांनी सोसलेला छळ, कुटुंबाची झालेली वाताहत, मार्सेलीस बंदरातील सुप्रसिद्ध उडी, अंदमानातील नरकयातना – या सर्व घटनांचे वर्णन वाचून अंगावर शहारे येतात.

सावरकरांनी एवढ्या यातना सोसूनही त्यांच्यावर टीका करणारे काही लोक भारतात होते. आचार्य अत्रे पूर्वी कट्टर गांधीवादी होते. एकदा त्यांनी सावरकरांवर अपशब्द वापरले. त्याबद्दल पुण्याच्या स. प. महाविद्यालयात त्यांना मारहाण झाली. त्यावर अत्रे म्हणाले, “मारणारे मेले पण मी जिवंत आहे.” परंतु नंतर तेच अत्रे सावरकरभक्त झाले. ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी अत्र्यांनीच बहाल केली हे अनेकांना माहीत नसेल.

सावरकरांवर आणखी एक आरोप केला जातो की ते मुस्लिमद्वेष्टे होते. पण त्यांच्या ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथात त्यांनी मुस्लिम सेनानींच्या पराक्रमाचे कौतुक केले आहे. ते धर्मांधतेच्या विरोधात होते आणि सक्तीच्या धर्मांतराला त्यांचा प्रखर विरोध होता. अंदमानच्या तुरुंगात त्यांनी अनेक हिंदू कैद्यांचे धर्मांतरण रोखले.

सावरकर नास्तिक होते, हा समज असत्य आहे. ते रूढीवादी नव्हते; ते ज्ञानाबरोबर विज्ञानाचे पूजक होते. गाय ही गोमाता नसून उपयुक्त पशू आहे, ही त्यांची भूमिका होती.

सावरकर व्यवहारी राजकारणी होते. त्यांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषवले. हिंदू समाज एकत्र आल्याशिवाय त्याचे रक्षण होणार नाही हे त्यांनी ओळखले. १९३७ मध्ये सिंधमध्ये हिंदू महासभेला मुस्लिम लीगबरोबर सत्तेत सहभागी व्हावे लागले.

स्वतंत्र भारतातही सावरकरांना कारावास भोगावा लागला. हे दैवदुर्विलास नव्हे काय? ‘माफीवीर’ म्हणून त्यांची अवहेलना केली जाते, तेव्हा वेदना होतात.

सावरकरांचे महिमाकथन कितीही केले तरी अपुरेच वाटेल. मोहनदास गांधी आणि वि. दा. सावरकर हे भारताच्या नभांगणातील दोन अढळ ध्रुवतारे आहेत.

ब्रिटनमध्ये विशाल सागराला ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ अशी साद घालणारे सावरकर आज स्वर्गातूनही ‘ने मजसी ने परत हिंदभूमीला’ अशीच आर्त विनवणी करत असतील, कारण आज त्यांच्या विचारांचा पाईक असलेला एक ‘नरेंद्र’ भारताचे नेतृत्व करत आहे.

सावरकरांच्या साठाव्या पुण्यस्मरणदिनी त्यांना कोटी कोटी प्रणाम.
“अविरत ओठी तुझेच नाम – विनायक दामोदर सावरकर, तुम्हीच महान!”

लेखक :- रघुनंदन भागवत


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.