बिहारची राजधानी पाटणापासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या मुंडेश्वरी मातेचे मंदिर हे भारतातील सर्वाधिक जुन्या मंदिरांपैकी एक आहे. एका छोट्या टेकडीवर 600 फूट उंचीवर असलेले हे मुंडेश्वरी माता मंदिर(Mundeshwari Mata Temple) 5 व्या शतकाच्या आसपास बांधले गेल्याची माहिती आहे. देवीचे हे जागृत स्थान असून देवी भक्तांचे नवस पूर्ण करते अशी धारणा आहे. विशेष म्हणजे देवीला नवस म्हणून बकरे दिले जातात. मात्र या बक-यांचा बळी दिला जात नाही. देवीच्या पायावर बक-यांना ठेवल्यावर काही काळ बकरे बेशुद्ध होतात, मग पुजारी त्यांच्यावर देवीचा आशीर्वाद म्हणून पाणी शिंपडतात. त्यानंतर हे बकरे पुन्हा जागे होतात. अशी सात्विक बलिदानाची परंपरा संपूर्ण भारतात कुठेही नाही. यामंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे पंचमुखी शिवलिंगही आहे. आणि त्याचा रंग सूर्याच्या स्थितीनुसार बदलतो. त्यामुळेच देवीच्या दर्शनासाठी आणि देवीचा चमत्कार बघण्यासाठी या मंदिरात देशभरातून भक्तांची रिघ लागलेली असते. मुंडेश्वरी मातेचे दर्शन घेण्यासाठी श्रीलंकेहूनही भक्त या ठिकाणी येतात.
बिहारच्या मुंडेश्वरी मातेच्या मंदिरात(Mundeshwari Mata Temple) अनोखा यज्ञ करण्यात येतो. आता नवरात्रीच्या दिवसात मातेच्या चरणी हजारो भक्तांचा मेळा भरला आहे. त्यासोबत या भक्तांनी आपला नवस पूर्ण करण्यासाठी बकरेही मोठ्या प्रमाणात आणले आहेत. मात्र येथे कुठल्याही बक-याचे रक्त न सांडता ते देवीपुढे ठेवले जातात आणि मग देवीचा आशीर्वाद मिळालेले बकरे सांभाळले जातात. हे मंदिर त्यामुळेच अनोखे ठरते.
मुंडेश्वरी माता मंदिर(Mundeshwari Mata Temple) हे आपल्या देशातील सर्वांधिक जुन्या मंदिरांच्या यादीत समाविष्ठ आहे. 5 व्या शतकाच्या आसपास बांधलेल्या या मंदिरावर मुघल काळात अनेकदा हल्ले झाले आहेत. 1812 ते 1904 या काळात ब्रिटीश प्रवासी आर.एन. मार्टिन, फ्रान्सिस बुकानन आणि ब्लॉक यांनी या मंदिराला भेट दिली होती. आसपासच्या गुराख्यांनी या मंदिराबाबत माहिती दिली होती. त्यामुळे उत्सुकता म्हणून ब्रिटीशांनी या मंदिराबाबत शोध घेण्याचा प्रयत्न केला. पुरातत्व शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार इसवी सन 389 चा शिलालेखही येथे मिळाला आहे. यावरुन हे मंदिर किती जुने आहे, याचा अंदाज येतो. मुंडेश्वरी माता मंदिरातील कोरीव काम आणि शिल्पे गुप्त काळातील आहेत. संपूर्ण मंदिर दगडी असून अष्टकोनी आहे. मंदिरला चार दरवाजे आहेत. या मंदिरात पंचमुखी शिवलिंगही आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्याच्या स्थितीनुसार शिवलिंगाचा रंग बदलतो. या शिवलिंगासमोरच नंदीची मोठी मूर्ती आहे. मुंडेश्वरी देवीची साडेतीन फूट काळ्या पाषाणाची मूर्ती भव्य आहे. माता वाराही रूपात विराजमान असून तिचे वाहन महिषा आहे. मंदिर परिसरात अनेक शिलालेख सापडले आहेत. मात्र त्यामध्ये मंदिर नेमके कधी उभारले याचा अंदाज येत नाही. मुघलांनी या मंदिरावर अनेकवेळा हल्ला केला. परिणामी मंदिर भग्न झाले होते. नंतर स्थानिकांना मंदिराची डागडुजी केली. या भागात मेंढपाळांचा वावर जास्त आहे. त्यांनीच अनेक वर्ष मंदिराची काळजी घेतली. मेंढपाळांची देवी असल्यानं देवी बक-यांचे रक्त घेत नाही, असे सांगतात. मुंडेश्वरी माता मंदिराबाबत(Mundeshwari Mata Temple) स्थानिक सांगतात की देवी या ठिकाणी चंड-मुंड नावाच्या राक्षसांच्या विनाशासाठी आली. देवीनं चंडचा वध केला. त्यानंतर मुंड देवीसोबत युद्ध करताना या टेकडीवर लपला आणि येथेच देवीने त्याचा वध केला. त्यामुळे स्थानिक लोक देवीला मुंडेश्वरी माता या नावाने ओळखतात.
या मंदिराबाबत सर्वात मोठे आर्श्चय म्हणजे येथील बळी देण्याची अनोखी परंपरा. येथे भाविकांची इच्छा पूर्ण झाल्यावर बकऱ्याचा बळी दिला जातो. पण, माता रक्त घेत नाही. बलिदानाच्या वेळी जेव्हा बकरा आईच्या मूर्तीसमोर आणली जातो तेव्हा पुजारी मूर्तीला स्पर्श केल्यानंतर तांदळाचे दाणे बक-यावर फेकतात. त्यानंतर हा बकरा बेशुद्ध होता. मग पुजारी पुन्हा पुजा करुन त्यावर तांदुळ टाकतात. त्यावेळी हा बकरा शुद्धीत येतो. मग हा बकरा देवीचा आशीर्वाद म्हणून भक्त सांभाळतात. ही अनोखी नवस प्रक्रीया बघण्यासाठीही येथे गर्दी होते. जेव्हा बकरा जागा होतो, तेव्हा भक्त देवीच्या नावाचा जयघोष करतात.
=========
हे देखील वाचा:माता सतीचे शक्तीपीठ असलेले माँ तारापीठ मंदिर…
=========
मुंडेश्वरी माता मंदिर (Mundeshwari Mata Temple)परिसरात अद्यापही अनेक शिलालेख विखुरलेले आहेत. मंदिराच्या टेकडीवर असेल्या शिलालेखात अनेक सिद्ध यंत्रे आणि मंत्र कोरलेले आहेत. शिवाय मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर शिवलिंग आहे. काही शिलालेखात येथे गुरुकुल आश्रम असल्याचा उल्लेख आहे. या टेकडीवर एक गुहा देखील आहे जी सुरक्षिततेसाठी बंद करण्यात आली आहे. या भागात पुरातन नाणीही सापडली असून टेकडीवर तमिळ, सिंहली भाषेत कोरलेले दगडही आहेत. त्यामुळे या मंदिराच्या परिसरात संशोधन व्हावे अशी मागणीही स्थानिक करीत आहेत.सध्या या मंदिरात येण्यासाठी पाटण्याहून एसी बसची व्यवस्था आहे. मात्र मंदिरासंदर्भात आणखी संशोधन झाल्यास मंदिराची प्रसिद्धी होईल. यामुळे याभागात पर्यटनही वाढले आणि विकास होईल, अशी स्थानिकांची मागणी आहे.
सई बने…