हे जग अनेक प्रकारच्या विरोधाभासांनी व्यापून गेलं आहे. जगात असे टॉपचे ५ विरोधाभास (Top 5 Paradoxes) आहेत, जे वाचून तुमचं डोकं चक्रावून जाईल. काही गोष्टी अशा आहेत ज्या विरोधाभासी आहेत, ज्याला तर्कसंगती काहीच नाही. त्या अस्तित्वात आहेत का? आहेत तर कशा आहेत? याबद्दल आपल्याला ठोस असं कारण देणं अवघड आहे. असे निवडक ५ विरोधाभास (Top 5 Paradoxes) आहेत, ज्यांना आपण ‘अमान्य तर्क’ किंवा ‘पॅराडॉक्स’ असंही म्हणू शकतो. कोणते आहेत हे पॅराडॉक्स? चला तर, याबद्दल माहिती घेऊया.
१. पॅराडॉक्स ऑफ द कोर्ट (Paradox of the Court)
‘पॅराडॉक्स ऑफ द कोर्ट’ हा विरोधाभास न्यायपालिकेशी निगडीत आहे. एकदा एका मुलाला वकिलीचं शिक्षण घेऊन वकील बनायच असतं, पण त्याच्याकडे पुरेसे पैसे नसतात. तो एका प्राध्यापकांकडे जातो आणि त्यांना सांगतो की, “मला वकिलीचं शिक्षण द्या. आत्ता माझ्याकडे फीसाठी पैसे नाहीत, पण मी जेव्हा पहिली केस जिंकेन तेव्हा तुमची फी देईल.” प्राध्यापक हो म्हणतात आणि त्याला वकिलीचं शिक्षण देतात. तो परीक्षेत उत्तीर्ण होऊन वकील बनतो. पण तो एकही केस लढवत नाही.
प्राध्यापक त्या मुलाकडे त्यांची फी मागतात. आधी ठरल्यानुसार केस लढवून ती जिंकली तरच तो फी देणार असतो. त्यामुळे तो फी देण्यास नकार देतो. शेवटी प्राध्यापक कोर्टात त्या मुलावर खटला दाखल करतात. प्राध्यापक म्हणतात, “मी ही केस जिंकलो तरीही त्याला मला पैसे द्यावे लागतील आणि मी केस हरलो तरीसुद्धा त्याला मलाच पैसे द्यावे लागतील.”
यावर तो मुलगा म्हणतो की, “मला प्राध्यापकाना पैसे द्यायची गरजच नाही, मी केस जिंकलो तरीही आणि हरलो तरीही कारण मी केस जिंकलो तर, कोर्टाच्या निर्णयानुसार मला पैसे द्यावे लागणार नाहीत आणि हरलो, तर अटीनुसार प्राध्यापक मी जिकंलेल्या पहिल्या केसचेच पैसे घेणार आहेत.” अशाप्रकारे प्राध्यापक आणि मुलगा या दोघांचीही बाजू इथे विरोधाभास निर्माण करते.
२. ओम्निपोटन्स पॅराडॉक्स (Omnipotence Paradox)
ओम्निपोटन्सचा अर्थ होतो सर्वशक्तिमान. यानुसार देव हा सर्वशक्तिमान आहे. देव असा मोठा दगड निर्माण करू शकतो की, तो दगड जगात कोणीच उचलू शकत नाही, खुद्द देव पण नाही. पण इथे आपण म्हणतो आहोत की, देव सर्व शक्तिमान आहे. मग सर्वशक्तिमान असणारा देव दगड उचलू शकत नसेल, तर तो सर्वशक्तिमान कसा?
याउलट जर देवाने असा दगड निर्माण केला की, तो दगड देव उचलू शकतो. म्हणजे देव असा दगड निर्माण करू शकत नाही की, जो कोणीच उचलू शकणार नाही. दोन्ही विधानं परस्परविरोधी आहेत, म्हणजेच विरोधाभासी आहेत. याला ओम्निपोटन्स पॅराडॉक्स असं म्हणतात.
३. ग्रँडफादर पॅराडॉक्स (Grandfather Paradox)
हा विरोधाभास ‘टाइम ट्रॅवल’ या सिद्धांतांशी संबंधित आहे. या विरोधाभासानुसार जर एखादी व्यक्ती टाइम ट्रॅव्हल करून तिच्या आजोबांना भूतकाळात भेटायला गेली आणि स्वतःच्या आजोबांना त्यांच्या लग्नाआधीच मारलं, तर त्या व्यक्तीच्या वडिलांचा जन्म होणारच नाही पर्यायाने त्या व्यक्तीचाही जन्म होणार नाही. परंतु, ती व्यक्ती तर आहे. त्यामुळे हे शक्य नाही. जर त्या व्यक्तीचा जन्मच झाला नाही, तर ती व्यक्ती भूतकाळात जाऊन कोणाला मारू कसं शकते?
४.स्मूलियन पॅराडॉक्स (Smullyan’s Paradox)
हा एक चमत्कारिक विरोधाभास आहे. असं समजूया की A, B आणि C हे तीन मित्र वाळवंटात सहलीला जातात. काही कारणास्तव A आणि B ला C आवडत नाही. आता A आणि B त्यांच्या स्वतंत्र इच्छेनुसार C ला ठार मारण्याची योजना आखतात. A ही व्यक्ती C च्या पाण्याच्या बाटलीत विष घालते. यामुळे फिरताना तहान लागल्यावर विष टाकलेलं पाणी पिऊन C चा मृत्यू होईल. ही A ची योजना B ला माहिती नसते.
B त्याच्यानुसार C ला मारण्याची योजना तयार करतो. यानुसार तो A च्या पाण्याच्या बाटलीला भोक पडतो, जेणेकरून पाणी वाहून, संपून जाईल आणि डिहायड्रेशनने C चा मृत्यू होईल. योजना तयार झाल्यानंतर तिघेही स्वतंत्रपणे आपआपल्या प्रवासाला निघतात. पुढे C चा पाणी न मिळाल्याने मृत्यू होतो. यानंतर पोलिस येतात, पंचनामा करतात आणि चौकशीअंती त्यांच्यासमोर प्रश्न उभा राहतो की या C च्या मृत्यूला जबाबदार कोणाला धरायचं?
आता A म्हणतो C विषयुक्त प्यायलाच नाही, म्हणून मी गुन्हेगार नाही, तर B म्हणतो, भरलेल्या पाण्याच्या बाटलीला भोक पाडून, मी C ला विषयुक्त पाणी पिण्यापासून वाचवलं. पण या सगळ्या खटाटोपीत C चा तर मृत्यू झाला. इथे A आणि B, दोघांनाही C च्या खुनाच्या प्रयत्नासाठी अटक होऊ शकते, पण प्रश्न हा आहे की, खरा गुन्हेगार कोण? हा प्रश्न कायद्यासमोर उभा राहतो आणि इथे विरोधाभास निर्माण होतो.
५. लायर्स पॅराडॉक्स (Liar’s Paradox)
लायर्स पॅराडॉक्स म्हणजे एखादी व्यक्ती म्हणत असेल की, ती नेहमी खोटं बोलते, तर हे वाक्य ती व्यक्ती खरं बोलतेय. त्यामुळे आता ती व्यक्ती खोटं बोलतेय, असं विधान नाही करू शकत. कारण ती व्यक्ती स्वतःच सांगतेय की, “ती नेहमी खोटं बोलते”, पण हे वाक्य तर ती व्यक्ती खरं बोलतेय. याचाच अर्थ ती जे बोलते आहे ते खोटं नाही, अर्थात ती सत्यच बोलते आहे. म्हणजे त्या व्यक्तीच्या बोलण्यात विरोधाभास आहे. याला ‘लायर्स पॅराडॉक्स’ असं म्हटलं जातं .
हे देखील वाचा: भारतातील ‘या’ ५ मंदिरांमध्ये पुरुषांना प्रवेश नाही (Men are not allowed)
हिंदू धर्मात मृत्यूपश्चात लहान मुलांना अग्नी न देता दफन का करतात?
तर, असे हे पाच विरोधाभास (Top 5 Paradoxes) आहेत. ज्याच्याबद्दल तर्क लावणं हे केवळ कठीण काम आहे. माणसाने या पाच गोष्टींबद्दल विचार केला तरीसुद्धा त्याचं डोकं चक्रावून जाईल. त्याचं मन बुचकळ्यात पडेल आणि त्याची बुद्धी काम करेनाशी होईल. आहेत की नाही हे विरोधाभास विचार करायला लावणारे…!
– निखिल कासखेडीकर