Home » महासत्तेला आव्हान देण्यासाठी चीन – रशियाची पूर्वतयारी?

महासत्तेला आव्हान देण्यासाठी चीन – रशियाची पूर्वतयारी?

by Team Gajawaja
0 comment
Tongjiang-Nizhneleninskoye railway bridge
Share

चीन आणि रशिया यांच्या परस्पर संबंधांमध्ये अनेक वेळा उतार चढाव आले आहेत. १९४९ साली पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची स्थापना झाल्यानंतर चीनने आपला दूसरा साम्यवादी भाऊ असलेल्या सोव्हिएत रशियाबरोबर चांगले संबंध प्रस्थापित केले. याचं कारण दोन्हीही देशांमध्ये साम्यवादी राजकीय व्यवस्था हा समान दुवा होता. कालांतराने चीन आणि रशियाने आपले संबंध घट्ट केले. (Tongjiang-Nizhneleninskoye railway bridge)

चीन आणि रशिया यांनी व्यापार वाढावा या उद्देशाने पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर दिला आहे आणि याचाच एक भाग म्हणून चीन आणि रशियाने ‘अमुर’ नदीवर मिळून बांधलेला पूल होय. अर्थात चीन रशिया यांच्यामधले संबंध हे कायमच मैत्रीचे राहिलेले नाहीत. तसे दोन्हीही देश सख्खे शेजारी. मग दोघांनीही सिनो – सोव्हिएत मैत्रीचा आणि मदतीचा करार ५० च्या दशकात केला. हे शीतयुद्ध सुरू होण्याचे दिवस होते. जरी चीनने सोव्हिएत रशियाबरोबर संबंध चांगले ठेवायचा प्रयत्न केला असला तरीसुद्धा दोघांमध्ये प्रचंड वैचारिक मतभेद झाले. 

याच काळात रशियाची सत्ता निकिता कृशचेव्ह यांच्याकडे आली. परिस्थिति इथपर्यंत आली की १९६९ मध्ये झेंबाओ बेटावर दोन्ही देशांदरम्यान सैनिकी संघर्ष झाला. माओ झेडोंग यांनी रशियाचा धोका असल्याचं बघून अमेरिकेबरोबर संबंध नेहमीसारखे पूर्ववत केले. चीन आणि रशिया दरम्यान संबंध हे १९८० पर्यंत ताणलेलेच राहिले. दरम्यान चीनने आपले धोरण बदलले आणि सर्वसमावेशक असे धोरण समोर ठेवून परत सोव्हिएत रशियाबरोबर सुर जुळवले. 

हा बदल झाला तो डेंग शिओपिंग यांच्या कार्यकाळात. इकडे मिखाईल गोर्बाचोव्ह यांनी चीनला अधिकृत भेट दिली. या दोन्ही देशांमध्ये जे संबंध १९५० पासून ताणले गेले होते ते आता सुधारून एका नवीन युगाकडे वाटचाल करणार होते. याच वेळेस चीनचा साम्यवादी पक्ष आणि रशियाचा साम्यवादी पक्ष यांच्यामध्येही चर्चा झाली. म्हणजे सरकारी स्तरावर आणि दोन्ही देशांच्या पक्षातल्या चर्चेअंती संबंध प्रस्थापित करण्याचे ठरवले गेले. 

१९९६ ला चीन आणि रशिया यांच्यामध्ये मंत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होण्यासाठी करार करण्यात आले. हा करार भू-राजकीय स्तरावर संबंध चांगले होण्यासाठी करण्यात आला. पुढे चीनने शांघाय को- ऑपरेशन ऑर्गनायझेशन या संस्थेची निर्मिती केली. यात रशिया संकट मध्य आशियाई देश होते. 

२००४ ला चीनने रशियाबरोबर सीमा ठरवण्यावरून सुरू असलेल्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे जाहीर केले. २०१० पर्यंतच्या काळात रशियाची चीनच्या सैनिकी क्षेत्रातली निर्यात ही २५८ टक्क्यानी वाढली. आता चीनसाठी रशिया हा शस्त्रास्त्र पुरवठा करणारा एक प्रमुख देश बनला होता. चीन रशियासाठी महत्वाचा देश होता आणि रशियाला चीन हवा होता. याचं कारण म्हणजे दोघांचा समान शत्रू असलेला देश म्हणजे अमेरिका.

अमेरिकेला बाजूला ठेवून पुढे मार्गक्रमण करण्यासाठी आणि एक महासत्ता होण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे. रशियाचीसुद्धा तीच गोष्ट आहे. काहीही करून अमेरिकेला विरोध करून अमेरिकेची महासत्ता म्हणून सद्दी संपवावी या विचारावर चीन आणि रशिया यांचं एकमत आहे.

एक महत्वाची गोष्ट इथे नमूद करण आवश्यक आहे. रशियाने २०१४ ला पहिल्यांदा क्रायमिया वर आक्रमण केलं तेव्हासुद्धा चीनने रशियाच्या या कृतीला विरोध दर्शवला नाही. तसंच फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं त्याचासुद्धा चीनने विरोध केला नाही. यावरून हे दिसून येत की, हे दोन देश परस्परांसाठी किती महत्वाचे आहेत. 

=====

हे देखील वाचा – जेव्हा लोकांनी Egyptian Mummies खायला सुरुवात केली, नेमके काय घडले असेल?

=====

अमेरिका आणि समस्त पाश्चिमात्य जग हे चीन आणि रशियाच्या विरोधात आहे. जणू काही हे शत्रूच आहेत अशापद्धतीने चीन आणि रशियाची वाटचाल सुरू आहे. अमेरिका आणि रशियामध्ये विसाव्या शतकात चाललेल्या शीतयुद्धाची पार्श्वभूमीही याला कारणीभूत आहे. 

परत मूळ मुद्याकडे यायचं म्हणजे चीन आणि रशिया यांच्यामध्ये आत्ता अभेद्य युती झाली आहे. ‘अमुर’ नदीवर या दोन्ही देशाना जोडणारा साधारणतः एक किलोमीटर लांबीचा पूल बांधला आहे (Tongjiang-Nizhneleninskoye railway bridge). त्याचं नुकतच उद्घाटन झालं. हा पूल २०१९ लाच बांधून तयार झाला होता. पण कोविड काळात याचं उद्घाटन मागे पडलं. या पुलावर दोन लेन आहेत. हा पूल बांधण्यासाठी ३२८ मिलियन डॉलर्स इतका खर्च आला आहे. 

या पुलाचा मुख्य उद्देश म्हणजे चीन आणि रशिया यांच्यामध्ये व्यापार वृद्धिंगत होणं हा आहे. मालाची ने आण करण्यासाठी रस्ता प्रामुख्याने वापरला जाणार आहे. रशियातलं ‘ब्लागोवेशचेनस्क’ आणि चीनमधलं ‘हायहे’ ही दोन शहरं या पूलामुळे जोडली जाणार आहेत. (Tongjiang-Nizhneleninskoye railway bridge)

अमेरिकेला शह देण्याच्या उद्देशाने चीन आणि रशिया सतत प्रयत्नशील आहेत आणि याचंच उदाहरण म्हणजे व्यापार वाढीसाठी रशिया आणि चीन यांनी मिळून बांधलेला पूल. येणाऱ्या काळात या पुलामुळे चीन आणि रशिया यांच्यामधल्या व्यापाराला अधिक चालना मिळेल आणि दोन्ही देश अजून एक परस्पर संबंधात मैलाचा दगड पार करतील, असं चित्र आज उभं राहतं आहे. (Tongjiang-Nizhneleninskoye railway bridge)

चीनने भारताबरोबर असलेल्या त्यांच्या सीमावादावर अजूनही तोडगा काढला नाही, पण रशियाबरोबर त्यांनी सीमा प्रश्न सोडवला आहे हा मुद्दा इथे ठळकपणाने जाणवतो.   

-निखिल कासखेडीकर


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.