सध्या भारतासह जगातील सर्व देशांसमोर कोरोना महामारी हे मोठे आव्हान आहे. ओमिक्रॉन प्रकाराची संसर्गक्षमता आणि त्याचा वाढता जागतिक प्रसार पाहता, लोकांना या संसर्गाविरूद्ध प्रतिबंधात्मक उपाय करणे सुरू ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. भारताबद्दल बोलायचे झाले, तर येथील परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. अनेक राज्यांमध्ये संसर्गाच्या प्रकरणांमध्ये दररोज वाढ होत आहे.(Tomato Flu)
केरळ हे कोरोनाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या राज्यांपैकी एक आहे. केरळमध्ये कोविड-१९च्या आजारावर नियंत्रण आणण्यात आरोग्य विभाग मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरले असेल, परंतु इतर रोगजनकांमुळे होणारे संसर्गजन्य रोग राज्याच्या आरोग्य यंत्रणेला त्रास देत आहेत.
कोरोना संसर्गाचा कहर सुरू असतानाच, राज्यात आणखी एका प्रकारचा संसर्ग वाढल्याचे समोर आले आहे. अनेक रुग्णालयांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये टोमॅटो फ्लू(Tomato Flu) नावाचा दुर्मिळ विषाणूजन्य आजार वेगाने वाढत आहे. राज्यात आतापर्यंत याच्या १४६ प्रकरणांची पुष्टी झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी दक्षिण कोल्लम जिल्ह्यातील काही भागात सुरू झालेल्या टोमॅटो फ्लूचा प्रादुर्भाव आता कर्नाटक आणि तामिळनाडूमध्येही वाढत आहे. चला जाणून घेऊया की, हा टोमॅटो फ्लू(Tomato Flu) कोणत्या प्रकारचा संसर्ग आहे, तसेच याने कोणत्या प्रकारचे धोके निर्माण होऊ शकतात.
=====
हे देखील वाचा – उन्हाळ्यामध्ये ‘स्टमक फ्लू’पासून स्वतःला जपा, जाणून घ्या लक्षणे आणि उपचार
=====
टोमॅटो फ्लू म्हणजे काय?
वैद्यकीय अहवालानुसार, या व्हायरल इन्फेक्शनमध्ये शरीरावर लाल रंगाचे फोड तयार होऊ लागतात, त्यामुळे त्याला टोमॅटो फ्लू(Tomato Flu) असे नाव देण्यात आले आहे. हा एक दुर्मिळ विषाणूजन्य रोग आहे, जो आतड्यांवर हल्ला करणाऱ्या शिगेला बॅक्टेरियामुळे होतो. या संसर्गाची प्रकरणे सामान्यतः पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये आढळतात. यामध्ये बाधित व्यक्तीच्या शरीरावर फोड येण्याबरोबरच, तीव्र ताप आणि शरीरात तीव्र वेदना होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
टोमॅटो फ्लूची लक्षणे काय आहेत?
टोमॅटो फ्लूला टोमॅटो फिव्हर असेही म्हणतात. सर्वसाधारणपणे, यामुळे संक्रमित लोकांच्या त्वचेवर पुरळ उठणे, त्वचेची जळजळ आणि डिहायड्रेशन यासारख्या समस्या उद्भवू शकतात. काही अहवालांनुसार, फ्लूमुळे थकवा, सांधेदुखी, पोटदुखी, मळमळ, उलट्या, जुलाब, खोकला, शिंका येणे, नाक वाहणे, खूप ताप आणि अंगदुखी होऊ शकते. त्याच वेळी, काही प्रकरणांमध्ये, पाय आणि हातांच्या रंगात बदल देखील दिसून येत आहे.
टोमॅटो फ्लू कसा होतो?
मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार, बहुतेक बाधितांनी अगोदर अन्नातून विषबाधा झाल्याची तक्रार केली होती. आरोग्य विभागाने लोकांना पाणी आणि अन्नाच्या स्वच्छतेबाबत विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. न धुतलेली फळे आणि भाज्या खाल्ल्याने हा संसर्ग होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. अशावेळी शिगेला बॅक्टेरिया होण्याची शक्यता जास्त असते.
टोमॅटो फ्लूचा उपचार काय आहे?
केरळच्या डॉक्टरांच्या मते, इतर प्रकारच्या फ्लूप्रमाणेच टोमॅटो फ्लू(Tomato Flu) देखील संसर्गजन्य आहे. ज्या लोकांना संसर्गाची पुष्टी झाली आहे, त्यांना वेगळे केले पाहिजे. कारण हा रोग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत वेगाने पसरू शकतो.
बाधितांनी योग्य विश्रांती आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. काही काळानंतर संसर्ग स्वतःच दूर होतो. मात्र या काळात द्रवपदार्थांचे सेवन करून डिहायड्रेशनची समस्या दूर ठेवणे खूप महत्वाचे आहे.