1 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय वीगन डे (Vegan Day) म्हणून साजरा करण्यात येतो. हे वीगन म्हणजे काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. वीगन म्हणजे जे शाकाहरी खाण्याचा पुरस्कार करतात ती मंडळी. पण इथपर्यंतच हा अर्थ मर्यादीत नाही. वीगन मंडळी शाकाहाराचा पुरस्कार करतांना दूध आणि दुग्दजन्य पदार्थही व्यर्ज करतात. काही मंडळी तर वीगन आहाराचे नैतिक शाकाहार असेही वर्णन करतात. शाकाहारी खाण्याच्याही पुढचा टप्पा या वीगन जीवनशैलीचा आहे. आपल्या देशातही ही वीगन जीवनशैली वेगानं वाढत आहे. क्रिकेटपट्टू विराट कोहली आणि राजकीय नेत्या मनेका गांधीही वीगन जीवनशैलीसोबत जोडल्या गेल्या आहेत. हे वीगन अन्नपदार्थ म्हणजे नेमकं काय हे नक्की जाणून घेण्यासारखं आहे.
वीगन डे (Vegan Day) ची सुरुवात इंग्लंडमध्ये 1994 मध्ये झाली. प्राणी हक्क कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध असणारे लुईस वॉलिस यांनी शाकाहारी समाजाच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त 1 नोव्हेंबर पासून वीगन डे साजरा करण्याची घोषणा केली. लोकांना शाकाहारी जीवनशैली स्विकारण्यासाठी प्रेरीत करण्याचे काम करण्यासाठी त्यांनी या दिवसाला वीगन डे (Vegan Day) म्हणून जाहीर केले. शाकाहारी पदार्थांमध्ये त्यांनी दुधाला स्थान दिले नाही. काहीठिकाणी अंडीही शाकाहारी आहाराचा भाग असतो. पण या लुईल वॉलिस यांनी दुध आणि अंड्यांनाही शाकाहारात स्थान न देता वीगन हा शब्द आपल्या विशिष्ट जीवनशैलीसाठी रुढ केला. आणि तिथूनच पुढे वीगन डे साजरा होऊ लागला.
Vegan किंवा वीगन म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया. वीगन मंडळीही शाकाहारीच असतात. पण शाकाहरी मंडळी दूधाचा आहारात समावेश करतात. मात्र वीगन मंडळी दूधही आपल्या आहारात घेत नाहीत. त्यांच्या मते कोणत्याही प्राण्याला त्रास देऊन त्यापासून घेतलेले अन्न हे मांसाहारी प्रकारातच मोजले जाते. त्यामुळे दुधाचा वापर वीगन करत नाहीत. त्यामुळे दुधापासून तयार झालेले ताक, दही, मिठाई, पनीर आदी पदार्थही वीगन मंडळी व्यर्ज करतात. मात्र दुध आहारातील प्रमुख घटक आहे. यामुळे शरीराला आवश्यक अशी उर्जा पुरवली जाते. शरीरातील हाडांच्या मजबुतीसाठीही दुधाची गरज असते. पण वीगन मंडळी दुध घेत नसल्यामुळे सोयापासून तयार केलेल्या दुधाचा वापर केला जातो. तसेच सोयाबीनपासून तयार झालेले टोफू, पनीरऐवजी वापरले जाते.
1 नोव्हेंबर रोजी आता जगभरात हा वीगन डे (Vegan Day) साजरा केला जातो. याबरोबरच शाकाहाराचे महत्त्व काय याचेही फायदे समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. शाकाहार हा आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर आहार असल्याचे मानले जाते. मात्र सर्वांनाच हा शाकाहार आवडत नाही. त्यांच्या आहारात मांसाहारी पदार्थांचाही समावेश असतो. काहीवेळा डॉक्टरही शरीराला आवश्यक अशा पोषक तत्त्वांसाठी मांसाहार करण्याचा सल्ला देतात. मात्र वीगन मंडळी या सर्वाला विरोध करतात. शाकाहारी पदार्थ हे सर्वार्थांनं परिपूर्ण असतात असा त्यांचा दावा आहे.
प्रोटीनसाठी बीन्स, छोले, सोय, टोफू यांचा समावेश ही वीगन मंडळी करतात. ज्यात दूधाचा वापर केला नाही असा ब्रेड, पास्ता, आणि लाल तांदळांचाही समावेश केला जातो. वीगन मंडळींचा डायटचा वेगळा तक्काच आहे. फळांमध्ये स्टॉबेरी, संत्रे, द्राक्ष, सफरचंद, किवी, टरबूज, बेरी, यांचा समावेश करतात. तर हिरव्या भाज्यंमध्ये पालक हा मुख्य घटक असतो. त्यासोबत कोबी, मटार, तोंडली, दुधी, शिमला मिर्ची, टोमॅटो, बटाचे, गाजर, कांदा आदींचाही समावेश आहारात करता येऊ शकतो. वीगन आहारात सर्वात मोठी अडचण होते ती दुधाची. कारण वीगन आहारात दुध हे मासांहारी अन्न म्हणून ठरवले आहे. दुधच व्यर्ज असल्यामुळे ताक आणि दही, पनीर यांनाही टाळले जाते. त्याऐवजी सोया दुध हा सर्वाधिक लोकप्रिय घटक आहे. यासोबत ज्यांना शक्य असेल ती मंडळी अक्रोड किंवा बदामाच्या दुधाचाही वापर करतात. काहीवेळा नारळाच्या खोब-यात गरम पाणी टाकून त्यापासून तयार झालेले दुधही आहारात घेतले जाते. आणि पनीरच्या जागी सोयाटोफू हा चांगला पर्याय वीगन मंडळींसाठी उपलब्ध आहे.
===========
हे देखील वाचा : संध्याकाळच्या वेळेस दही खात असाल तर आधी हे वाचा
===========
फक्त आहाराच्या बाबतीत वीगन मंडळी नियम पाळत नाहीत तर त्यांच्या दैनंदिन आयुष्यातही प्राण्यांपासून बनवलेल्या वस्तूंचा वापर ते टाळतात. त्यामुळे लेदरच्या बॅग, पट्टे, लोकर आदी वस्तूंही वीगन मंडळी वापरत नाहीत. त्यामुळेच वीगन आहाराला नैतिक शाकाहार असाही शब्द रुढ झाला आहे. ही मंडळी अंडी, मांस, मध, चामड्याचे कपडे, शूज, बेल्ट, पिशव्या, प्राण्यांचा अंश वापरुन तयार केलेली सौंदर्यप्रसाधने , औषधे, हस्तिदंताचे दागिने, मोराची पिसे, सिंहाची नख आदीं सर्वांचाच त्याग करतात.
जगभरात ही वीगन जीवनशैली वाढत आहे. भारतात राजकीय नेत्या मनेका गांधी, अभिनेता आमिर खान, ईशा गुप्ता, आलिया भट्ट, जॉन अब्राहम, आर. माधवन, किरण राव, क्रिकेटपट्टू विराट कोहली, आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांचाही समावेश वीगन कम्युनिटीमध्ये आहे. शाकाहाराच्या पुढचे पाऊल म्हणून वीगन जीवनशैलीकडे बघितले जाते. अर्थात कुठलिही जीवनशैली ही माणसाच्या आरोग्यासाठी पुरक असेल तर त्याचा स्विकार लवकर केला जातो. या वीगन जीवनशैलीबाबतही असेच झाले आहे. काही वर्षापूर्वी वीगन म्हणून ज्यांची टिंगलटवाळी करण्यात येत होती, त्याच वीगन जीवनशैलीचा आता स्विकार अनेक मान्यवर करत आहेत. इंग्लड, अमेरिकेमध्ये 1 नोव्हेंबरला वीगन डे निमित्त खाद्यपदार्थांचा फेस्टीवल होतो. भारतातही पुढच्या वर्षात असे फेस्टिवल या दिवशी नक्की होतील.
सई बने