फॅशन ही अशी गोष्ट आहे, जी ठराविक काळानुसार सतत बदलत असते. बदलते म्हणजे नक्की काय होते. जुनीच फॅशन थोड्याफार फरकाने पुन्हा येते. मग फॅशन कशात असते? तर फॅशन फक्त कपड्यांची असते असे नाही. तर फॅशन ही साडी, ब्लाऊज, ड्रेस यासोबतच दागिने, चप्पल, विविध प्रकारच्या ऍक्सेसरीज, हेयर स्टाईल आदी सर्वच गोष्टींमध्ये पाहायला मिळते.
आपल्या कपड्यांनुसार आपण त्यावर कोणते दागिने घालायचे हे ठरवतो. उदाहरण दयायचे झाले तर पारंपरिक कपड्यांवर आपण मोती किंवा सोन्याचे दागिने घालतो. तर इंडो वेस्टर्नमध्ये ऑक्सिडाइज ज्वेलरी घालण्याची मोठी फॅशन सध्या जोरदार चालू आहे. एवढेच नाही तर खणाच्या साड्यांवर देखील हीच ऑक्सिडाइज ज्वेलरी घातली जात आहे. या ज्वेलरीची एक वेगळीच क्रेझ आणि आकर्षण मुलींमध्ये आणि महिलांमध्ये पाहायला मिळते.
काळपट आणि सिल्वर रंगाची ही ज्वेलरी अतिशय सुंदर असते. बजेटमध्ये येणाऱ्या या ज्वेलरीच्या सर्वच स्त्रिया प्रेमात आहे. मात्र कधी कधी ऑक्सिडाइज ज्वेलरी घेतल्यानंतर काही काळातच ती अधिक काळी पडते. तिची चकाकी निघून जाते. मग अशावेळेस या दागिन्यांची काळजी कशी घ्यावी. हे आपण या लेखातून जाणून घेऊया.
दागिने हा प्रत्येक स्त्रीचा अतिशय संवेदनशील विषय असून तिचा वीक पॉइंट देखील आहे. अगदी लहान मुलींपासून ते मोठ्यां वयस्कर स्त्रियांपर्यंत सर्वच स्त्रिया कमी अधिक प्रमाणात रोज काहींना काही दागिने घालत असतात. त्यातही ऑक्सिडाइज ज्वेलरी ही आजकाल महिलांची पहिली पसंती आहे. स्त्रिया कोणत्याही प्रसंगी कोणत्याही ड्रेसवर अगदी सहज मॅच करू शकतात अशी ही ज्वेलरी आहे.
ऑक्सिडाइज ज्वेलरीमध्ये सर्वच प्रकारचे दागिने अनेक वेगवेगळ्या डिझाइन्समध्ये असतात जे महिलांच्या सौंदर्यात भर घालतात. ऑक्सिडाइज्ड दागिन्यांना थोडी काळजी आवश्यकता असते. या दागिण्याची योग्य देखभाल करणे देखील महत्वाचे आहे. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी कशी ठेवली पाहिजे जेणेकरून ती नव्यासारखी दिसू शकते यासाठी काही टिप्स आपण जाणून घेऊया.
बेकिंग सोड्याने स्वच्छ करा
ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी स्वच्छ करणे खूप गरजेचे असते. त्यासाठी बेकिंग सोडा वापरू शकता. एका भांड्यात थोडे गरम पाणी घेऊन त्यात १ टेबलस्पून बेकिंग सोडा टाकायचा आणि चांगले मिक्स करून त्यात हे दागिने ५ मिनिटे ठेवा. नंतर घासून स्वच्छ करा. या सोबतच एका भांड्यात ज्वेलरी घेऊन त्यावर व्हीनेगर टाकून व्यवस्थित घासायचे आणि १५ मिनिटांसाठी ही ज्वेलरी तशीच ठेवायची. नंतर पाण्याने धुवून कोरडी कार्याची. यामुळे ऑक्सिडाइज ज्वेलरी चकाकेल.
परफ्यूमपासून दूर ठेवा
ऑक्सिडाइज्ड दागिने घालताना त्यामध्ये परफ्यूम किंवा इतर दुर्गंधी येत नसल्याची खात्री करून घ्या. यामुळे दागिन्यांचे नुकसान होऊ शकते कारण यामुळे दागिन्यांमध्ये ओलावा वाढतो. ही ज्वेलरी घालण्यापूर्वी परफ्यूम किंवा डिओडोरंट लावा आणि २ मिनिटांनी दागिने घाला.
मऊ कापडाने स्वच्छ करा
दागिने वापरून झाल्यानंतर ते मऊ कापडाने स्वच्छ करा. यामुळे दागिने घाण होण्यापासून वाचतील आणि दीर्घकाळ टिकतील. कोरडी टूथ पावडर आणि मऊ कापड वापरून हे दागिने हलक्या हाताने स्वच्छ करा.
आर्द्रतेपासून दूर ठेवा
ऑक्सिडाइज्ड दागिने नेहमी आर्द्रतेपासून दूर ठेवावे जेणेकरून ते खराब होणार नाहीत. ते फक्त झिप लॉक प्लास्टिकच्या पाऊचमध्ये ठेवा. पाऊचमध्ये कोणत्याही प्रकारचे छिद्र नसावे हे लक्षात ठेवा. हवेच्या संपर्कात आल्याने हे ऑक्सिडाइज्ड खराब होऊन त्यांचा रंग देखील बदलतो.
ओलाव्यापासून दूर ठेवा
ऑक्सिडाइज्ड दागिने कधीही ओलावामध्ये ठेवू नका. या प्रकारचे दागिने थोड्याशा ओलावामध्ये खराब होऊ लागतात आणि त्याची चमकही निघून जाते. ऑक्सिडाइज ज्वेलरीचा संपूर्ण सेट स्टोअर करायचा असेल तर, तर कानातले एका वेगळ्या पिशवीत आणि नेकलेस एका वेगळ्या पिशवीत ठेवा. या पिशव्या एका एअर टाइट बॉक्समध्ये ठेवा. यामुळे दागिने बराच काळ सुरक्षित राहतात.