Home » Tihar Jail : अफवांमुळे बायका मुलं जन्माला घालण्यासाठी जेलमध्ये जात होत्या

Tihar Jail : अफवांमुळे बायका मुलं जन्माला घालण्यासाठी जेलमध्ये जात होत्या

by Team Gajawaja
0 comment
Tihar Jail
Share

चोर, खूनी, हत्यारे, बलात्कारी असं सर्व प्रकारचे गुन्हेगार हे ज्या ठिकाणी सर्व एकत्र येतात जिथे त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देण्यासाठी पाठवलं जातं, ते म्हणजे जेल. पण त्या जेलमध्ये जाऊन हे गुन्हेगार सुधारतात का? खरंतर, जेल म्हणजे एक वेगळीच दुनिया आहे. ज्यामध्ये जे काही घडतं, ते आपल्यासाठी एक रहस्यच आहे. असंच भारताचं सर्वात प्रसिद्ध जेल म्हणजे तिहार जेल. या जेलला ३१ वर्ष सांभाळणाऱ्या सुनील गुप्ता यांच्या आयुष्यावर सध्या एक वेब सिरीज आलीये. ‘ब्लॅक वॉरेंट’ जी सध्या चर्चेचा विषय आहे. सुनील गुप्ता (Sunil Gupta) यांनी भारताच्या सर्वात कुख्यात तिहार जेल मध्ये, जेलर म्हणून काम कसं केलं? तिहार जेलमध्ये कैद्यांची दुनिया कशी असते? आणि तिहार जेलचे किस्से, जाणून घेऊ.(Tihar Jail)

सुनील गुप्ता (Sunil Gupta) यांचा तिहार जेलमध्ये नोकरीचा प्रवास सुरू झाला १९८१ मध्ये, पण ते तिहारमध्ये जॉइन झाले एका सिरीयल किलरच्या मदतीने. सुनील गुप्ता या जेलमध्ये जॉईन होण्यापूर्वी हे जेल पंजाब आणि हरियाणाचेच पोलिस सांभाळायचे. जेव्हा ते या जेलमध्ये जॉइन होण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना जेलच्या सुपरिटेंडंट करून विचारण्यात आलं की, ‘तुम्ही इथे कशासाठी आला आहात?” तेव्हा सुनील गुप्ता (Sunil Gupta) यांनी सांगितलं की, मी जेलच्या सहायक अधीक्षक पदावर जॉइन होण्यासाठी आलो आहे. त्यावर सुपरिटेंडंट कडून त्यांना उत्तर मिळालं की, इथे अशा कोणत्या पोस्टची गरज नाही आहे. सुनील गुप्ता (Sunil Gupta) हे रेल्वेची नोकरी सोडून इथे जॉइन होण्यासाठी आले होते. तरी सुद्धा त्यांना जॉइन होऊ दिलं जातं नव्हतं. ते निराश होऊन तिथेच बाहेर बसले. तेव्हा त्यांच्या जवळ एक माणूस चालत आला, त्याच्या ऐटीवरुन तो या जेलचा कोणीतरी मोठा अधिकारी आहे असं त्यांना वाटलं. तो जवळ आला, म्हणूंन ते उभे राहिले.(Tihar Jail)

त्या माणसाने सुद्धा त्यांना तोच प्रश्न विचारला त्यावर त्यांनी तेच उत्तर दिलं. त्यावर तो माणूस म्हणाला, “मी तिहारच्या सुपरिटेंडंटला ओळखतो. तो तुम्हाला जगू देणार नाही.” पण त्या माणसाने सुनील गुप्ताला थांबण्यासाठी सांगितलं आणि तो तिथून निघून गेला. सुनील गुप्ता यांना वाटलं, देवाने माझ्यासाठी कोणीतरी देवदूत पाठवलाय, जो माझं काम करून देत आहे. आणि त्या माणसाने केलंही तसंच. त्याने सुनील गुप्ता यांना त्यांचं जॉइनिंग लेटर आणून दिलं. तेव्हा त्यांना कळालं की, त्यांचं काम करून देणारा माणूस हा कोणी अधिकारी नाही, तर सिरीयल किलर चार्ल्स शोभराज आहे. त्यांना हे सुद्धा कळालं की, हे जेल भ्रष्ट अधिकारी आणि गॅंग लीडर्स चालवतात.

सुनील गुप्ता (Sunil Gupta)  हे तिहार जेलला जेव्हा सहाय्यक अधीक्षक म्हणून जॉइन झाले, तेव्हा चार्ल्स शोभराजची जेलमध्ये खूप चालत होती. चार्ल्स शोभराज हा एक फेमस सिरीयल किलर होता, जो भारतातील विदेशी महिला पर्यटकांना भुरळ पाडून त्यांना लुटायचा आणि त्यांची हत्या करायचा. चार्ल्स शोभराज समोर पोलिस अधिकारी सुद्धा फीके होते. त्याची जेलमध्ये चालायची कारण त्याच्याकडे जेलमध्ये एक टेप रेकॉर्डर होता, ज्यामध्ये त्याने सुपरिटेंडंटच्या बोलण्याचे अनेक रेकॉर्डिंग केले होते. त्या रेकॉर्डिंग्समध्ये जेल सुपरिटेंडंट त्याच्याकडून पैसे मागत असल्याचे पुरावे होते. त्याच्या जोरावर तो डिप्टी सुपरिटेंडंट आणि सुपरिटेंडंटकडून काहीही काम करवून घेत होता. एका मुलाखतीत सुनील गुप्तांनी एक गोष्ट अशी सुद्धा सांगितली की, चार्ल्स शोभराज जेलमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडसंना सुद्धा भेटायचा.(Tihar Jail)

सुनील गुप्ता (Sunil Gupta) यांनी सांगितलेला तिहार जेलमधील आणखी एक किस्सा म्हणजे, ९०च्या दशकाचा काळ होता. तेव्हा जेलमध्ये वर्षाला १५ ते २० मुलांचा जन्म व्हायचा, पण तो आकडा अचानक ४५ वर पोहचला होता. यात काहीतरी खोटं आहे याचा अंदाज सुनील गुप्ता यांना आला होता. त्यांनी याची तपासणी केली तेव्हा त्यांना कळालं, “९० च्या दशकात अशी अफवा पसरली होती की, जर प्रेग्नंट बाईने जेलमध्ये डिलीव्हरी केली तर मुलगा जन्माला येतो. म्हणून मग ६- ७ महिन्यांच्या गर्भवती महिला, जाणूनबुजून काहीतरी अपराध करायच्या आणि डिलीव्हरीसाठी जेलमध्ये यायच्या. काही महिला स्वत:च्या घरात अवैध दारूच्या बाटल्या ठेवायच्या, मग पोलिसांना फोन करून घरात दारूच्या बाटल्या आहेत, हे कळवायच्या पोलिस आल्यावर त्यांना चहा वगैरे पाजून म्हणायच्या की, मला अरेस्ट करा. (Tihar Jail)

तेव्हा किरण बेदी या दिल्ली कारागृहांच्या महानिरीक्षक होत्या, म्हणून जेलच्या कैदयांसाठी खूप चांगले डॉक्टर होते जे या गर्भवती महिलांची काळजी घेत होते आणि सगळा उपचार करत होते. त्या गर्भवती महिला म्हणून जेलमध्ये अरेस्ट होऊन यायच्या, मुलं जेलमध्ये जन्माला घालाच्या, आणि एक महिन्यानंतर बेल मिळवून बाहेर जायच्या. आता ज्यांना मुलगा जन्माला येत होता, ते बाहेर जाऊन इतरांना सांगायचे की, ‘जेलमध्ये डिलीव्हरी मुलगाचं जन्माला येतो.’ त्यामुळे ही अफवा वाढत चालली होती.

सुनील गुप्ता (Sunil Gupta) यांनी या समस्येवर उपाय म्हणून एक प्रेस रिलीझ मध्ये हे जाहीर केलं की, एका वर्षात जेलमध्ये सुमारे ४५ मुलं जन्मला आले, पण त्यात मुलींचीच संख्या जास्त होती. सुनील गुप्तांच्या या प्रेस रिलीझमुळे महिला मुद्दाम अरेस्ट होऊन येण्याची संख्या कमी झाली.

तिहार जेलचा सुनील गुप्ता यांचा आणखी एक फेमस किस्सा म्हणजे अफजल गुरुची फाशी.. संसद भवनावर हल्ला करणाऱ्या मास्टरमाइंड अफजल गुरुला फाशीची शिक्षा देण्यात आली होती. सुनील गुप्ता यांना त्याच्या फाशीचा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी फाशीची सर्व तयारी करून ठेवली होती. आरोपीला फाशी देण्याआधी आरोपीच्या वजनाच्या दुप्पट वजनाची गोणी रस्सीला लटकवून पाहिली जाते. त्यामुळे ती रस्सी मजबूत आहे का नाही हे कळतं. अफजल गुरुच्या फाशीच्या वेळेस जी रस्सी वापरण्यात येत होती, ती सारखी तुटत होती. मग त्यांनी आणखी मजबूत रस्सी आणली जी तपसणी दरम्यान तुटली नाही. अफजल गुरुला फाशी आज दिली जाणार आहे, याची कल्पना त्याला नव्हती. पण जेव्हा त्याला वेगळ्या सेलंमध्ये ठेवण्यात आलं तेव्हा तो कळून चुकला होता की त्याला आज फाशी दिली जाणार आहे. त्याला फाशी देण्याआधी त्याने सर्वांसोबत चहा घेतला.

===============

हे देखील वाचा : Maharashtra State Lottery : अनेकांना लखपति बनवणारी राज्य लॉटरी बंद होणार?

===============

जेव्हा त्याला फाशी देण्यासाठी नेलं जातं होतं, तेव्हा तो सुनील गुप्तांना म्हणाला, माझी शेवटची इच्छा आहे की, जेव्हा मला फाशी दिली जाईल, तेव्हा मी तुमच्या डोळ्यात बघत राहीन. कारण तुमच्या डोळ्यात मला खूप दया दिसते.” सुनील गुप्ता यांनी त्याला संजवलं की, “जेव्हा तुला फाशी दिली जाईल, तेव्हा तुझ्या तोंडावर काळा कपडा टाकला जाईल. तेव्हा तो म्हणाला, “मी जोपर्यंत फाशीच्या दिशेने जात राहीन, तोपर्यंत मी तुमच्या डोळ्यात बघत राहीन.’ त्याने तसंच केलं. तो जाताना सुनील गुप्ता यांच्या डोळ्यात बघत राहिला आणि संजीव कुमारच्या बादल चित्रपटातलं “अपने लीये जिये तो क्या जिये” हे गाण गायलं, जे नंतर सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी त्याच्यासोबत गायलं. त्याला फाशी देण्यात आली आणि नंतर तिहार जेलमध्येच त्याला दफन करण्यात आलं. सुनील गुप्ता यांनी त्यांच्या कारकिर्दीत जेवढ्या आरोपींना फाशी देताना पाहिलं त्यातले सर्वच रडत रडत फासावर गेले होते. फक्त हा आरोपी असा होता, जो गाणं गात जेलरच्या डोळ्यात डोळे घालून फासावर लटकला. त्यादिवशी सुनील गुप्ता आपल्या कुटुंबासमोर खूप रडले. एक जेलर सुद्धा माणूस असतो. रोज दिसणाऱ्या माणूस उद्यापासून तुमच्या समोर नसतो तर दुख होतं.

सुनील गुप्ता यांनी त्यांच्या कार्यकाळात कैदयांसाठी अनेक नियम पास केलं. जसं, कोणत्याही कैद्याला थर्ड डिग्री किंवा शारीरिक छळ, तुरुंग कर्मचार्‍यांकडून शारीरिक मारहाण केली जाऊ नये. या नियमांविरुद्ध अनेक कर्मचारी उभे राहिले, मारहाण केल्याशिवाय तुरुंग चालवणं अशक्य आहे. असा प्रश्न उपस्थित केला गेला. पण खरंतर सुनील गुप्ता यांना माहिती होतं की, जेलमध्ये मारहाण फक्त कमजोर कैद्यांनाच केली जाते. एखाद्या गँगस्टर्सला मारण्याची हिंमत कर्मचारी कधीच करत नव्हते. कमजोर कैद्यांना मारून त्यांच्या कडून पैसे उकळले जायचे. सुनील गुप्ता यांनी त्यांचे नियम तिहारमध्ये लागू केले. ते जो पर्यंत तिहारमध्ये जेलर होते, तोपर्यंत कोणालाच विनाकारण मारलं गेलं नाही, असं ते सांगतात.

त्यांनी त्यांच्या तिहारच्या कारगिर्दीत अनेक आरोपींना फाशी देताना बघितलं. त्यामध्ये रंगा- बिल्ला पासून इंदिरा गांधींचे मारेकरी सतवंत आणि केहरसिंग यांचाही समावेश आहे. सुनील गुप्ता यांनी जेलमध्ये चालणाऱ्या अनेक अनैतिक नियमांविरुद्ध आवाज उठवून ते बदलले. त्यांनी जेलमध्ये शिक्षण कार्यक्रम, रोजगार प्रशिक्षण, कैद्यांसाठी स्पेशल कोर्ट, अशी उल्लेखनीय कामं केली. त्यासाठी त्यांना राष्ट्रपतीच्या हस्ते correctional service medal देण्यात आलं. निवृत्तीनंतर सुद्धा अजूनही सुनील गुप्ता हे कैद्यांच्या अधिकारांसाठी आणि त्यांच्या मानासिक आरोग्याच्या प्रश्नांनासाठी काम करत आहेत.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.