आपलीच संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे, जगावर आपली संस्कृती आणि सत्ता यांची पकड बसायला हवी या विचारानं पछाडलेल्या चीनला आता लहान मुलांच्या मनाचाही विचार करायला वेळ नाही. तिबेट (Tibet) मधील लहान मुलांना त्यांच्या पालकांपासून दूर करण्यासाठी आता चीन हरत-हेने प्रयत्न करत आहे. पालकांपासून दूर करुन या तिबेटी मुलांवर चीनची संस्कृती लादण्यात येत आहे. त्यांना चीनी भाषेतील शिक्षण देण्यात येते. या मुलांना सर्ववेळ बोर्डींग स्कूलमध्ये डांबून ठेवण्यात येते. या दरम्यान या लहान मुलांना पालकांबरोबर संपर्क करता येत नाही, फारकाय अन्य कुठेही जाण्यास या मुलांना बंदी असते. तिबेटी (Tibet) मुलांवरच चीनमध्ये अत्याचार होत आहेत, असे नव्हे तर तिबेटी महिलांवरही मोठ्याप्रमाणात अत्याचार होत आहेत. चीनचे सैनिक तिबेटी महिलांवर सामुहिक अत्याचार करीत आहेत. तसेच गर्भवती असलेल्या तिबेटी महिलांना इलेक्ट्रीक शॉकही देण्यात येतो. त्यामुळे या महिलांच्या गर्भातच त्यांच्या मुलांचा मृत्यू होत आहे. तिबेटी संस्कृती नष्ट करण्यासाठी चीनचा चाललेला हा प्रयत्न मानवी क्रूरतेच्या सीमा पार करुन गेला आहे. आता तर संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार तज्ञांनीही याबाबत अहवाल दिला असून चीनचे वर्तन अत्यंत क्रूरतापूर्ण असल्याचा शेरा दिला आहे.
संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार समितीमधील तीन तज्ञांनी चीनच्या तिबेटवरील अत्याचाराबाबत अहवाल तयार केला आहे. हा अहवाल जगापुढे उघड झाल्यावर चीनच्या क्रुरतेनं अंगावर शहारे आणले आहेत. लहान मुले आणि गर्भवती मातांवर चालू असलेले चीनचे अत्याचार ऐकून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या अहवालानुसार चीनने सुमारे दहा लाख तिबेटी मुलांना त्यांच्या कुटुंबापासून वेगळे केले आहे. चीनने या मुलांना चीनी सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या तीन मानवाधिकार तज्ञांनी हा अहवाल दिला आहे. त्यात या मुलांची अवस्था अत्यंत कठिण असल्याचे सांगण्यात आले आहे. चीन या तिबेटी मुलांना त्यांची मातृभाषा, संस्कृती आणि इतिहासाच्या अभ्यासापासून दूर ठेवत आहे. जेणेकरुन ही तिबेटी मुलं स्वतःची संस्कृती विसरुन चीनी संस्कृतीला आपलेसे करतील हा त्यामागील हेतू आहे. तिबेटी मुलांना चिनी भाषेत शिकण्याची सक्ती केली जाते. ज्या शाळांमध्ये या मुलांना ठेवले जाते त्या शाळांमध्ये फक्त हान संस्कृतीबद्दल शिकवले जाते. हान हा चीनमधील बहुसंख्य वांशिक गट आहे. तिबेटी मुलांसाठी असलेल्या निवासी शाळा या अत्यंत कठिण अशा नियमात चालवल्या जातात. तिथे या मुलांना त्यांच्या पालकांपासून पूर्णपणे दूर ठेवण्यात येते. त्यांना त्यांच्या मुळ भाषेत संवादही साधता येत नाही. असे केल्यास त्यांना शिक्षा म्हणून मारहाणही करण्यात येते असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या निवासी शाळांमधील व्यवस्था आंतरराष्ट्रीय मानवाधिकार नियमांच्या विरुद्ध असल्याचेही अहवालात नमूद आहे. यातील बहुतांश मुले त्यांची मूळ भाषा विसरली आहेत.
चीनमधील निवासी शाळांमध्ये ज्या तिबेटी (Tibet) मुलांना जबरदस्तीनं ठेवण्यात आलं आहे, ती मुलं आता त्यांचे आई-वडील आणि आजी-आजोबा यांच्याशी संवाद साधू शकत नाहीत. कारण त्यांना त्यांच्या मुळ भाषेतील निवडक शब्द येत आहेत. त्याव्यतिरिक्त मुळ भाषा येत नाही. त्यामुळे संवादाचे साधन कमी झाले आहे. चीननं आता या निवासी शाळांची संख्याही वाढवल्यामुळे या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. असाच भाषिक आणि सांस्कृतिक अत्याचार सुरु राहिला तर तिबेटी संस्कृती नाश पावेल असा इशाराही अहवालात देण्यात आला आहे. जगाचे छप्पर म्हणून तिबेटची ओळख आहे. तिबेटी (Tibet) लोक आपल्या चालिरिती आणि संस्कृती यांची जपणूक करतात. मात्र चीनच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे तिबेटी नागरिक तणावाखाली आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या तीन तज्ञांनी सांस्कृतिक, धार्मिक आणि भाषिकदृष्ट्या तिबेटवर आक्रमण होत असून चीनची हान संस्कृती त्यांच्यावर लादली जात असल्याचा आरोप केला आहे.
========
हे देखील वाचा : तुर्की आणि सीरियातील भुकंप जीवघेणा का ठरला?
=======
एवढ्यावरच चीनचा अत्याचार थांबत नाही तर ज्या तिबेटी नागरिकांच्या घरात किंवा फोनमध्ये दलाई लामा यांच्यासोबत फोटो आहे, त्यांनाही मारहाण केल्याचे प्रकार होत आहेत. आणखी एक भयानक प्रकार या अहवालातून जगासमोर आला आहे, तो म्हणजे तिबेटी गर्भवती महिलांवर होणारा अत्याचार. गर्भवती तिबेटी (Tibet) महिला चिनी लष्कराच्या डॉक्टरांच्या निशाण्यावर आहेत. गर्भवती महिलांना जबरदस्तीने पळवून नेले जाते. त्यांना इलेक्ट्रिक उपकरणांनं विजेचे झटके दिले जातात. यामुळे त्यांचा गर्भपात होते. हे करत असताना तिबेटी महिलांना भूल देऊनही बेशुद्ध केले जात नाही. अशा वेदना सहन केलेल्या महिलांच्या दुःखालाही या अहवालातून वाचा फोडण्यात आली आहे. याशिवाय चीनचे सैनिकही तिबेटी महिलांचे अपहरण करतात. त्यांच्यावर सामुहिक अत्याचारही होत आहेत. तिबेटी (Tibet) संस्कृती ही शांतप्रिय संस्कृती आहे. मात्र चीननं आपल्या अतिरेकी विचारसरणीनं या संस्कृतीचा नाश करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु केले आहेत. या सर्वांवर वेळीच ठोस उपाय करावे आणि तिबेटी जनतेचे रक्षण करावे असे आवाहनही या अहवालात संबंधित तज्ञांनी केले आहे.
सई बने