Home » भगवान शंकराचे ‘हे’ अनोखे समुद्री मंदिर…

भगवान शंकराचे ‘हे’ अनोखे समुद्री मंदिर…

by Team Gajawaja
0 comment
Mahadev Temple
Share

भगवान शंकराची अनेक मंदिरे आपल्या देशात आहेत आणि या प्रत्येक मंदिराचे एक वेगळेपण आहे.  गुजरातमध्येही असेच वेगळेपण जपणारे भगवान शंकराचे मंदिर (Mahadev Temple) आहे. या मंदिराचा इतिहास पांडवकालीन असून पांडवांनी येथील शिवलिंगाची स्थापना केल्याचे सांगितले जाते.  गुजरातपासून जवळच असलेल्या दीवपासून 3 किलोमिटर अंतरावर फुडाम गाव आहे. या फुडाम गावाच्या समुद्रकिना-याजवळ गंगेश्वर महादेव मंदिर (Mahadev Temple) आहे. अरबी समुद्राच्या लाटा या मंदिरातील शिवलिंगाला अभिषेक करीत असल्याचे दृश्य बघण्यासाठी लाखो भाविक येथे गर्दी करतात. हे मंदिर म्हणजे, समुद्रकिनारी असलेल्या खडकांच्या मधोमध असलेली गुहा आहे. या गुहेमध्येच भगवान शिवाचे हे अनोखे मंदिर उभारण्यात आले आहे. शिवलिंग समुद्रकिनारी वसलेले असल्याने या मंदिराला ‘समुद्री मंदिर’ असेही म्हणतात.

या मंदिरात स्थापित केलेले शिवलिंग सुमारे 5000 वर्षे जुने असून त्याची कथा महाभारताबरोबर असल्याचे स्थानिक सांगतात. समुद्रात भरती आल्यावर हे शिवलिंग समुद्राच्या पाण्यात विसर्जित होते. या मंदिराचा महिमा मोठा असून येथे जगभरातील शिवभक्तांची गर्दी असते. या मंदिररुपी गुहेमध्ये भाविकांनी प्रवेश केल्यावर प्रथम भगवान गणेश, भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे दर्शन होते. त्यानंतर समुद्राच्या पाण्याच्या मध्यभागी वेगवेगळ्या आकारातील पाच शिवलिंग दिसतात. ही पाच वेगवेगळ्या आकारातील शिवलिंग या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. ही लिंगे सहसा भरतीच्या वेळी समुद्रात बुडतात आणि ओहटीच्या वेळी भक्तांना बघता येतात. त्यामुळे येथे समुद्राच्या भरती ओहटीची वेळ बघून भक्त या मंदिरात येतात. मंदिरात पांडवांनी त्यांच्या वैयक्तिक आकारांवर आधारित पाच शिवलिंगे स्थापित केली आहेत. सर्वात मोठे शिवलिंग भीमाने बनवले होते, कारण त्यांची शरीरयष्टी प्रचंड होती. याबाबत स्थानिक कथा सांगतात. पांडव हस्तिनापूरच्या राज्यातून 12 वर्षे निर्वासित होऊन वनवासात होते. तेव्हा त्यांनी या मंदिरात उपस्थित भगवान शिवाची पूजा केली. पांडव जेवण करण्यापूर्वी त्याचा नैवेद्य भगवान शिवाला अर्पण करीत असत. वनवासात असतांनाही त्यांची ही सवय कायम होती.  वनवासात असतांना त्यांनी या मंदिराच्या ठिकाणी भेट दिली.  तिथे भोजनापूर्वी नैवेद्य अर्पण करण्यासाठी पाच पांडवांनी पाच शिवलिंग बनवली आणि त्यांची यथासांग पूजा करुन त्यांना नैवेद्य अर्पण केल्याचे सांगितले जाते.  गंगेश्‍वर हे नाव गंगा आणि ईश्वर यावरून आले आहे.  गंगेचा स्वामी असा त्याचा अर्थ होतो. या शिवलिंगाच्या वर खडक असून त्यावर शेषनागाची प्रतिकृती आहे.  हा शेषनाग शिवलिंगाचे रक्षण करतो, असे मानले जाते. (Mahadev Temple) 

गंगेश्वर महादेव मंदिराला (Mahadev Temple) भेट देण्यासाठी वर्षभर भाविकांची गर्दी असते. मात्र, पावसाळ्यात पर्यटकांनी या ठिकाणी न जाण्याचा सल्ला दिला जातो कारण या वेळी समुद्राच्या पाण्याला जोर असते. भरतीच्या वेळाही जास्त असतात.  त्यामुळे हा सर्व भाग पाण्याखाली असतो. गंगेश्वर मंदिरात शिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, या दरम्यान लाखो भक्त भगवानच्या दर्शनासाठी येतात.  तसेच, नवरात्रीचे नऊ दिवसही येथे उत्सव असतो.  त्यासाठी लाखो भाविक या गंगेश्वर मंदिराला भेट देतात.  गंगेश्वर मंदिरात अलिकडे अनेक भाविक भेट देत आहेत.  त्यामागे मंदिरापर्यंत जाण्यासाठी झालेल्या सुविधा मानण्यात येतात.  मंदिरापर्यंत जाण्यासाठी अनेक सार्वजनिक आणि खाजगी बसेस उपलब्ध आहेत.  गुजरातमध्ये येणार परदेशी पर्यटकही या मंदिराला आवर्जून भेट देतात.  येथे स्थानिक पुजारी उपस्थित असतात.  हे पुजारी भरती-ओहटींच्या वेळांची माहिती देतात.  तसेच भाविकांना समुद्राच्या पाण्यापासून सांभाळून मंदिरात येण्याच्या सूचना देतात.  या पुजा-यांच्या आणि स्थानिकांच्या सूचना ऐकाव्यात असेही आवाहन भाविकांना करण्यात येते.  

========

हे देखील वाचा : तब्बल साडेनऊशे वर्षांहून अधिक जुने आहे ‘हे’ मंदिर!

========

गंगेश्वर मंदिर दीव पासून 11 किमी अंतरावर आहे.  येथे येण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन देलवारा रेल्वे स्टेशन आहे. गंगेश्वर महादेव मंदिराच्या (Mahadev Temple) आसपास अनेक उत्तम समुद्रकिनारे असून भाविक तेथेही भेट देऊ शकतात. यामध्ये,  नागोवा बीच, घोगला बीच यांचा समावेश असून नादिया लेणी, सेंट पॉल चर्च, दीव किल्ला, दिव संग्रहालय, पाणिकोटा किल्ला येथेही भाविक भेट देऊ शकतात.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.