Home » तब्बल साडेनऊशे वर्षांहून अधिक जुने आहे ‘हे’ मंदिर!

तब्बल साडेनऊशे वर्षांहून अधिक जुने आहे ‘हे’ मंदिर!

by Team Gajawaja
0 comment
Old Temple
Share

महाराष्ट्राला पुरातन मंदिरांचा व लेण्यांचा संपन्न वारसा आहे आणि त्यात अंबरनाथ शिवालयाचा मान मोठा आहे. हे देऊळ नुसते म्हणायला ‘पुरातन’ नाही. त्यावरील शिलालेखानुसार मंदिर शके ९८२ म्हणजेच इ.स. १०६० मधील आहे. म्हणजे तब्बल साडेनऊशेहून अधिक वर्षांपूर्वीचे!
या मंदिरावरील शिखर ‘भूमिज शैलीचे आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील भूमिज शैलीच्या मंदिरांमध्ये असलेले हे सर्वात पुरातन मंदिर (Old Temple) आहे.

इतिहास

अंबरनाथ मंदिरातील (Old Temple) एका शिलालेखात मंदिराची ही सर्व माहिती कोरून ठेवलेली आढळते. त्या शिलालेखावरून असे समजते की, शिलाहार वंशातील राजा छितराज यांच्या कारकिर्दीत मंदिर बांधण्यास सुरुवात होऊन त्याचा धाकटा भाऊ मुम्मुणी यांच्या कारकिर्दीत इ.स. १०६० मध्ये हे मंदिर पुरे झाले. शिलालेखात उल्लेख असल्याप्रमाणे येथील देवाचे नाव आम्रनाथ होते. आम्रनाथ शब्दाचा अपभ्रंश होऊन आजचे अंबरनाथ तयार झाले. आम्रनाथ हे फक्त शिवालय नव्हते तर इथे त्याला जोडून बहुधा पाठशाला होती, शिष्यांना साधनेसाठी जागा होती आणि येथे विद्वान आचार्यांचे मार्गदर्शन उपलब्ध होते.

आधुनिक काळातील मंदिराचा शोध

स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेलं हे सुंदर मंदिर अकराव्या शतकात बांधलं गेलं. पण त्यानंतरच्या काळात या मंदिराची कुणीच दखल घेतली नाही. स्थापनेपासून ते इ.स. १८४९ पर्यंत जवळपास सातशे वर्षे या मंदिराची माहिती कुणालाच नव्हती. ब्रिटिश साम्राज्याला समृद्ध अशा भारतीय पुरातन वास्तूंमध्ये विशेष रस होता, त्यांनी पुरातन वास्तू (Old Temple) शोधून काढल्या आणि त्यांची योग्य ती देखभाल केली. आधुनिक काळात शिवमंदिर शोधून काढण्याचा मान ‘रेव्हरंड डॉक्टर विल्सन’ यांना जातो. १८४९ च्या सुमारास कोणीतरी विष्णुशास्त्री यांनी कल्याणजवळ एक पुरातन शिवमंदिर असल्याचे डॉ. विल्सन यांना कळवले. १८५२ मध्ये मंदिर प्रत्यक्ष पाहून गेल्यावर डॉ. विल्सन यांनी ‘बॉम्बे ब्रांच ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी’च्या सभेमध्ये या देवळाचे वर्णन सादर केले. त्यानंतर १८५३ मध्ये रेल्वे कल्याणपर्यंत पोचली, त्यामुळे मंदिराचे फोटो काढण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी इतरांना येथे येणे सोपे झाले.

मंदिर वास्तुकला

अंबरनाथ मंदिराच्या स्थापत्याबद्दल बोलायचं झाल्यास ‘तत्त्वज्ञान आणि स्थापत्य यांची उत्तम सांगड’ अशाप्रकारे त्याचे वर्णन करता येईल. अंबरनाथच्या देवळातील शिल्पे, त्यांची रचना, स्थान-क्रम वगैरे ‘शैवसिद्धान्त’ प्रथेला अनुसरून आहेत. मंदिराच्या गाभाऱ्याच्या उत्तर भिंतीचा, बाहेर आलेला मुख्य भाग म्हणजेच ‘उत्तर भद्र’. गाभारा आणि मंडप यांना जोडणारा आतील भाग म्हणजे ‘अंतराळ’. त्याची बाहेरील भिंत ही शिखराच्या अर्ध्या उंचीपर्यंत सरळ वर जाते तिला ‘कपिली’ असे म्हणतात. मंदिराच्या पूर्व गवाक्षावरील मूर्ती पडून गेली आहे तर उत्तर गवाक्षावर चामुंडा आणि दक्षिण गवाक्षावर नटेश मूर्ती आहे. त्याउलट गवाक्षाखाली पूर्वेकडे ब्रम्हा, दक्षिणेकडे विष्णू आणि उत्तरेकडे मिश्र सूर्यमूर्ती आहेत. अंबरनाथ मंदिराचे शिखर हे भूमिज प्रकारचे असले तरी त्याचे घटक वैशिष्टपूर्ण आणि आगळेवेगळे आहेत. मंदिराच्या उंबरठ्यावर मध्यभागी कमळाचे फुल आहे. हे फुल मंदिरात प्रवेश करणाऱ्या भक्तांच्या निर्मळ मनाचे जणू प्रतीकच आहे. (Old Temple)

मंदिराच्या दाराच्या चौकटीच्या वर जो आडवा फलक आहे त्याला ‘उत्तरांग’ म्हणतात. त्याच्या मध्यभागी शिव आहे, उजवीकडे ब्रह्मदेव आणि सावित्री तर डावीकडे लक्ष्मी आणि विष्णू आहेत. मंदिरावर कोरलेली बरीच दृश्ये आपल्याला ह्या परिसरातील अकराव्या शतकातील दैनंदिन जीवनाची झलक दाखवतात. अंबरनाथ मंदिरात असलेल्या खांबांचा आकार आणि घाट गुजरातमधील सोळंकी घराण्याने बांधलेल्या मंदिरांच्या खांबांच्या शैलीशी जुळणारा आहे.(Old Temple)

शिल्पकला तपशील

भाविकांना अंबरनाथ शिवमंदिर (Old Temple) आपलेसे वाटावे म्हणून ते स्थापन करतानाच इथल्या जनमानसातील भावनाही विचारात घेतल्या आहेत. याचे एक उदाहरण म्हणजे अंबरनाथ मंदिरात बऱ्याच ठिकाणी दिसणाऱ्या ब्रह्ममूर्ती. अंबरनाथ मंदिरावरच्या अनेक मूर्तींची लक्षणे नष्ट झाली असल्यामुळे त्यांची ओळख पटण्यासाठी त्यांचे ‘स्थान’ आणि ‘प्रमाण’ विचारात घेतले जाते. हातात कमळ, वीणा, पोथी घेतलेली देवी पाहिली की लागलीच ती सरस्वती किंवा वागीश्वरी आहे हे कळते. लिखित पुरावे नसले तरी मंदिराचा परिसर, स्थापत्य आणि मंदिरावरील मूर्तीची रचना यावरून बरेच काही उलगडते. शिलाहारांच्या राज्याच्या एका बाजूस गुजरातचे सोळंकी घराणे होते, तर दुसरीकडे चालुक्य, उत्तरेकडे परमार. त्यामुळे एकमेकांच्या कलेची देवाणघेवाण झाली असणार. भूमिज शिखर ही परमारांची खासियत होती. दारांच्या ठेवणीवर चालुक्यांची झाक आहे. तर मंडपातले खांब आणि पीठावरची ग्रासपट्टी हि सोळंकी शैलीसमान आहे. अशाप्रकारे विविध संस्कृतींचा सुंदर मिलाप आपल्याला मंदिराच्या बांधकामामध्ये दिसून येतो.

========

हे देखील वाचा : गोल्डन टेंपल म्हणून ओळखले जाणारे ‘हे’ महालक्ष्मी मंदिर

========

धार्मिक महत्व

महाराष्ट्रातील अंबरनाथ मंदिरात (Old Temple) भगवान शिवाची पूजा केली जाते. हे मंदिर हिंदू शिल्पकलेचे अप्रतिम उदाहरण आहे. मंदिराच्या मध्यभागी पवित्र शिवलिंग आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी अंबरनाथ येथे मोठी यात्रा भरते, ज्याला विविध धर्मांचे हजारो भाविक भेट देतात. महाशिवरात्रीचा मेळा 3-4 दिवस चालतो. श्रावणातील प्रत्येक सोमवारी या मंदिरात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. हजारो शिवभक्त या दिवसांमध्ये मंदिरात दर्शनासाठी येत असतात. केवळ मुंबई, महाराष्ट्रातील नाही, तर देश आणि परदेशातील पर्यटकांमध्ये हे शिवमंदिर लोकप्रिय आहे. धार्मिकदृष्ट्या या मंदिराला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.