Home » ‘हे’ मंदिर राहू-केतूच्या पूजेसाठी आहे प्रसिद्ध

‘हे’ मंदिर राहू-केतूच्या पूजेसाठी आहे प्रसिद्ध

by Team Gajawaja
0 comment
Srikalahasti
Share

आंध्रप्रदेश राज्यामध्ये तिरुपती जिल्ह्यात असलेल्या श्रीकालहस्ती मंदिराला दक्षिण भारतातील कैलास पर्वत म्हणून ओळखले जाते.  भगवान शंकराच्या वायुतत्वाला अर्पण केलेल्या या मंदिराचे महत्त्व पुराणातही सांगितले आहे.  या मंदिराला दक्षिणेची काशीही म्हटले जाते.  श्रीकालहस्ती मंदिर हे भारतातील एकमेव असे मंदिर आहे जे सूर्य आणि चंद्रग्रहण दरम्यान उघडे असते. मुख्य म्हणजे, हे मंदिर राहू-केतूच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे.  या मंदिरात राहू आणि केतूची पूजा केल्यास मनुष्याच्या प्रगतीच्या आड येणारे सगळे अडथळे दूर होतात, असे सांगण्यात येते.  त्यामुळे भारतभरातून या मंदिरात राहू-केतूची पुजा करण्यासाठी भाविकांची गर्दी झालेली असते.  पौराणिक ग्रंथामध्ये या मंदिरात चारही युगांमध्ये ब्रह्मदेवाने या ठिकाणी कलहस्तेश्वराची पूजा केल्याचा उल्लेख आहे.  तसेच महाभारत काळात अर्जुनानं कलहस्तेश्वराची पूजा केल्याचा उल्लेख आहे.  (Srikalahasti)

प्रति कैलास किंवा दक्षिणेची काशी म्हणून श्रीकालहस्ती मंदिराची (Srikalahasti) ओळख आहे.  श्रीपुरम आणि मुमुडी- चोलापुरम या दोन उंच टेकड्यांमध्ये वसलेल्या या मंदिराचा भारतातील भव्य अशा मंदिरांमध्ये उल्लेख होतो. श्री कलहस्ती मंदिर सर्वार्थांनं वेगळे आहे.  हे मंदिर पेन्नार नदीची उपनदी असलेल्या स्वर्णमुखी नदीच्या काठावर वसलेले आहे.  या मंदिरात स्नान करुनच मग श्रीकालहस्ती मंदिरात पुजा केली जाते.  भाविक वायु तत्वाला अर्पण असलेल्या या मंदिरात भगवान शंकराला नटराज रुपात बघतात.  या मंदिरात राहू-केतू पूजेसाठी आणि शांतीसाठी भाविक येतात.  येथील शिवलिंगाला  पुजारीही हात लावू शकत नाहीत. पुतळ्याजवळ सोन्याची पाटी बसवली आहे.

त्यावर फुले, हार आणि पुजेचे सामान अर्पण केले जाते.  या मंदिरातील भगवान शंकराची पिंडी सुमारे चार फूट उंचीची आहे. या पिंडीवर कोळी आणि हत्तीचा आकार दिसतो.  तसेच पिंडीला नागानंही विळखा घातल्याचे दिसते.  यामागे पौराणिक कथा सांगण्यात येते.  मान्यतेनुसार या ठिकाणाला श्री म्हणजे कोळी, काल म्हणजेच साप आणि हस्ती म्हणजेच हत्ती या तीन प्राण्यांचे नाव देण्यात आले आहे. एका कथेनुसार तपश्चर्या करत असताना कोळ्याने शिवलिंगावर जाळे बनवले.  त्याचवेळी एका नागाने शिवलिंगाला विळखा घातला होता.  तर हत्तीने शिवलिंगाला पाण्याने स्नान घातले होते. या तिघांचेही अस्तित्व या शिवलिंगावर दाखविण्यात आले आहे. स्कंद पुराण, शिव पुराण आणि लिंग पुराणातही श्रीकालहस्तीचा उल्लेख आहे.

हे मंदिर भारतातले श्रीमंत मंदिर म्हणूनही गौरवले जाते. या मंदिराचे वार्षिक उत्पन्न 100 कोटींपेक्षा जास्त आहे.  या मंदिराचे वास्तुशास्त्र हा अभ्यासाचा विषय आहे.  श्रीकालहस्ती मंदिराचा शिखर दक्षिण भारतीय शैलीत बांधलेला आहे.  त्यावर पांढ-या रंगाचे आवरण आहे. या मंदिरात प्रवेशासाठी तीन भव्य गोपुरम आहेत.  यासोबत मंदिरात असलेला शंभर खांबांचा मंडप हा स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे.  मंदिरात अनेक शिवलिंगाची स्थापना केलेली आहे.  चोल वंशाच्या आधीपासून असलेल्या या मंदिरात प्रस्थापित राजांनी आपल्या श्रद्धेनुसार भगवान शंकाराची आराधना केली.  त्यावेळेपासून त्या राजांनी पुजा करण्यासाठी स्थापित केलेल्या शिवलिंगाची संख्याही अधिक आहे.  (Srikalahasti)

श्रीकालहस्ती मंदिर (Srikalahasti) 5 व्या शतकाच्या आसपास बांधले गेल्याचा उल्लेख काही हस्तलिखितांमध्ये आहे.  तसेच  11 व्या शतकात राजेंद्र चोल पहिला, आणि त्यानंतरच्या चोल राजांनी मंदिराचा विस्तार केला.  तसेच विजयनगरच्या राजांनीही या मंदिराच्या विस्तार कार्यात हातभारलावल्याचा उल्लेख आहे.  या मंदिराबाबत एक कथा सांगण्यात येते, त्यानुसार भगवान शंकराची  पत्नी माता पार्वतीला तिचे दैवी रूप सोडून मानवी रूप धारण करण्याचा शाप मिळाला होता. यामुळे प्रायश्चित करण्यासाठी देवी पार्वतीने श्रीकालहस्ती येथे तपश्चर्या केली. त्यानंतर भगवान शंकरानं माता पार्वतीला दैवी शरीर दिले.  या मंदिरात माता पार्वतीची पूजा शिव-ज्ञानम् ज्ञान प्रसूनंबा किंवा ज्ञान प्रसुनंबिका देवी म्हणून केली जाते.

==============

हे देखील वाचा : ‘या’ मंदिरात होते भगवान शंकराची पृथ्वीच्या रूपात पूजा 

==============

या मंदिरात शैव परंपरांचे पालन करण्यात येते.  पुरातन काळापासून जे धार्मिक सोहळे मंदिरात पार पडत आहेत, तसेच सोहळे आजही या मंदिरात साजरे होत आहेत.  महाशिवरात्रीला तर या मंदिरात पाय ठेवायला जागा नसते, एवढे भाविक येतात. श्रीकालहस्ती मंदिरात (Srikalahasti) भगवान राम, सीता, लक्ष्मणन, हनुमान, युधिष्ठिर, ऋषि व्यास, चित्रगुप्त यांनीही पुजा केल्याचा उल्लेख आहे.  श्रीकालहस्ती मंदिराचा सर्व परिसरच बघण्यासारखा आहे.   मंदिराच्या प्रत्येक भागात कोरीव काम केले आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.