Home » ‘या’ शिवलिंगाची वर्षातून एकदाच केली जाते पूजा

‘या’ शिवलिंगाची वर्षातून एकदाच केली जाते पूजा

by Team Gajawaja
0 comment
Shivlinga
Share

छत्तीसगडच्या चुईखदान गंडाई जिल्ह्यातील खैरागडमध्ये या आठवड्याच्या सोमवारी शिवभक्तांचा मेळा जमला होता. वैशाख शुक्ल पक्षाच्या अक्षय्य तृतीयेनंतरच्या या पहिल्या सोमवारची वर्षभर या भागातील आणि अन्य राज्यातील शिवभक्त वाट बघत असतात. कारण येथील खैरागडमध्ये अनोखी गुहा आहे. या गुहेला मनदीप खोल गुहा म्हणतात. या गुहेत एक अनोखे शिवलिंग (Shivlinga) आहे.  या शिवलिंगाची वर्षातून एकदाच, म्हणजेच अक्षय्य तृतीयेनंतरच्या पहिल्या सोमवारी पुजा केली जाते. या ऐतिहासिक अशा शिवलिंगाची पुजा स्थानिक राजघराण्याकडून पुजा केली जाते, मग हजारो शिवभक्त या शिवलिंगाचे (Shivlinga) दर्शन घेतात. या सोमवारीही मनदीप खोळ मधील शिवलिंगाचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. खैरागडच्या घनदाट जंगलातील ही गुहा वर्षातून एकदाच या शिवभक्तांसाठी उघडण्यात आली. यावेळी अर्चना भागातील ठाकुरटोला संस्थानाच्या सदस्यांनी गुहेतील प्राचीन शिवलिंगाची पूजा केली. त्यावळी हजारो शिवभक्तांनी भगवान शंकराचा जयजयकार केला. या गुहेजवळ जाण्यासाठी मोठे जंगल पार करावे लागते. हा सर्व मार्ग खडतर आहे. इथे पोहोचण्यासाठी एकच नदी 16 वेळा पार करावी लागते.  शिवाय या भागात मोठ्याप्रमाणात जंगली प्राणीही आहेत. त्यांना दूर करण्यासाठी या जंगलात फटाके लावण्यात आले होते. मुख्य म्हणजे वर्षातून फक्त एक दिवस होणा-या या सोहळ्यासाठी साधारण आठवडाभर आधी तयारी सुरु होते. ठाकुरटोला संस्थानातर्फे काही धार्मिक कार्यक्रमही होतात. यात सामिल होण्यासाठी अनेक भाविक सोमवारी दर्शन घेण्यासाठी दोन दिवस आधी पासूनच येथे मुक्कामी होते.  

छत्तीसगडमधील ही मनदीप खोल गुहा गुढ आहे. वर्षभर ही गुहा बंद असते. फक्त एक दिवस या गुढ गुहेचे दरवाजे भक्तांसाठी खुले होतात.   परंपरेनुसार अक्षय्य तृतीयेच्या पहिल्या सोमवारी गुहेचे दरवाजे भक्तांसाठी गुहेचे दरवाजे उघडण्यात येतात. यावेळीही सकाळी 8 वाजता ठाकूरटोला राजघराण्यातील लाल रोहितसिंग पुलस्तया यांनी राजपुरोहितांसह शिवलिंगाची पूजा केली. या पुजेनंतर अन्य भाविकांनाही शिवलिंगाचे दर्शन घेता आले. राजघराण्यातील सदस्यांच्या सांगण्यानुसार गेली अनेक वर्ष ही परंपरा त्यांच्या घराण्यात जपण्यात येत आहे.  यामागे अनेक रहस्ये असून त्यांची आता त्यांनाही माहिती नाही. मात्र गुहेत अनेक रहस्ये दडलेली आहेत. या गुहेमधील लेण्यांमध्ये तेजस्वी खडक आढळतात. ही गुहा वर्षभर बंद असल्यामुळे त्यात वटवाघुळे अनेक आहेत. ही गुहा आशिया खंडातील सर्वाधिक मोठी गुहा मानली जाते. या गुहेच्या आत अन्य गुहाही आहेत. स्थानिक या गुहांना पायथन गुहा, वटवाघुळ गुहा, श्वेत गंगा म्हणून ओळखतात. या गुहांमध्ये काही भागात पाणीही ठिबकत असते. या पाण्यात अनेक औषधी गुण असून यामध्ये स्नान केल्यावर आरोग्याचे वरदान मिळते अशी स्थानिकांची धारणा आहे.  त्यामुळे वर्षातून जेव्हा एकदा मनदीप खोल गुहा भाविकांसाठी उघडण्यात येते, तेव्हा या गुहेतील कुंडामध्ये प्रथम भाविक स्नान करतात.  आणि मगच ओल्यात्यांनी शिवलिंगाचे (Shivlinga) दर्शन घेतात. छत्तीसगड व्यतिरिक्त मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि इतर राज्यातूनही भाविक गर्दी करतात.  

हा संपूर्ण भाग डोंगराळ आहे. तसेच घनदाट जंगल परिसरात आहेत. येथे वन्यजीवांचे प्रमाणही मोठे आहे. गुहेजवळ जाण्याचा रस्ताही बराच अवघड आहे. या सर्व अडचणींवर मात करत शिवभक्त मनदीप खोल गुहेमध्ये पोहचतात.  यावर्षी जवळपास तीस हजार भाविकांनी गुहेतील शिवलिंगाचे (Shivlinga) दर्शन घेतल्याची माहिती आहे. यासाठी भाविक दोन दिवस आधीच या ठिकाणी मुक्कामासाठी पोहचले होते. या भाविकांसाठी ग्रामस्थांतर्फे भंडा-याचे आयोजन केले जाते. अत्यंत डोंगराळ भागात हा भंडारा करणेही कठिण असते.  मात्र या सर्वांवर मात करत स्थानिक शिवभक्तांसाठी पाच दिवस भंडारा ठेवतात.  

======

हे देखील वाचा : केदारनाथ धामचे दरवाजे आज भाविकांसाठी खुले…

====== 

या गुहेची अनेक वैशिष्ट असून त्यावर संशोधन करण्याची मागणी आहे. या सर्व भागात प्रचंड उष्मा असतांना या गुहेत कमालीचे थंड वातावरण असते. तसेच गुहेच्या आसपासही थंड वातावरण असते.  खोह म्हणजे गुहा. मनदीप खोल ही एक नैसर्गिक गुहा आहे. या गुहेत अनेक रहस्ये असल्याची स्थानिकांची भावना असल्यानं त्याबद्दल अधिक उत्सुकता आहे. वर्षातून एकदाच होण-या या शिवभक्तांच्या मेळ्यासाठी ठाकुरटोला राज परिवारातर्फेही भोजनाची व्यवस्था केली जाते. मात्र दरवर्षी या भागात येणा-या शिवभक्तांची संख्या वाढती आहे, त्यामुळे येथे भाविकांसाठी सुविधा कराव्यात अशी मागणी होत आहे. या गुहेच्या आतही अनेक गुहा आहेत. जेव्हा भाविक या गुहांमध्ये प्रकाशझोत टाकतात तेव्हा त्यातून हजारो दिवे लावले आहेत, असा प्रकाश बाहेर येतो. त्यामुळे या जादूई गुहांचे संशोधन व्हावे अशीही मागणी होत आहे. शिवाय मनदीप खोल गुहेमधील शिवलिंगावर अनेक छोटी शिवलिंग (Shivlinga) झाल्याचेही दिसते. भाविक याचे वर्णन अमरनाथ गुहेप्रमाणे करतात. त्यासंदर्भातही संशोधन व्हावे अशी मागणी आहे. या गुहेचे शास्त्रोक्त पद्धतीने सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. येथे जाण्यासाठी रस्ता तयार करावा. प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, विश्रांती आदींची व्यवस्था असावी, अशी मागणी आता शिवभक्तांतर्फे होत आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.