Home » ‘ही’ व्यक्ती घडवणार अयोध्येतील प्रभू श्रीरामांची मुर्ती

‘ही’ व्यक्ती घडवणार अयोध्येतील प्रभू श्रीरामांची मुर्ती

by Team Gajawaja
0 comment
Shriram Idol
Share

प्रभू श्रीरामांच्या अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. पुढील वर्षात जानेवारीमध्ये मंदिर रामभक्तांसाठी खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे मंदिर उभारणीच्या कामाला वेग आला आहे. मंदिराच्या गर्भगृहासाठी छताचे बांधकामही सुरू करण्यात आले आहे. यासोबतच रामललाची मूर्ती बनवण्याची तयारीही सुरू झाली आहे. प्रभू श्रीरामांची मूर्ती (Shriram Idol) तयार करण्यासाठी नेपाळ आणि कर्नाटकातून खास शिळा अयोध्येत दाखल झाल्या आहेत. मात्र प्रभू रामांचे रुप त्यामध्ये कोण साकारणार याचा निर्णय अद्याप बाकी होता. तो महत्त्वाचा निर्णयही झाला आहे. प्रभू रामांचे साजीरे रुप साकारण्याचा मान मिळाला आहे तो तरुण आणि प्रतिभावान मुर्तीकार अरुण योगीराज यांना. यासाठी देशभरातील अनेक दिग्गज मुर्तीकारांचा विचार करण्यात आला होता. त्यातून योगीराज यांची निवड करण्यात आली.(Shriram Idol)  

अयोध्येत राममंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. प्रभू श्रीरामांची मूर्ती (Shriram Idol) बनवण्याचा निर्णय बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. रामललाची मूर्ती कर्नाटकचे शिल्पकार अरुण योगीराज बनवणार आहेत. रामजन्मभूमीवर उभारण्यात येणाऱ्या मंदिराच्या उभारणीसाठी अनेक दिग्गज कलाकारांचे पॅनल तयार करण्यात आले आहे. यामध्ये म्हैसूरचे प्रख्यात शिल्पकार अरुण योगीराज यांचा समावेश आहे. अरुण यांनी अलीकडच्या काळात अनेक प्रसिद्ध शिल्पे तयार केली आहेत. यामध्ये केदारनाथमधील आदि शंकराचार्य यांचे शिल्प आणि दिल्लीच्या कर्तव्य मार्गावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 28 फूट उंच पुतळ्याचा समावेश आहे.

अरुण यांना शिल्पकलेचा वारसा लाभला आहे. आता ते प्रभू रामांची मुर्ती (Shriram Idol) साकारणार आहेत. या मुर्तीमध्ये पाच वर्ष वयाच्या प्रभू रामांच्या रुपाचे दर्शन होणार आहे.  त्याच्या चेहऱ्यावर बालसुलभ गोड हास्य असेल.  पुढील वर्षीजानेवारीत सूर्याच्या उत्तरायण दिवशी रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा अभिषेक होईल. याशिवाय प्रभूंची 52 फूट उंचीची मुर्तीही उभारण्यात येणार आहे. रामलल्लांची मूर्ती कोण तयार करणार यासाठी अनेक दिग्गजांचा विचार करण्यात आला. पद्मविभूषण सुदर्शन साहू आणि राम सुतार यांसारख्या अव्वल शिल्पकारांच्या नावाचाही विचार केला गेला. तत्पूर्वी प्रभूंची मूर्ती (Shriram Idol) कोणत्या स्वरूपावर साकारली जाणार आहे,  यावर अनेकांची मते घेण्यात आली.  यामध्ये पुण्याचे वासुदेव कामत, म्हैसूरचे प्रा. जीएल भट्ट, व्ही मनैया, सुरेंद्र विश्वकर्मा आणि सत्यनारायण शर्मा यांचा समावेश होता.  प्रभू श्रीरामांच्या मुर्तीसाठी  गेल्या तीन महिन्यांत कर्नाटकातील रामघाट परिसरात असलेल्या रामसेवक पुरममधून पाच,  राजस्थानमधून चार, ओडिशातून एक आणि नेपाळमधून दोन शिळा आणण्यात आल्या आहेत.  यातील एका शिळेची निवड अरुण योगीराज आता करणार आहेत.  प्रभू रामांची ही मूर्ती समस्त हिंदूच्या हद्यात रहाणार आहे.  त्यामुळे त्यासाठी कोणती शिळा निवडायची याचा अंतिम निर्णय योगीराज हेच करणार आहेत.  प्रभू रामांची मुख्य मुर्ती (Shriram Idol) विराजमान होणार आहे, ती मूर्ती 52 इंच असेल. चेहऱ्यावर गोड हसू आणि हातात धनुष्य उभ्या असलेल्या मुद्रेत असेल.  ही मूर्ती काळ्या रंगाची असेल. ही मूर्ती बनवण्याचे काम सुरु करण्यासाठी अरुण योगीराज अयोध्येत पोहोचले आहेत.   

अरुण योगीराज हे प्रसिद्ध शिल्पकार योगीराज शिल्पी यांचे पुत्र आहेत. अरुणचे आजोबा वाडियार राजघराण्याचे प्रसिद्ध शिल्पकार होते.  ते या वाडियार राजघराण्याच्या  वाड्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी ओळखले जातात. अरुण ह कलाकारांच्या कुटुंबातून येत असले तरी त्यांना आपल्या पूर्वजांप्रमाणे शिल्पकार बनायचे नव्हते.  अरुण यांनी म्हैसूर विद्यापीठातून एमबीए केले आहे.  त्यानंतर त्यांनी एका खासगी कंपनीत नोकरी केली.  मात्र या नोकरीत त्यांचे लक्ष लागले नाही आणि ते पुन्हा आपल्या पारंपारिक व्यवसायात दाखल झाले.  अरुण एक महान शिल्पकार होईल असे भाकीत त्यांच्या आजोबांनी केले होते. आता 37 वर्षानंतर त्यांची प्रभूरामांची मूर्ती घडवण्यासाठी निवड झाली, तेव्हा ही भविष्यवाणी खरी झाल्याची चर्चा आहे.   

=======

हे देखील वाचा : Akshaya Tritiya 2023 Date And Shubh Muhurat: अक्षय तृतीया कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

=======

अरुण योगीराज यांनी सुभाषचंद्र बोस यांचा 30 फूट उंच पुतळा तयार केला आहे. हा पुतळा इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती स्थळाच्या मागे भव्य छताखाली स्थापित करण्यात आला आहे. केदारनाथमध्ये आदि शंकराचार्यांची 12 फूट उंच मूर्ती स्थापन केली ती सुद्धा अरुण यांनी घडवली आहे. म्हैसूरमध्ये महाराजा जयचामराजेंद्र वाडियार यांचा 14.5 फूट पांढरा संगमरवरी पुतळा त्यांनी साकारला आहे. शिवाय स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा पुतळाही अरुण यांनी केला आहे.  

अरुण योगीराज यांनी ही कला आपले वडिल आणि आजोबा यांच्याकडून  शिकली. अगदी लहान वयापासून वडिलांना त्यांनी मदत केली आहे.  अरुण यांना त्यांच्या वडिलांचा आणि आजोबांचा खूप अभिमान आहे, माझ्या वडिलांना आणि आजोबांना प्रत्येक दगड जिवंत ठेवायचा होता. त्यांनी मला एका सुंदर शिल्पात कोरले आहे, माझे घरच माझी पहिली शाळा आहे, असे ते अभिमानाने सांगतात. अरुण योगीराज यांचा अनेक पुरस्कारानं सन्मान झाला आहे. त्यात केंद्र सरकारचा युवा प्रतिभा पुरस्कार, म्हैसूर जिल्हा प्राधिकरण आणि कर्नाटक सरकारतर्फे राज्योत्सव पुरस्कार,  शिल्प कला संघातर्फे शिल्प कौस्तुभ पुरस्कार आदींचा समावेश आहे.  अर्थातच प्रभू श्रीरामांची मूर्ती घडवण्याचे भाग्य मिळणं हा सर्वोच्च सन्मान असल्याचे अरुण योगीराज यांनी सांगितले आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.