आजचा २१ जून हा दिवस ‘जागतिक योगा दिन’ म्हणून साजरा केला जातो. 27 सप्टेंबर 2014 रोजी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली मधील भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची (International Yoga Day) संकल्पना सर्वप्रथम जगासमोर मांडली. यावर संयुक्त राष्ट्र महासभेने 11 डिसेंबर 2014 रोजी जाहीर केले की, 21 जून हा योग दिवस म्हणून साजरा केला जाईल. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) म्हणून साजरा केला केला जात आहे. दरवर्षी या योगदिनासाठी एक थीम जाहीर केली जाते. यावर्षीही अशीच एक थीम भारत सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय या योगदिवसासाठी सरकारतर्फे मोठ्या प्रमाणात तयारी सुरु झाली आहे. दरवर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हा योगदिवस कुठे साजरा करतील याचीही उत्सुकता असते. यावर्षी पंतप्रधान मोदी हा योगदिन अमेरिकेमध्ये साजरा करणार आहेत. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day) आजच्या दिवशी साजरा होत असला तरी त्याबाबत अधिकाधिक जागृती करण्यासाठी भारतातर्फे दरवर्षी प्रयत्न करण्यात येतात.

भारतीय परंपरेनुसार योग ही आपल्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग आहे. आरोग्याची गुरुकिल्ली म्हणून योगाकडे बघितले जाते. कोरोनाचे संकट आल्यावर योगाचे महत्त्व काय आहे, याची जाणीव सर्वांना झाली. तेव्हा योगाचे महत्त्व आणि त्यात भारताचे योगदान याची जाणीव जगाला झाली. दरवर्षी 21 जून रोजी होणारा हा योगदिन त्यामुळेच आता सर्वत्र साजरा होत आहे. देश, धर्म ओलांडून हा योगदिवस साजरा होतो. शरीरात नवीन उर्जा मिळवून देणारा आणि सकारात्मक विचार देणारा हा योग हा आता संपूर्ण जगाचा झाला आहे. या योगाचा खास दिवस म्हणून 21 जून साजरा होतो. त्यासाठी दरवर्षी एक थीमही जाहीर करण्यात येते. यावर्षीची थीम म्हणजे मानवता ही आहे. जगभरात वाढत असलेला हिंसाचार, युद्धाचे वातावरण कमी होण्यासाठी या योगदिनानिमित्त प्रयत्न करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी योगदिनासाठी ‘हृदयासाठी योग’, ‘शांततेसाठी योग’, अशी थीम राबवण्यात आली होती. 2021 ची थीम ‘कल्याणासाठी योग’ अशी होती. तर 2020 ची थीम ‘घरी योग आणि कुटुंबासह योग’ अशी होती, हा तोच काळ होता, ज्यात कोरोनामुळे अख्खं जग शांत झालं होतं. लॉकडाऊनचा काळ होता. त्यावेळी योगदिन कसा साजरा होणार अशी शंका व्यक्त करण्यात आली होती. पण त्याचवेळी योगदिन घराघरात साजरा झाला. त्यानिमित्तानं लाखो नागरिक योगाकडे वळले. 2019 या वर्षीच्या योगदिवसाची थीम “हृदयासाठी योग” अशी होती. तर 2018 ची थीम “शांततेसाठी योग” होती. 2017 या वर्षी “आरोग्यसाठी योग” ही योगदिनाची थीम होती. 2016 या वर्षी “कनेक्ट द यूथ” ही थीम राबवण्यात आली. तर 2015 साली साज-या झालेल्या योगदिनामध्ये “योगा फॉर हार्मनी अँड पीस” ही थीम राबवण्यात आली होती. (International Yoga Day)
आता यावर्षी 9 वा आंतराष्ट्रीय योगदिन साजरा (International Yoga Day) होत आहे. प्रशासकीय पातळीवर या दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची तयारी सुरु झाली आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून त्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. आजच्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौ-यावर आहेत. तिथे ते या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. आज होणाऱ्या या विशेष कार्यक्रमासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष साबा कोरोसी यांच्यासह जवळपास 190 देशांचे राजनैतिक प्रतिनिधी, न्यूयॉर्कचे महापौर एरिक ॲडम्स, अमेरिकेचे प्रदेशातील राजकीय नेते आणि निवडक अमेरिकेत स्थायिक झालेले भारतीय सामील झाले आहेत.
========
हे देखील वाचा : नरेंद्र मोदी आजचे आणि 2005 चे…
========
भारतात ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा (International Yoga Day) होतो, तसाच हा योगदिन अन्य देशातही साजरा कऱण्यात येत आहे. सौदी अरेबिया सारख्या देशातही योगदिन तेवढ्याच उत्साहात साजरा होतो. सौदीमध्ये योगविद्यापिठांचीही स्थापना होत आहे. तसेच येथे योगशिक्षकांची मागणी मोठ्याप्रमाणात आहे. भारताची परंपरा असलेला हा योग आता ख-या अर्थानं ग्लोबल झाला आहे. त्यामुळे यावर्षी होणा-या 9 व्या आंतरराष्ट्रीय योगदिनासाठी तुम्ही तयारी सुरु केली आहे का? नसेल तर नक्की तयारीला लागा.
सई बने