Home » हमासने इस्रायलवर हल्ला करण्यामागचं ‘हे’ आहे कारण

हमासने इस्रायलवर हल्ला करण्यामागचं ‘हे’ आहे कारण

by Team Gajawaja
0 comment
Hamas Attack
Share

हमासने इस्रायलवर 5000 रॉकेट डागले, या एका बातमीनं अख्खं जग हादरुन गेलं आहे.  इस्रायल आणि हमास यांच्यातील छत्तीसचा आकडा जगजाहीर आहे.  आत्तापर्यंत हमासनं इस्रायलवर अनेक हल्ले केले आहेत.  पण हे हल्ले अतिशय किरकोळ स्वरुपाचे होते.  इस्रायलच्या संरक्षण दलानं हे हल्ले यशस्वीरित्या परतून लावले आहेत.  पण आत्ता हमासने इस्रायलवर केलेल्या एवढ्या मोठ्या हल्ल्याचे अनेक दूरगामी परिणाम होणार आहेत.  यातील पहिला प्रश्नचिन्ह उभा राहणार आहे, तो म्हणजे, इस्रायलची सर्वात घातक गुप्तहेर संघटना मोसादला या हल्ल्याची काहीच कल्पना नव्हती का?   कारण फक्त दोन तासांच्या अवधीत हमासनं इस्रायलवर पाच हजार रॉकेटनं हल्ला केला आहे.  शिवाय त्यानंतर हमासचे अनेक अतिरेकी थेट इस्रायलची सीमा ओलांडून इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत.  त्यांनी अनेक इस्रायली नागरिकांना बंधक बनवल्याच्या बातम्याही आहेत.  तसेच इस्रायली सैन्याचे रणगाडे ताब्यात घेऊन सैनिकांना मारल्याचेही वृत्त आहे. त्यामुळेच या बातमीकडे व्यापक अंगानं बघितलं जात आहे.  मोसादला एवढ्या मोठ्या हल्ल्याची साधी कल्पनाही लागणार नाही, अशी गुप्तता हमासनं बाळगली होती.  एरवी मोसाद बद्दल अनेकांना माहिती आहे,  मात्र या घटनेनंतर हमास म्हणजे काय, याची माहिती घेण्यात येत आहे.  (Hamas Attack)

1987 च्या जनआंदोलनादरम्यान शेख अहमद यासीन ज्या हमासचा पाया घातला तिच पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरु झाले आहे.  या युद्धाचे जगावरही मोठे परिणाम होणार आहेत.  इस्रायलवरील हल्ल्यानंतर हमास प्रमुख मोहम्मद दाईफ यांनी इस्रायलविरुद्धच्या कारवाईला अल अक्सा स्टॉर्मअसे नाव दिले आहे.(Hamas Attack)

इस्रायल बरोबर कट्टर वैर असलेली हमास ही पॅलेस्टाईनची इस्लामिक अतिरेकी संघटना आहे. शेख अहमद यासीन यांनी 1987 च्या जनआंदोलनात या संघटनेची स्थापना केली. तेव्हापासून आत्तापर्यंत हमास इस्रायलला पॅलेस्टिनी भागातून हटवण्यासाठी झगडत आहे. गाझा पट्टीतून काम करणाऱ्या हमासला इस्रायल हा देश म्हणूनच मान्य नाही. त्यांना या संपूर्ण भागात इस्लामिक राज्य स्थापन करायचे आहे.  हमासची सनद त्याच्या स्थापनेच्या एक वर्षानंतर म्हणजे 1988 मध्ये तयार करण्यात आली. त्याच त्याच्या कट्टरतेबाबत उल्लेख आहे.  ज्यू समुदाय आणि इस्रायलला पूर्णपणे नष्ट करूनच हमासचा अंत होईल,  ही या सनदेची प्रस्तावनाच हमासचा उद्देश स्पष्ट करुन जाते.  हमासचे दोन गट आहेत.  त्यापैकी वेस्ट बँक आणि गाझा पट्टी भागात एका गटाचे वर्चस्व आहे. या परिसरात अनेक शाळा आणि रुग्णालये हमासनं उभारली आहेत.  पण या शाळा नावापुरत्या असून त्यामध्ये अतिरेकी होण्याचे शिक्षण दिले जाते, असा इस्रायलचा आरोप आहे.  तसेच रुग्णालयातही जखमी झालेल्या अतिरेक्यांवर उपचार होतात, असे इस्रायलचे म्हणणे आहे.  सर्वसामान्य जनतेसाठी या भागात काहीच नाही, असाही एक आरोप आहे. इस्रायलविरुद्धचा लढाही या गाझापट्टीतूनच चालतो.  हमासनं 2000 साली दुसऱ्या गटाचा पाया घातला.  हा दुसरा गट अत्यंत कट्टर आहे.  या गटाच्या स्थापनेपासून, इस्रायलवरील हल्ल्यांमध्ये प्रचंड वाढ झाली.  त्यात आत्मघातकी हल्ले अनेक पटींनी वाढले आहेत.  हे आत्मघातकी अतिरेकी गाझा पट्टीमधील शाळांमध्ये तयार होतात आणि यासाठी अनेक तरुणांचा वापर होतो, असे इस्रायलचे म्हणणे आहे.  (Hamas Attack)

असे असले तरी हमासबाबतची लोकप्रियता तरुणांमध्ये वाढत आहे. गाझा पट्टीत हजारो तरुण हमासच्या नावावर एकत्र येतात.  काही गुप्त संघटनांच्या अहवालांमध्ये हमासच्या दहशतवाद्यांची संख्या 50 हजारांहून अधिक आहे. पण एकीकडे आक्रमक होत असलेल्या हमासमधील अंतर्गत बातम्या आहेत.  विशेषत: 1996 साली जेव्हा हमासने इस्रायलमध्ये एकापाठोपाठ एक अनेक बॉम्बस्फोट घडवून आणले त्यानंतर हे वाद वाढले.  यात 60 इस्रायली नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता.  हमासमधील एका गटानं अशा हल्ल्यांना विरोध केला. परंतु  सशस्त्र संघर्ष आवश्यक असल्याचे मत दुसऱ्या गटाने मांडले.  यातून दोन गट असल्याचे स्पष्ट झाले आहे.  काहींच्या मते इस्रायलच्या मोसादनंच हमासमध्ये अशी फूट पाडली आहे.  

हमास आणि इस्रायली सैन्य यांची तुलना होऊ शकत नाही. पण हमासकडे रॉकेटपासून ड्रोनपर्यंत सर्व हत्यारे आहेत.  इस्रायलवर केलेल्या हल्ल्यातून हे आता स्पष्टच झाले आहे.  हमासच्या एलिट युनिट्स देखील कॉर्नेट मार्गदर्शित अँटी-टँक क्षेपणास्त्रांचा वापर करतात. हमास गाझा पट्टीतच बहुतांश शस्त्रे बनवते. हमासला इराणकडून शस्त्रे बनवण्याचे तंत्रज्ञान मिळाल्याचा दावा इस्रायल सातत्याने करत आहे. त्यामुळे या हल्ल्यानंतर इस्रायल इराण बाबतही काय भूमिका घेणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.  (Hamas Attack)

इस्रायल सातत्याने हमासकडे असलेल्या कसामआणि कुड्स 101′ या घातक क्षेपणास्त्रांचा उल्लेख करत आहे.  ‘कासम’ क्षेपणास्त्र 10 किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. तर कुड्स 101 किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. आत्ता इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात याच क्षेपणास्त्रांचा वापर झाला आहे का? हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.  एवढी संघटना चालवायची तर त्यासाठी निधी गरजेचा आहे. हमासकडे निधी कुठून येतो हा प्रश्न असेल तर, सर्व इस्लामिक देश हमासला निधी देतात, असा इस्रायलचा दावा आहे. यात कतारची मदत सर्वाधिक आहे.  गुप्त संघटनांच्या अहवालानुसार, एकट्या कतारने हमासला 1.8 अब्ज डॉलरहून अधिक मदत दिली आहे. शिवाय हमासचे जगभरात समर्थक आहेत आणि तेही करोडोंमध्ये हमासला मदत करतात.  

=============

हे देखील वाचा :  पांडवांनी बांधलेल्या ‘या’ मंदिराची गिनीज बुकमध्ये आहे नोंद

=============

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील वाद हा या सर्वांमागचं मूळ आहे.  हा संघर्ष मध्यपूर्वेतील या भागात किमान 75 वर्षांपासून सुरू आहे. वेस्ट बँक, गाझा पट्टी आणि गोलन हाइट्स यांसारख्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोघांचाही दावा आहे. पूर्व जेरुसलेम त्यामध्ये मुख्य आहे. गाझा पट्टी सध्या हमासच्या ताब्यात आहे. सप्टेंबर 2005 मध्ये इस्रायलने गाझा पट्टीतून आपले सैन्य मागे घेतले.  2007 मध्ये इस्रायलने या भागावर अनेक निर्बंध लादले. वेस्ट बँक आणि गाझा पट्टीमध्ये स्वतंत्र पॅलेस्टाईन राज्य स्थापन करावे, अशी पॅलेस्टाईनची मागणी आहे.  अर्थात ती इस्रायलला मान्य नाही.  हाच संघर्ष दोन्ही देशातील युद्धाला कारण बनला आहे.  आता हमासनं केलेल्या हल्ल्यामुळे  मोठ्या युद्धाची चाहूल लागली आहे.  हमासचा बदला घेण्यासाठी इस्रायल काय  करणार यावरच अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.  

सई बने.  

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.